-->
तुझं-माझं जमेना..

तुझं-माझं जमेना..

 Published on 04 Sep-2011 for Rasik
तुझं-माझं जमेना..!
उदारीकरणाचे युग सुरू झाल्यापासून देशातील कॉर्पोरेट क्षेत्राचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे. भारतीय कंपन्यांनी आपल्याला नवीन तंत्रज्ञान व भांडवल मिळावे यासाठी विदेशी कंपन्यांशी सहकार्य करार करण्यास प्रारंभ केला. त्याचबरोबर डॉलरमध्ये पैसा घेऊन येणार्‍या विदेशी कंपन्यांना भारतीय बाजारपेठेची भुरळ पडली होती. मात्र, या बाजारपेठेत भक्कमपणे पाय रोवण्यासाठी भारतीय कंपन्यांचा सहारा पाहिजे होता. यातून विदेशी कंपन्यांचे भारतीय कंपन्यांशी सहकार्य करार वाढले; परंतु भारतीय कंपन्या व विदेशी कंपन्या यांच्यातील हनिमून लवकरच संपतो आणि उभय कंपन्यांचे मोठय़ा प्रमाणात घटस्फोट होतात, म्हणजेच या कंपन्या विभक्त होतात, असे आढळले आहे. अनेकदा दहा-वीस वर्षे एकत्र नांदलेल्या उभय कंपन्यांचेही सहकार्य करार संपुष्टात आल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या सहा वर्षांत अशा अनेक नामवंत कंपन्यांचे ‘घटस्फोट’ झाल्याची संख्या आता 50च्या वर गेली आहे. 
कॉर्पोरेट जगात सर्वच निर्णय व्यावसायिक पातळीवर घेतले जातात. एखादी कंपनी दुसर्‍या कंपनीशी सहकार्य करार करते ती स्वत:च्या वृद्धीसाठी किंवा तिच्याकडे तंत्रज्ञान नसल्यास ते उपलब्ध करण्यासाठी. परंतु सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात तंत्रज्ञानही सहजरीत्या उपलब्ध होते. त्याचबरोबर अशा प्रकारच्या संयुक्त कंपन्यांवर मालकी कुणाची राहाणार हा एक कळीचा मुद्दा असतो. भारतीय कंपन्या आता जागतिक बाजारपेठेला गवसणी घालायला लागल्यापासून त्यांना कधी कधी विदेशी कंपन्यांशी सहकार्य करार म्हणजे एक प्रकारचा बोजा वाटू लागतो. आणि हा बोजा उतरवण्यासाठी कंपन्यांमध्ये घटस्फोट होतात. कंपन्यांची घटस्फोटांची अशी अनेक उदाहरणे देता येतील. खाद्यान्न उद्योगातील गोदरेज-हर्षेले यांचा चार वर्षांनंतर घटस्फोट झाला. वाहन उद्योगातली महिंद्रा-रॅनॉल्ट यांचाही सहकार्य करार चार वर्षांनी मोडीत निघाला. खाद्यान्न उद्योगातील ब्रिटानिया-डोन्डे यांचा 16 वर्षांचा संसार संपुष्टात आला. डीएसपी-मेरिल लिंच (13 वर्षे), जेएम-मॉर्गन स्टॅन्ली (10 वर्षे), कोटक-गोल्डमन सॅच (10 वर्षे), आरपीजी-डेअरी फार्म (6 वर्षे), हिरो-होंडा (27 वर्षे), गोदरेज-सरला ली (13 वर्षे), डीएलएफ-लेंग ओरॅके (3 वर्षे), एचडीएफसी-चुब (5 वर्षे), कोटक-प्रायमस (11 वर्षे), एएमपी-सॅनमार (3 वर्षे), टाटा हनिवेल (16 वर्षे), एचसीएल-पेटॉट (7 वर्षे) अशी अनेक उदाहरणे देता येतील. कंपन्यांचा भांडवली वाटा हादेखील एक कळीचा मुद्दा असतो. उदारीकरणाच्या प्रारंभी 100 टक्के थेट विदेशी गुंतवणूक ही कोणत्याच उद्योगात नव्हती. मात्र, नंतर अनेक उद्योगांत सरकारने विदेशी कंपन्यांसाठी भांडवली वाटा 50 टक्क्यांच्या वर वाढवल्यावर अनेक विदेशी कंपन्या भारतात येऊ लागल्या. आता सुमारे 22 उद्योग असे आहेत की ज्यात 50 टक्क्यांहून जास्त भांडवल विदेशी कंपन्यांना ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात वित्तीय, औषध, वाहन, एफएमसीजी या क्षेत्रांचा समावेश आहे. याच उद्योगातील अनेक कंपन्या अशा आहेत की जिकडे कॉर्पोरेट घटस्फोट झाले आहेत. अनेकदा विदेशी कंपन्यांना आपण भारतीय कंपनीशी सहकार्य करार करून फार काही साध्य केले नाही असेही कालांतराने वाटते. अशा वेळी त्यांना भारतीय कंपनीपासून अलिप्त होऊन स्वत:ची स्वतंत्र कंपनी काढावीशी वाटते आणि ते अलिप्त होतात. याबाबत हिरो-होंडाचे उदाहरण देता येईल. या दुचाकी उद्योगातील आघाडीच्या कंपनीने तर 27 वर्षे एकत्र काम केल्यावर घटस्फोट घेतला. पूर्वी एक काळ असा होता की, भारतीय कंपन्यांना विदेशी कंपनीची गरज भासे. अनेकदा तंत्रज्ञान मिळविण्यासाठी त्यांना विदेशी कंपन्या लागत; परंतु उदारीकरण सुरू झाल्यापासून त्याचीही त्यांना गरज वाटेनाशी झाली. त्याचबरोबर अनेक भारतीय कंपन्यांनी जागतिक पातळीवर भरारी घेतल्यामुळे त्यांना विदेशी कंपन्यांच्या पंखांची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे अनेकदा कॉर्पोरेट घटस्फोट हे भारतीय कंपन्यांकडून घेतले जाण्याचे प्रकार जास्त होतात. यातून आपल्या देशातील कॉर्पोरेट जगतात घटस्फोटाचे प्रकार वाढले आहेत. आणि भविष्यात ते वाढतच जातील यात काहीच शंका नाही. 

prasadkerkar73@gmail.com

0 Response to "तुझं-माझं जमेना.."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel