-->
सुवर्णमृग पुन्हा निर्बंधमुक्त

सुवर्णमृग पुन्हा निर्बंधमुक्त

Published on 09 May-2012 EDIT

केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर लादलेले एक टक्का उत्पादन शुल्क अखेर मागे घेण्याची घोषणा अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांना करावी लागली आहे. सोन्यावरील हा कर लादल्यापासून देशातील सराफांनी याला विरोध केला होता आणि या निषेधार्थ 21 दिवस संप पुकारून आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या होत्या. अखेरीस सोन्या-चांदी व्यापार्‍यांच्या एकजुटीचा विजय झाला आणि ‘सुवर्णमृग’ आता पुन्हा एकदा भरधाव होण्यासाठी मोकळा झाला आहे. अर्थसंकल्पात करवाढीची घोषणा होताच सराफांनी संपाचे हत्यार उपसले होते. शेवटी या प्रकरणी कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप करून हा कर मागे घेण्याची आवश्यकता प्रणवदांना सांगितली. त्यानुसार अर्थमंत्र्यांनी संसदेत याची घोषणा केली. उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार विविध वस्तूंवर कर लावणारच, मग सोन्यावर लावला तर त्यात कुठे बिघडले? सोने ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. बरे, हा कर काय सोन्याचे व्यापारी थोडेच आपल्या खिशातून देणार होते? ते तर ग्राहकांकडून वसुल करणार होते. मग सरकारने आपल्या भूमिकेशी ठाम असायला हवे होते अशी टीका सरकारवर होऊ शकते. मात्र यात वस्तुस्थिती अशी आहे की, सोन्यावर कर लादल्यामुळे प्रतितोळा सोन्याची किंमत एक हजार रुपयाहून जास्त वाढली होती. त्यामुळे सोने खरेदीचा ओघ गेल्या दोन महिन्यांत मंदावला होता. तसेच भविष्यात सोन्याची तस्करी पुन्हा सुरू होण्याचा धोका होताच. सोने महाग झाले तरी ग्राहक खरेदी करणारच. फार तर काय, थोडे कमी सोने खरेदी करील. मात्र सरकारने त्यावरचा कर वाढवला तर ते पैसे भरणे त्याच्या जिवावर येते, ही सर्वसाधारण ग्राहकाची मानसिकता झाली. त्यामुळे गेले दोन महिने लग्नसराईचे दिवस असूनही सोन्याकडे काही ग्राहकांनी पाठ फिरवली. अगदी अलीकडेच झालेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरही सोन्याची खरेदी अपेक्षेपेक्षा कमी झाली होती. सोन्याचा भाव तीस हजारांची सीमा ओलांडून गेला होता हेही यासंबंधी लक्षात घ्यायला हवे. सोन्या-चांदीच्या व्यापाराची आपल्याकडे देशात फार मोठी म्हणजे अब्जावधींची उलाढाल आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास या क्षेत्रात सुमारे पाच लाखांहून जास्त कारागिरांना रोजगार मिळतो. दरवर्षी 900 कोटी टन सोने आयात केल्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो ही वस्तुस्थिती आपण एकवेळ मान्य केली तरीही यातून जेवढय़ा रोजगाराच्या संधी आहेत त्याकडे आपण डोळेझाक करू शकत नाही. या उद्योगामुळे अर्थव्यवस्थेला चालनाच मिळते. मात्र काही निर्बंध लादून सरकारला सोन्यात येणार्‍या काळ्या पैशाला वेसण घालायची होती. सरकारचा यामागचा उद्देश चांगला असला तरीही सर्वसामान्य ग्राहक यातून नाडला जाणार होता. प्रामुख्याने सोन्याची खरेदी केल्यास पॅन कार्ड सक्तीचे करण्यात येणार होते. मात्र ग्रामीण भागात शेतकर्‍याकडे अजूनही पॅन कार्ड नसते. याचा परिणाम सोने खरेदीवर होणार होता. त्यामुळे सराफा उद्योग लालफितीच्या कारभारात अडकण्याचा धोका होता. म्हणजे 90 च्या पूर्वी सुवर्ण नियंत्रण कायदा रद्द होण्याअगोदर जी स्थिती होती त्या दिशेने आपण आता पुन्हा एकदा वाटचाल करू लागलो होतो. सराफा व्यापार्‍यांनी हा धोका वेळीच ओळखून आपल्या धंद्यावर आलेले संकट परतवून लावले आहे. सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सर्वसामान्य शहरी माणसापासून ते ग्रामीण भागातील शेतकरीही पाहतो. सोन्याची खरेदी केवळ र्शीमंत करतात असे नव्हे तर देशातील मध्यमवर्गीय, शेतकरी असे प्रत्येक जण करतात. ग्रामीण व शहरी भागातील लोकांच्या हाती पैसा आल्यास अडचणीला उपयोगी पडेल म्हणून ते सोने खरेदीला प्राधान्य देतात. याचे मुख्य कारण म्हणजे सोने कधीही व कुठेही विकून त्याचे पैशात रूपांतर करता येते. यातून कुणाचीही गरज तातडीने भागवली जाते. हे गणित जसे सर्वसामान्यांचे, तसेच जगातील सर्वच देशांचे असते. जगातील विकसित देशांपासून ते गरीब देशही सोने खरेदी करतात. विकसित देश आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे हे दाखवण्यासाठी तर भारतासारखा विकसनशील देश आपली अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असल्याचे सिद्ध करण्यासाठी सोने खरेदी करतो. युरोपातले देश आपली अर्थव्यवस्था खंगल्यावर त्यातून मार्ग काढण्यासाठी सोन्याची विक्री करतात. अशा प्रकारे सोने हे एक अत्यंत सुरक्षित चलन म्हणून जगात मान्य झाले आहे. अमेरिकेतील एका राज्याने तर सोने आणि चांदी चलन म्हणून वापरण्याचा कायदा संमत केला. एवढेच नव्हे तर तेथे सोने-चांदीवरील भांडवलवृद्धी करही काढून टाकण्यात आला आहे. आता अमेरिकेतील अकरा राज्ये सोने-चांदी चलन म्हणून वापरणार आहेत. इराणकडून 21 अब्ज डॉलरचे कच्चे तेल चीन आयात करतो. त्या बदल्यात 14 अब्ज डॉलरच्या विविध वस्तू निर्यात करतो. अन्य सात अब्ज डॉलरचे सोने देण्याची तयारी चीनने केली आहे. आपल्या सरकारनेदेखील तीन वर्षांपूर्वी 200 टन सोन्याची खरेदी केली होती. अशा प्रकारे सोन्याचे महत्त्व जगात वाढत चालले आहे आणि वाढणार आहे. सोन्याच्या किमतीच्या जवळपास असणारा आणखी एक धातू म्हणजे प्लॅटिनम. परंतु सोन्याच्या भोवती जे अर्थकारणाचे आणि संस्कृती व धर्मपरंपरांचे वलय आहे किंवा सोन्याचा जो एक ‘ऑरा’ आहे तो प्लॅटिनमला नाही. त्यामुळे सोन्याची लकाकी जगात वाढत राहणार हे नक्की. भारतातही आता हा ‘सुवर्णमृग’ निर्बंधमुक्त झाल्याने सुसाट धावेल.

0 Response to "सुवर्णमृग पुन्हा निर्बंधमुक्त"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel