-->
करलो बँकिंग मुठ्ठी में(अग्रलेख)

करलो बँकिंग मुठ्ठी में(अग्रलेख)

Mar 09, 2013 EDIT
 इंटरनेट आणि मोबाइल यांचा मिलाप झाल्याने माणसाच्या आयुष्यात अनेक बदल येऊ घातले आहेत. यामुळे आपले दैनंदिन जीवन सुलभ होत आहे. मोबाइलचा वापर करून आता कोणतेही आर्थिक व्यवहार एका झटक्यात करणे शक्य होऊ लागले आहे. सर्व प्रकारच्या बिलांचा भरणा मोबाइलच्या ‘अ‍ॅप’वरून करणे हा त्यातील पहिला टप्पा झाला. मोबाइलमुळे तर संपूर्ण जग आपल्या हातात आल्यासारखे झाले आहे. सुरुवातीला मोबाइलचा वापर फक्त बोलण्यासाठी केला जात होता.
परंतु काळाच्या ओघात हातातले हे यंत्र आकाराने छोटे होऊ लागले. मात्र काम  ‘मोबाइल ऑफिस’ सारखे करू लागले.
इंटरनेटमुळे आपल्याला माहितीचा खजिना एका बटणाच्या कळीवर उपलब्ध होऊ लागला. पूर्वी आपल्याला वीज, फोन, मोबाइल वा अन्य कोणतीही बिले भरण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागत होते. परंतु आता मोबाइलवरून ही बिले भरता येऊ लागल्यावर रांगा लावण्याऐवजी एका क्षणात हे काम होऊ लागले. एवढेच कशाला, कोणतेही बँकिंग व्यवहार आता मोबाइल बँकिंगद्वारे करणे शक्य झाले आहे. गेल्या वर्षात मोबाइलवरून बँकिंग व्यवहार करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. गेल्या वर्षी हे व्यवहार 190 कोटी रुपयांवरून तब्बल 624 कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. येत्या काही वर्षांत हे व्यवहार आणखी वेगाने म्हणजे दरवर्षी 400 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. आपल्या देशात असलेल्या एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के लोकांचे बँकेत खाते आहे. पुढील तीन वर्षांत बँकेत खाते असण्याचे प्रमाणही 80 टक्क्यांवर पोहोचेल. सध्या एकूण लोकसंख्येच्या 42 टक्के जनतेकडे किमान एक तरी मोबाइल फोन आहे.
देशातील मोबाइल ग्राहकांची संख्या 80 कोटींवर पोहोचली असून त्यातील 90 टक्के लोक आपल्या हँडसेटद्वारे मोबाइल बँकिंगचे व्यवहार करू शकतात. जसजसा इंटरनेटचा प्रसार होत जाईल आणि लोकांना या तंत्रज्ञानाच्या सोयी-सुविधा लक्षात येतील तसतसा मोबाइल बँकिंगचा वापर वाढतच जाणार हे नक्की. मोबाइल बँकिंगमुळे काही काळाने बँकांच्या शाखांची गरज भासणार नाही. बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे तंत्रज्ञान आल्यावर बँकांना नव्याने शाखा काढण्याची आवश्यकता वाटणार नाही. तंत्रज्ञान ज्या गतीने बदलत चालले आहे ते पाहता, हा काळ यायला फार काही वेळ लागणार नाही. एक काळ असा होता की, लँडलाइन फोनसाठी लोकांना पाच-सात वर्षांची प्रतीक्षा करावी लागत होती. परंतु तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी व देशातील टेलिफोन क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा यांनी भविष्याचा वेध घेत गावोगावी टेलिफोन पोहोचवले. त्यानंतरच्या टप्प्यात 90 च्या दशकात मोबाइल फोन आले खरे; पण सर्वसामान्यांच्या हातात यायला जवळपास 2000 साल उजाडावे लागले. तोपर्यंत मोबाइल हे फक्त श्रीमंतांसाठीच होते. मात्र हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत  ज्या वेळी पोहोचले तेव्हा मोबाइल क्रांतीचा पाया पसरू लागला. आता तर भविष्यात प्रत्येक बाब मोबाइलवरून करणे शक्य होणार आहे. इंटरनेटमुळे बाजारात प्रत्यक्ष जाऊन वस्तूची खरेदी करण्याची गरज राहिलेली नाही.
इंटरनेटद्वारे खरेदी करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अर्थात केवळ शहरांतच नाही तर निमशहरी व ग्रामीण भागातही इंटरनेटद्वारे वस्तंूची खरेदी करण्याकडे ओघ वाढत चालला आहे. मोबाइलमध्ये आता इंटरनेट असल्यामुळे  त्याद्वारे खरेदी करताना ती मोबाइलद्वारेही करू शकतो. अशा प्रकारे प्रत्येक खरेदीसाठी वा व्यवहारासाठी मोबाइल हे एक व्यासपीठ   ठरणार आहे. त्यामुळे मोबाइल आपल्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर साह्यभूत ठरेल. इंटरनेटद्वारे होणार्‍या व्यवहारात पारदर्शकता असल्याने ग्राहकाचे यात अनेक फायदेही होतात. शेअर बाजारात समभागांचे व्यवहार संगणकावर सुरू झाल्यावर व्यवहारात पारदर्शकता आली. त्यापुढील टप्प्यात तर त्याला समभागांच्या व्यवहारासाठी शेअर दलालावरही अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. तो थेट मोबाइलद्वारेही हे व्यवहार करू शकतो. त्यामुळे गुंतवणूक असो, कोणतीही खरेदी-विक्री, पर्यटन किंवा वृत्तपत्रांचे किंवा पुस्तकांचे वाचन, अशा कोणत्याही गोष्टीसाठी आता मोबाइल हेच मुख्य साधन ठरणार आहे. पूर्वी पत्र लिहून त्याचे उत्तर येईपर्यंतचा काळ हा जेवढ्या दिवसांचा लागत होता त्यापेक्षा कमी सेकंदांत आता ई-मेलद्वारे जगाच्या कानाकोपर्‍यात  निरोप पोहोचून त्याचे उत्तरही येते.
जीवनाच्या प्रत्येक अंगात तंत्रज्ञानाचा हा आविष्कार स्पर्श करीत आहे आणि यामुळे आपले जीवन सुकर बनत चालले आहे. संगणकाने 80च्या दशकात आपल्याकडे प्रवेश केल्यावर हे तंत्रज्ञान आपल्या प्रत्येकाचे जीवन सुसह्य करेल असे वाटले नव्हते. उलट यामुळे बेकारीला आमंत्रण मिळेल अशीच टीका मोठ्या प्रमाणात झाली होती. यातूनच डाव्या व उजव्या विचारसरणीच्या कामगार संघटनांनी संगणकाला जोरदार विरोध केला होता. मात्र  संगणकामुळे बेकारी वाढली नाही, उलट रोजगार निर्मितीच झाली, शिवाय कामे वेगाने होऊ लागली. याच संगणकामुळे  रेल्वेच्या तिकिटांसाठी रांगा न लावता एका क्षणात तिकिटे उपलब्ध होऊ लागली. ही संगणक क्रांती आकार घेत असतानाच तीन दशकांपूर्वी लागलेला इंटरनेटचा शोध आणि गेल्या दशकात झालेली मोबाइल क्रांती हा यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरावा.

0 Response to "करलो बँकिंग मुठ्ठी में(अग्रलेख)"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel