-->
संपादकीय पान मंगळवार दि. १९ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
पर्यावरणप्रिय गणपती बाप्पांना प्राधान्य द्या
----------------------------------
गेल्या काही वर्षांपासून गणपतींच्या मूर्तीसाठी पीओपीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पीओपीच्या गणपतींमुळे शहरातील प्रदूषणात भर पडत तर असतेच तसेच यापासून तयार करण्यात आलेले गणपती हे पूर्णपणे पाण्यात विरघळत नसल्याने भग्नावस्थेतील मुर्ती आपल्याला काही काळाने तलावात किंवा समुद्राच्या किनारी पहावयास मिळतात. मुंबईसारख्या मोठ्या शहरात तर ही बाब प्रकर्षाने जाणवते. परंतु आता पीओपीच्या गणपतींना विराम देऊन पर्यावरणप्रिय गणपती तयार करण्याचा प्रयत्न काही संस्थांच्या वतीने सुरु झाला आहे. अगदी लहान प्रमाणात गेल्या दोन वर्षांपूर्वी हा प्रयत्न सुरु झाला आणि आता या प्रयत्नांना चांगलेच यश लाभत आहे. मुंबईतील कुर्ला येथील एका महिला बचत गटाने कागदापासून गणपतीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. या मूर्ती प्रदूषणमुक्त असल्याने अमेरिकेमध्ये देखील या गणपती मुर्त्यांना मागणी वाढली असून यावर्षी तब्बल पाचशे बाप्पा अमेरिकेला चालले आहेत. अमेरिकेतील भारतीयांमध्ये जो पर्यावरणप्रियता आढळते तर मग आपण यात मागे का असा प्रश्‍न उपस्थित होतो. गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण. पूर्वी निवडक घरामध्ये एकच गणपती असायचा. सध्या मात्र प्रत्येक घरामध्ये गणेश उत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणपतींची स्थापना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देण्यासाठी केली. तेव्हांपासून या गणपती उत्सवांचे स्वरुप बदलत गेले. मात्र गणपतींची संख्या वाढत गेली. सार्वजनिक गणपती मंडळांच्या भव्य गणेशमूर्ती बनवण्यासाठी पीओपीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु झाला. त्यामुळे पाणी दूषित होऊन प्रदूषण वाढण्याचा धोका निर्माण होतो. गेल्या काही वर्षात मुंबईमध्ये प्रदूषण वाढल्याने याला आळा घालण्यासाठी इकोफ्रें्रडली ही संकल्पना समोर आणली. या मूर्ती बनवताना केवळ वर्तमानपत्राचा लगदा, डिंक आणि व्हाईटनरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मूर्ती तयार करता येतात. वजनाने अगदीच हलक्या शिवाय हुबेहुब पीओपी सारखा दर्जा असल्याने पहिल्याच वर्षी या बाप्पाच्या मुर्त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. मुंबई महानगर पालिकेत कामाला असलेले गजाकोश यांच्याकडे पुरेसा वेळ आणि मनुष्यबळ देखील नव्हते. त्यामुळे त्यांनी परिसरात असलेल्या भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाशी संपर्क साधला. या महिलांना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी गजाकोश यांनी या महिलांना काही महिने गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानुसार गेल्या वर्षी या महिलांनी एक हजार गणेश मूर्ती बनवल्या. मात्र काही महिलांना घरची सगळी काम सांभाळून हे काम शक्य होत नसल्याने काही महिलांच्या घरी कच्चा माल दिला. त्यानुसार महिला सर्व जबाबदार्‍या सांभाळून हे काम देखील करत असतात. दिवसभरात त्यांना दोनशे रुपये मिळत असल्याने सध्या या बचत गटातील महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे. संदीप गजाकोश यांच्याकडे चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत गणपती बनवण्यासाठी येतात. तसेच त्यांनी बनवलेल्या गणपतींचे अनेक ठिकाणी प्रदर्शन देखील भरण्यात आले आहे. येत्या काही वर्षात संपूर्ण शहरात इकोफे्रंडली गणेशमूर्ती बनवण्याचा त्यांचा मानस आहे. अलिकडेच अलिबागमध्ये माजी नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी पर्यावरणप्रिय गणपती तयार करण्यासाठी एक कार्यशाळा घेतली होती. यालाही अलिबागकरांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. संपूर्ण मूर्ती ही कागदाच्या लगद्यापासून तयार होत असल्याने पीओपी मूर्तीपेक्षा ती अगदीच हलकी असते. शिवाय यामध्ये वापरण्यात येणारे रंग देखील नैसर्गिक असल्याने मूर्तीचे पाण्यात विसर्जन झाल्यानंतर पाण्यात असणार्‍या जीवांना याचा काहीही धोका संभवत नाही. पीओपी महाग असल्याने त्यापासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती देखील महाग विकल्या जातात. मात्र, इकोफे्रंडली मूर्ती त्यापेक्षा ३० ते ४० टक्यांनी स्वस्त मिळते. त्यामुळे आता पर्यावरणप्रिय गणपती हाच आपण नारा दिला पाहिजे.
-----------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel