-->
संपादकीय पान गुरुवार दि. ३ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------
युध्द आमुचे सुरु...
----------------------------
रायगड मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार रमेश कदम यांनी आपल्या हजारो समर्थकांच्या साक्षीने बुधवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी लाल बावट्याच्या गजरात तसेच लाल टोप्या व खांद्यावर लाल बावटा घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हे सर्व चित्र पाहता भाई रमेश कदम यांना आता दिल्ली दूर नाही असेच स्पष्ट दिसत होते. निवडणुकीचे वातावरण आता तापण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी शेपाकचा पाठिंबा मिळेल आणि आपण पुन्हा आपण संसदेत जाऊ असे स्वप्न पाहाणार्‍या विद्यमान खासदार अनंत गिते यांना दिल्ली गाठणे आता काही शक्य नाही. शेकापला गृहीत धरुन जनतेची कामे न करणार्‍या गिते यांना पुन्हा पाठिंबा शेकाप देईलच कसा? शेकापच्या रमेश कदम यांच्या दिवशीच फॉर्म भरणार्‍या राष्ट्रवादी कॉँग्रसेचे सुनिल तटकरे यांना देखील लोकांपुढे जाणे कठीण जात आहे. कारण गेल्या पंधरा वर्षात जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेली किमान दहा कामे तरी दाखवावीत असे आमचे आव्हान रायगडकरांच्या वतीने आहे. गेल्या काही वर्षात फक्त जनतेच्या जमिनी लाटणे आणि कंपन्या स्थापन करुन बेकायदेशीर मार्गाने त्या जमिनींवर ताबा मिळविणे याव्यतिरिक्त तटकरे यांनी केले तरी काय आहे, असा प्रश्‍न पडत आहे. तटकरेंची एकूण सर्व मालमत्ता सुमारे २५ हजार कोटी रुपये असल्याचे शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी जाहीर सभेत सांगितले होते. त्यावर तटकरे हूं की चू करीत नाहीत, आपली एवढी मालमत्ता असल्याचा इन्कारही करीत नाहीत, यातच खरे सत्य काय आहे ते दिसते. त्यामुळे कोकणचे भाग्यविधाते व माजी मुख्यमंत्री बॅ. अ.र. अंतुले यांनी ठामपणाने तटकरे विरोधी भूमिका घेतली आहे. त्यांची ही भूमिका कोणत्याही स्वार्थी हेतूने नसून आपण ज्या रायगड जिल्ह्यात विकास कामांचे बिजारोपण केले त्याच जिल्ह्यात जी भ्रष्टाचाराची किड लागली आहे ती संपवून टाकण्याची भूमिका आहे. अंतुलेंना आता कुणी पाठीराखे राहिले नाहीत असे बोलणार्‍या कॉँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांची मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे धावपळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांना अंतुलेसाहेबांच्या घराचे उंबरठे झिजवावे लागले. जर अंतुलेंच्या मागे कुणी नाही तर त्यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जायचे कारणच काय होते, असा सवाल आहे. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भरभक्कम पाठिंबा आणि अंतुलेंचे केवळ आशिर्वाद नाहीत तर सबळ पाठिंबा या जोरावर शेकाप यावेळी रायगडची जागा काबीज करणार आहे. सध्या देशातील एकूण राजकारण पाहता सत्ताधारी कॉँग्रेसबाबत निराशेचा जबरदस्त सूर उमटत आहे. कारण जसे तटकरेंनी रायगडसाठी काही केले नाही तसेच देशपातळीवर कॉँग्रेस पक्षाने जनतेच्या हितासाठी काही केले नाही. ज्या काही योजना आखल्या त्या केवळ कागदावर आहेत. प्रत्यक्ष जनतेच्या हातात काहीच पडत नाही. कॉँग्रेसचे सत्तेभोवती असलेले डोंगळे सर्व योजनांचा मलिदा खात आहेत. त्यामुळे या सरकारला यावेळी घरी बसविल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे जे देशात होत आहे तेच रायगडात होणार आहे. देशातील कॉँग्रेसचे भष्ट सरकार व जिल्ह्यातील तटकरेंचा भ्रष्टाचार याला जनता विटली आहे. त्यामुळे या दोघांचेही दिवस आता भरले आहेत. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये एकसूर तरी कुठे आहे? हे दोन्ही पक्ष परस्परांचे उमेदवार पाडण्यासाठी टपले आहेत. शरद पवारांचा पहिला शत्रू हा कॉँग्रेस आय हाच आहे. राष्ट्रवादी व कॉँग्रेस हे बाहेरुन कितीही एकदीलाने लढण्याच्या आणाभाघा घेत असल्या तरी खासगीत मात्र परस्परांविरोधात उभे ठाकलेले आहेत. आज हे जे चित्र राज्यात आहे तेच चित्र रायगडातही आहे. तटकरेंना कॉँग्रेसमधून जोरदार विरोध आहे. अनेक ठिकाणी कॉँग्रेसच्या तालुका पातळीवरील बैठकांमध्ये राष्ट्रवादी व तटकरेंच्या विरोधात जोरदार आवाज उठला आहे. यातून तटकरेंना कॉँग्रेसचेच कार्यकर्ते व लोक मतदान करण्यासाठी पुढे येणार नाहीत. त्याचबरोबर अंतुलेंनी आपला पाठिंबा शेकापच्या भाई रमेश कदम यांना जाहीर केल्याने अंतुलेंना मानणारा कॉँग्रेसजनांतील एक मोठा गट तटकरेंच्या विरोधात मतदान करणार आहे हे नक्की. या सर्व राजकीय परिस्थितीत शेकापचे पारडे हे निश्‍चित जड झाले आहे. अनंत गिते हे आता तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले आहेत. गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या झालेल्या मेळाव्यात सर्व नेत्यांचा आत्मविश्‍वास गळालेला होता, त्यावरुन हे स्पष्ट जाणवते. तर दुसरीकडे तटकरे यांना त्यांची भ्रष्टाचारी कारकिर्द भोवणार आहे. लोकांना आता भ्रष्टाचरापासून मुक्त, प्रमाणिक व जनतेची कामे करणारा उमेदवार हवा आहे. दिल्लतील निवडणुकीतून हे स्पष्ट दिसले आहे. अशा वेळी शेकापने एक जनमानसात चांगली प्रतिमा असलेला व प्रामाणिक उमेदवार रमेश कदम यांच्या रुपाने दिला आहे. आज शेकापच्या कदम यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने आता युध्द सुरु झाले आहे... परंतु हे युध्द सुरु होण्या अगोदरच शेकापने जिंकले आहे. आज अलिबागला जनतेचा जो लाल महासागर उसळला होता ते पाहता हे युध्द शेकापने जिंकले आहे.
-------------------------------------    

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel