-->
संपादकीय पान मंगळवार दि. २९ जुलै २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
सीमेवरील भाग महाराष्ट्रात आणा अन्यथा सत्तेतून बाहेर पडा
----------------------------------------
कर्नाटक सरकारने येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर चौथरा रविवारी सकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी जमीनदोस्त केला. यावेळी पोलिसांना प्रतिकार करण्यास गेलेल्या ग्रामस्थ आणि महिलांवरही पोलिसांनी जोरदार लाठीमार केला आणि त्यानंतर घराघरांत घुसून, ग्रामस्थांवर प्रचंड लाठीमार करत तब्बल अर्धा तास येळ्ळूरमध्ये अक्षरशः धुडगूस घातला. पोलिसांच्या या लाठीहल्ल्‌यात अनेकजण जखमी झाले. दरम्यान, बेळगावसह निपाणी आणि खानापूर येथे २९ तारखेपर्यंत बंदी आदेश लागू केला असून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेने सोमवारी मनिपाणी बंदफचे आवाहन केले आहे. ब्रिटांशांच्या काळाची आठवण यावी असेच अत्याचार येथील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारने केले आहेत. येळ्ळूरमधील मराठी अक्षरांचा चौथरा हटविल्यानंतर किरकोळ दगडफेक झाल्याचे निमित्त पुढे करून पोलिसांनी घरांचे बंद दरवाजे तोडून पुरुष, महिला आणि तरुणांना बाहेर ओढून काढत अक्षरशः झोडपून काढायला सुरुवात केली. खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. रस्त्यावर दिसेल त्याला झोडपून काढण्याचे सत्र अवलंबले. ग्रामस्थांना अक्षरशः वेचून मारहाण करण्यात आली. रस्त्यावरील दुचाकी वाहने आणि मोटारींवर दगडफेक करण्यात आली. शांतता राखण्याचे आवाहन करणार्‍या माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन गोरल यांनाही पोलिसांनी झोडपून काढले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. दोन महिन्याच्या बाळाला घरात घेऊन बसलेल्या मधुरा देसाई या महिलेलाही पोलिसांच्या या धुडगुसाचा फटका बसला. पोलिसांनी त्यांच्या घराच्या काचा फोडल्या. त्या देसाई यांच्या दोन महिन्याच्या बाळाच्या गालाला लागल्या. यामुळे मधुरा देसाई प्रचंड तणावाखाली होत्या. पोलिसांनी लाठ्या तुटेपर्यंत निरपराध ग्रामस्थांना मारहाण केली. अभ्यास करत बसलेल्या एका विद्यार्थ्यालाही घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली.  पोलिसांनी येळ्ळूरमधील सात जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर पोलिसांवर हल्ला करणे तसेच मारण्याचा प्रयत्न करणे अशी कलमे लावली आहेत. पोलिसांच्या या कृत्यानंतर आमदार संभाजी पाटील आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासह समितीच्या नेत्यांनी येळ्ळूरला भेट दिली. येळ्ळूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून प्रांताधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार आणि वरिष्ठ अधिकारी येळ्ळूरमध्ये दिवसभर ठाण मांडून होते. महिलांना शिवीगाळ, पैसे, मोबाइलही लांबवले मारहाण करताना महिलांनाही अर्वाच्य शिविगाळ करीत, अश्लील हावभाव केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. घरातील मोबाइल, पैसे पोलिसांनी नेल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून आम्ही कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांशी बोलू असे सरकारी छाप उत्तर दिले आहे. अर्थात राज्यातल्या कॉँग्रेस सरकारक़ून फारशी काही अपेक्षा करणे चुकीचे आहे. मात्र केंद्रात नव्याने आलेल्या भाजपा सरकारकडून मात्र जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे आता सत्तेत असलेल्या व त्या सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसेनेकडून बेळगाववासियांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्यातरी आता त्यांनी पूर्ण करुन दाखवाव्यात. गेल्या वेळी भाजपाच्या नेतृत्वाखालील एन.डी.ए.च्या सरकारने सीमावासियांसाठी काही केले नव्हते. आता मात्र त्यांच्या हातात देशातील जनतेने संपूर्ण सत्ता हाती दिली आहे. शिवसेनेने सीमावासियांची बाजू नेहमीच लावून धरली आहे. आता त्यांच्या हाती केंद्रातली सत्ता आल्याने एक चांगली संधी चालून आली आहे त्याचा उपयोग करुन सीमा प्रश्‍न सोडवावा. बेळगावसह कारवार सीमेवरील भाग महाराष्ट्रात सामील करुन घेण्यासाठी केंद्र सरकारने रितसर वटहुकूम काढावा किंवा हा प्रदेश केंद्रशासित करुन गेल्या सहा दशकांची सीमावासियांची मागणी पूर्ण करावी. अर्थात शिवसेनेला जर हे करणे शक्य होत नसेल तर त्यांनी केंद्रातील सत्तेतून बाहेर पडावे. शिवसेनेने असा आक्रमक पवित्रा घेतल्यास केंद्रातील मोदी सरकार खडवडून जागे होेईल व मराठी माणसांना आपल्या बाजून सत्ताधारी भांडत आहेत याची जाणीवही होईल. गेेली कित्येक वर्षे हा प्रश्‍न कॉँग्रेसच्या सरकारने भीजवत ठेवला आहे. त्या सरकारकडून हा प्रश्‍न सोडविला जाणे अशक्यच आहे. आता त्यामुळे शिवसेना व भाजपाकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्याची त्यांनी पूर्तता करावी, हीच सीमावासीयांची अपेक्षा आहे.
----------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel