-->
स्वागतार्ह पाऊल

स्वागतार्ह पाऊल

स्वागतार्ह पाऊल
 Published on 19 Apr-2012 EDIT
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी व्याजदरात अध्र्या टक्क्याने कपात होण्याच्या दृष्टीने पतधोरणात पावले टाकली असल्याने आता विकासवाढीला पोषक वातावरण तयार होईल अशी आशा आहे. गेली तीन वर्षे देशातील व्याजाचे दर सतत वाढत होते. तीन महिन्यांपूर्वी व्याजदरातील वाढ थांबली होती आणि आता व्याजदरातील घसरण सुरू झाली आहे. व्याजदर उतरण्याबाबत अजूनही पोषक वातावरण तयार झालेले नाही, असे अनेकांचे म्हणणे होते. मात्र या सर्व चर्चांना विराम देत सुब्बाराव यांनी काहीसे धाडसी पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षांत व्याजाचे दर वाढण्यामागे जागतिक व देशांतर्गत पातळीवर अनेक कारणे होती, ही कारणे अजूनही कायम आहेत. असे असूनही आता विकासाला गती देण्यासाठी व्याजाच्या वाढीला ब्रेक लावणे आवश्यक असल्याचे सुब्बाराव यांना पटल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. देशात चलनवाढ होत असताना तसेच जागतिक पातळीवर प्रामुख्याने खनिज तेलाच्या किमतीचा भडका होत असताना महागाईला आळा घालणे कठीणच होते. अशा स्थितीत गेल्या तीन वर्षांत रिझर्व्ह बँकेला व्याजदर वाढवण्याशिवाय अन्य काही पर्याय शिल्लक नव्हता. व्याजाचे दर वाढत असताना विकासाला ब्रेक लागणे ओघाने आलेच. देशाने विकासाच्या गतीला प्राधान्य द्यावे की महागाईला आळा घालण्यात लक्ष घालावे, याविषयी अनेक अर्थतज्ज्ञांमध्ये मतभेद होते. परंतु सुब्बाराव यांनी चलनवाढीला आळा घालण्यासाठी सर्वात प्रथम पावले उचलली आणि ते योग्यच होते. आता चलनवाढ आटोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागल्यावर विकासाच्या वाढीला पोषक असा निर्णय घेण्यासाठी मध्यवर्ती बँकेने पावले टाकली आहेत. अमेरिकेतील मंदीचा विळखा काहीसा ढिला झाला असला तरीही युरोपातील आर्थिक पेचप्रसंग काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्याच्या जोडीला खनिज तेलाच्या किमतीतही फार मोठय़ा प्रमाणात घसरण झालेली नाही. एकूणच जगात आर्थिक व राजकीय अस्थिर परिस्थिती असताना त्या तुलनेत आपल्याकडील आर्थिक स्थिती आटोक्यात आहे. अशा स्थितीत आपल्याकडे विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढण्याची संधी वाढत चालली आहे. कारण आता जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून भारत, चीन, आफ्रिका हेच देश गुंतवणुकीसाठी योग्य आहेत, असे सध्या चित्र आहे. त्यामुळे या संधीचा फायदा उचलण्यासाठी आपल्याला व्याजदरात कपात करण्याची नितांत आवश्यकता होती. व्याजाचे दर कमी झाल्यास देशातील तसेच विदेशातील गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. देशातील गुंतवणूक वाढल्यास आपल्या अर्थव्यवस्थेची चाके अधिक वेगाने फिरतील. सध्याच्या जागतिक अस्थिर परिस्थितीमध्ये आपल्या अर्थव्यवस्थेला जो ब्रेक लागला आहे, या स्थितीत सुधारणा आणण्यासाठी आपल्याकडे विदेशी गुंतवणूक येण्याची गरज आहे. नेमकी हीच आवश्यकता ओळखून रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी करण्याचे एक पाऊल पुढे टाकले. देशातील उद्योगधंद्यांनीही याचे मोठय़ा उत्साहाने स्वागत केले आहे. कारण अनेक उद्योग व्याज कमी होण्यासाठी आतुरतेने वाटच बघत होते. कारण चढत्या व्याजाने निधी घेऊन व्यवसाय करणे त्यांना शक्य नाही. यात उत्पादन खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ होते आणि उद्योगांची सर्व आर्थिक गणिते कोलमडतात. गुंतवणूक कमी झाल्याने रोजगाराच्या संधीही कमी होतात आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळेच खरे तर व्याजदर घसरण्यासाठी पोषक वातावरण नसतानाही सुब्बाराव यांनी हे धाडसी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला, याचे शेअर बाजारानेही तेजीने स्वागत केले आहे. अर्थात व्याजाचे दर कमी होताना मुदत ठेवींवरील व्याजाचे दरही कमी होणार आहेत. याचा फटका प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना बसेल. दुसरीकडे गृह कर्जावरील व्याजदर कमी झाल्याने गृह खरेदी करणारा तरुण मध्यमवर्ग खुश होईल. त्याचबरोबर मुदतपूर्व गृह कर्ज फेडल्यास कोणतेही शुल्क न आकारण्याच्या आदेशाचाही याच वर्गाला फायदा होईल. सोन्यात आपल्याकडे लोक भरमसाट गुंतवणूक करून त्यावर गरज भासल्यास कर्ज घेतात. सोन्यावर कर्ज देणार्‍या कंपन्यांचे गेल्या वर्षात मोठे पीकच आले आहे. त्यांना आळा घालण्यासाठी म्हणून या कंपन्यांना निधी देण्यावर बँकांना र्मयादाघातल्या आहेत. या धोरणाचेही स्वागत व्हावे. कारण गेल्या काही दिवसांत सोन्यावर कर्ज देणार्‍या कंपन्यांच्या कारभाराबाबत शंका उपस्थित होत होती. रिझर्व्ह बँकेने वेळीच या कंपन्यांना चाप लावला हे योग्यच झाले. रिझर्व्ह बँकेच्या व्याजकपातीमुळे आपली अर्थव्यवस्था लगेच पुन्हा एकदा वेगात धावेल, असे समजणे चुकीचे ठरेल. आपली अर्थव्यवस्था जगात चीनच्या खालोखाल झपाट्याने वाढणारी असली तरीही तिच्यापुढे अनेक आव्हाने आ वासून उभी आहेत. आपल्याकडे खरेदीदारांची सुमारे 30 कोटी लोकांची मोठी बाजारपेठ असली तरीही महागाईचा फटका या बाजारपेठेला बसतो आणि याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. खनिज तेलाचे दर जगात वाढले हे वास्तव सर्वांना समजते, मात्र आपल्याकडे ही वाढ पचवण्याची मानसिकता झालेली नाही. व्याजाचे दर घसरत असताना हे वास्तव लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. आपण आता बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेत आहोत आणि व्याजाचे दर जसे चढतात तसेच ते उतरतातदेखील. व्याजाचे दर उतरले की दिलासा वाटतो, मात्र चढले की सरकारला आपण दोष देतो. व्याजाच्या दराच्या घसरणीचे स्वागत करताना याचे भान असणे आवश्यक आहे. 

0 Response to "स्वागतार्ह पाऊल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel