-->
मोबाइल ऑपरेटर्ससाठी थ्रीजीचा ‘राँग नंबर’

मोबाइल ऑपरेटर्ससाठी थ्रीजीचा ‘राँग नंबर’

मोबाइल ऑपरेटर्ससाठी थ्रीजीचा ‘राँग नंबर’
 Published on 15 Feb-2012 EDIT PAGE ARTICLE
देशात थ्रीजी सेवा सुरू होऊन नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. मात्र एका वर्षाच्या या काळात टेलिकॉम ऑपरेटर्सना अपेक्षेऐवढा प्रतिसाद थ्रीजी सेवेसाठी मिळालेला नाही. सध्या आपल्या देशात असलेल्या सुमारे 90 कोटी मोबाइल कनेक्शन्सपैकी केवळ दोन टक्के लोकांनीच थ्रीजी कनेक्शन घेणे पसंत केल्याने मोबाइल कंपन्यांच्या दृष्टीने थ्रीजी सेवा ही सध्या तरी रॉँग नंबर ठरला आहे. थ्रीजी सेवा भविष्यात मोठय़ा प्रमाणात यशस्वी होणारच असे आडाखे बांधून मोबाइल ऑपरेटर्सनी यात मोठी भांडवली गुंतवणूक तसेच सरकारी तिजोरीत करोडो रुपयांची फी जमा केली. मात्र त्यांचे हे सर्व अंदाज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आणि सध्या या कंपन्यांच्या पोटी निराशाच आली आहे. 
गेल्या दशकात आपल्याकडील मोबाइलचे जाळे झपाट्याने विणले गेले. यावर स्वार होत अनेक कंपन्यांनी आपले महत्त्वाकांक्षी विस्तार हाती घेतले आणि ते यशस्वी करून दाखवले. या कंपन्या गेले दशकभर जवळपास दरवर्षी 30 टक्क्यांनी आपली उलाढाल वाढवत होत्या. 17 रुपये प्रतिकॉलपासून सुरू झालेला मोबाइलचा कॉल दर 50 पैशांच्या खाली घसरला. याचा परिणाम म्हणून प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसू लागले. स्पर्धेमुळे ग्राहकांचा कसा फायदा होतो हे आपण आर्थिक उदारीकरणाच्या युगात सर्वात प्रथम अनुभवले. मोबाइल सेवेने आपल्या देशात एक नवी बाजारपेठ तयार केली. वीस वर्षांपूर्वी अस्तित्वातच नसलेल्या आणि पहिल्या पिढीतील उद्योजक सुनील मित्तल भारती यांच्या एअरटेल या कंपनीने यात आघाडी घेतली आणि आज त्यांच्याकडे तब्बल 24 कोटी मोबाइल ग्राहक आहेत. त्याखालोखाल रिलायन्सचे 15 कोटी, आयडिया 10 कोटी, टाटा टेलि 9 कोटी व व्होडाफोनचे 14 कोटी ग्राहक झाले. या उद्योगातील बहुराष्ट्रीय कंपनी व्होडाफोनने तर भारतात पाऊल टाकल्यावर दोन वर्षात ग्राहकसंख्येत पहिला क्रमांक गाठण्याचे जाहीर केले होते. त्यांना हे उद्दिष्ट काही गाठता आले नाही आणि एअरटेल या कंपनीने आपला पहिला क्रमांक कायम राखण्यात यश मिळवले आहे. केवळ पैसा आहे म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांना या देशात बाजारपेठ बळकावता येणार नाही हे पुन्हा एकदा यावरून स्पष्ट झाले. आता थ्रीजी सेवांमध्येही ग्राहकांच्या संख्येत एअरटेलने बाजी मारली आहे. त्यांच्याकडे 70 लाख ग्राहक आहेत, तर त्याखालोखाल व्होडाफोनकडे 60 लाख ग्राहक आहेत. याशिवाय अन्य ऑपरेटर्सकडे अतिशय कमी म्हणजे प्रत्येकी 20 लाख ग्राहकांहून कमी संख्या आहे. अशी स्थिती आपल्याकडे थ्रीजीच्या बाबतीत का यावी? एकेकाळी मोबाइलची झपाट्याने वाढ होत होती. त्या वेगाने थ्रीजी सेवा आपल्याकडे का फैलावली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. 
एक महत्त्वाची बाब आपल्याकडील ग्राहकांच्या बाबतीत लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, त्यांच्या दृष्टीने मोबाइल सेवा ही गरज आहे तशी थ्रीजी सेवा ही गरज वाटत नाही. ती लक्झरी ठरावी अशी सेवा आहे. कारण सर्वसाधारण मोबाइल सेवेपेक्षा थ्रीजी सेवा किमान दुपटीहून जास्त महाग आहे. त्यामुळे सध्याच्या मोबाइल ग्राहकांपैकी जे ‘कॉर्पोरेट क्लायंट’ आहेत तेच या सेवेचा फायदा घेतील. तसेच ज्यांच्या दृष्टीने मोबाइल हेच चालते-फिरते कार्यालय आहे तोच ग्राहक थ्रीजी सेवेला मिळणार आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्यांना आपली थ्रीजी सेवा ही लक्झरी नव्हे तर गरजेची वाटावी अशी करावी लागणार आहे. यासाठी त्यांना सर्वात पहिले म्हणजे थ्रीजी सेवेचे दर उतरवावे लागतील. कारण थ्रीजी सेवेचे दर उतरल्याशिवाय ही सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाही. कंपन्यांना जास्त ग्राहक मिळवूनच आपली उलाढाल वाढवावी लागणार आहे. 
आता देशातील मोबाइलची बाजारपेठ हळूहळू संकुचित होत चालली आहे. आपल्याकडे ग्राहकसंख्या 90 कोटींवर पोहोचल्याने नव्याने ग्राहक मिळवण्यासाठी कंपन्यांना आता खूप झगडावे लागणार आहे. त्यामुळेच भारतीय कंपन्यांनी आता आफ्रिकेच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. आपल्याकडे मोबाइलचे जाळे गेल्या दहा वर्षांत जसे वाढले ती स्थिती आज आफ्रिकेत आहे. त्यामुळे नवीन ग्राहक मिळण्याची स्पर्धा जशी करावी लागत आहे तसेच थ्रीजीसाठी ग्राहक मिळवण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागणार आहे. मात्र भविष्यात थ्रीजी चाच काळ असल्याने सध्या जरी त्याला अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी पुढील काही काळात चांगला प्रतिसाद मिळू शकतो. अर्थातच त्यासाठी कंपन्यांना ग्राहकाभिमुख व्हावे लागेल हेदेखील तितकेच खरे.

0 Response to "मोबाइल ऑपरेटर्ससाठी थ्रीजीचा ‘राँग नंबर’"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel