-->
संपादकीय पान बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
देशातील बँकिंगमधील स्मार्टफोनचे नवे युग
---------------------------
भविष्यातील बँकिंग हे पूर्णपणे बदललेले असणार आहे. आज आपण बँकेच्या शाखेत जाऊन पैसे काढतो किंवा पैसे भरतो, बिलांचा भरणा करतो हे सर्व कालबाह्य होणार आहे. या सर्व बाबी आता आपण काही अंशी ए.टी.एम.वर करु लागलो आहोत. निदान पैसे काढण्यासाठी तरी ए.टी.एम.चा वापर सर्रास होऊ लागला आहे. मात्र ए.टी.एम. कार्ड हे ज्यांच्याकडे बँकेत खाते आहे त्यांनाच मिळते. सध्या देशातील एकूण जनतेपैकी ३५ टक्के जनतेकडेच बँकेत खाते आहे. त्यामुळे अन्य जनतेने करावे काय? असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यावर उपाय म्हणून प्रत्येक मोबाईलधारकाला ए.टी.एम. मधून पैसे काढण्याची आता सुविधा उपलब्ध होणार आहे. अर्थात हे काही लगेचच होणार नसले तरी रिझर्व्ह बँक त्यादृष्टीने आत्तापासून सर्व आखणी करीत आहे. कारण ज्यांच्याकडे बँकेचे खाते नाही मात्र त्यांच्याकडे मोबाईल आहे. भविष्यात तर मोबाईल हेच अनेक व्यवहारांचे एक मुख्य व्यासपीठ होणार आहे. आज आपल्या देशात सुमारे ६० कोटी जनतेकडे मोबाईल आहेत. त्यातील ५४ टक्के लोक हे ग्रामीण भागात राहातात. त्यामुळे बँकिंग पध्दतीला जर मोबाईलची जोड देण्यात आपले तंत्रज्ञान यशस्वी ठरले तर ती एक मोठी क्रांतीच ठरेल. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघराम राजन हे बँकिंग व मोबाईल याची कशी जोडणी करता येईल व त्याव्दारे बँकिंग सर्वसामान्य जनतेपर्यंत कसे पोहोचविता येईल याचा अभ्यास करीत आहेत. बँकांनाही नवीन शाखा सुरु करण्यापेक्षा ए.टी.एम. मशिन्स बसविणे खर्चाचा विचार करता फायदेशीर ठरणार आहे. मार्च २०१४ पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी जास्तीत जास्त ए.टी.एम. मशिन्स बसविण्याची योजना आखली आहे. त्यामुळे लोकांना बँकेच्या शाखेत जाऊन पैसे काढण्यापेक्षा ते ए.टी.एम.चा जास्तीत जास्त उपयोग करतील अशी योजना त्यांनी आखली आहे. सध्या ज्याप्रमाणे एखाद्या मोबाईल वरुन दुसर्‍याच्या खात्यात पैसे हस्तांतरीत करता येतात तसेच मोबाईल कंपन्यांच्या सहकार्याने मोबाईलव्दारे ए.टी.एम. मशिनमध्ये जाऊन केवळ कोड नंबर पंच करुन पैसे हस्तांतरीत करता येऊ शकतील. भारतीय पोस्ट खात्याने बी.एस.एन.एल.च्या सहकार्याने एका पोस्टाच्या कार्यालयातून काही क्षणात दुसर्‍या कार्यालयात पैसे पाठविण्याची सोय केली आहे. अशाच प्रकारची योजना व्यक्तीगत ग्राहकासाठीही वापरता येऊ शकते. परंतु त्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसीत करावे लागणार आहे. आज आपल्यासारख्या विस्तीर्ण पसरलेल्या देशात गावोगावी शाखा काढणे काही शक्य होणार नाही. तसेच ते खर्चीक कामही ठरेल. त्यासाठी ए.टी.एम. व मोबाईल यांच्या संगमातून बँकिंग सेवा गावोगावी पोहचू शकते. आपल्याकडे आता साधे मोबाईल मागे पडले असून स्मार्टफोन्सची बाजारपेठ झपाट्याने वाढली आहे. गेल्या वर्षात स्मार्टफोन्सची विक्री दीडशे टक्क्याहून वाढली आहे. अर्थात ही विक्री केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातही आहे. त्यामुळे स्मार्टफोन्स हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्वाचा दुवा ठरणार आहेत. यातून आपल्या बँकिंग व्यवस्थेतच झपाट्याने बदल येऊ घातले आहेत. अर्थात हे बदल फार काही उशीरा येणार नाहीत तर येत्या वर्ष-दोन वर्षातच येणार आहेत. पंधरा वर्षांपूर्वी मोबाईल फोन ही चैनीची वस्तू म्हणून ओळखली गेली होती. पंरतु यात झपाट्याने बदल झाले आणि मोबाईलच्या कॉल दरात घट होत गेली. याचा परिणाम असा झाला की मोबाईल आता सर्वांच्या हातात पोहोचले आणि मोबाईल ही आता गरज वाटू लागली. आता प्रत्येक गोष्ट मोबाईलमधून साध्य होणार आहे. यातील बँकिंग हे महत्वाचे अंग असेल.
---------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel