-->
बाबुराम भट्टराय माओवादी विचारवंत ते पंतप्रधान

बाबुराम भट्टराय माओवादी विचारवंत ते पंतप्रधान


बाबुराम भट्टराय
माओवादी विचारवंत ते पंतप्रधान
 Published on 03 Sep-2011 For pratima
 प्रसाद केरकर. मुंबई
नेपाळमधील माओवादी नेते बाबुराम भट्टराय नेपाळी कॉँग्रेसचे उमेदवार रामचंद्र पौडेल यांचा पराभव करून पंतप्रधानपदी निवडून आले. त्यांनी 340 मते पटकावली आणि त्यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली. नेपाळचे ते 35 वे पंतप्रधान झाले आहेत. गेल्या तीन वर्षांतील चौथे पंतप्रधान आहेत. यावरून नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता किती भयानक आहे हे स्पष्ट जाणवते. त्यामुळेच 57 वर्षीय भट्टराय यांच्यापुढे अनेक आव्हाने आ वासून उभी आहेत.
18 जून 1954 रोजी बाबुराम यांचा जन्म नेपाळमधील गोरखा जिल्ह्यातील एका डोंगराळ गावातील शेतकरी कुटुंबात झाला. आपल्या घरी पाळलेल्या शेळ्यांची राखण करीत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या गावापासून मिशनरी शाळा दोन तास चालत जाण्याच्या अंतरावर होती. बाबुराम यांनी मोठय़ा जिद्दीने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. 1970 मध्ये शाळेतील शेवटच्या परीक्षेत त्यांनी सर्वाधिक मार्क्‍स मिळवले. खेडेगावातून आलेल्या या मुलाकडून एवढे मार्क्‍स मिळण्याची कुणालाच अपेक्षा नव्हती. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते भारतात आले. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी नियोजनावरील विषयात डॉक्टरेट संपादन केली. 1977 मध्ये विद्यार्थिदशेत असतानाच ते राजकारणात ओढले गेले. 1981 मध्ये ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे सदस्य झाले. भारतात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात असतानाच ते कम्युनिझमच्या विचारांनी प्रभावित झाले होते. नेपाळमध्ये परतताच त्यांनी कम्युनिस्ट चळवळीला वाहून घेतले. नेपाळमधील राजेशाहीविरोधी लढय़ात ते सक्रिय झाले. त्या काळी नेपाळच्या राजाने देशातील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली होती. याविरोधात आवाज उठविण्यात भट्टराय आघाडीवर होते. 
भट्टराय स्वत: भूमिगत झाले आणि राजेशाहीविरोधातला लढा तीव्र केला. नेपाळमध्ये माओवाद्यांची चळवळ उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. 1996 ते 2006 ही दहा वर्षे ते भूमिगतच होते. फक्त 2003 मध्ये माओवाद्यांची सरकारबरोबर सर्वात प्रथम चर्चा झाली त्या वेळी फक्त ते काही काळ भूमिगत नव्हते. सरकारबरोबर झालेल्या संघर्षात नेपाळमध्ये दहा वर्षात सुमारे 16 हजार लोक मारले गेले. त्यानंतर नेपाळ सरकारबरोबर माओवादी बंडखोरांनी युद्धबंदी केली. 2008 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या निवडणुकीत गोरखा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून ते 82 टक्के मते मिळवून विजयी झाले. त्या वेळी झालेल्या एका पाहणीत ते सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे आढळले होते. पक्षाचे नेते पुष्पकांत धहाळ यांच्याशी त्यांचे मतभेद झाले आणि त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. नेपाळमध्ये स्थापन झालेल्या लोकशाही सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक लोकप्रिय मंत्री म्हणून अल्पावधीतच त्यांचा लौकिक झाला. अर्थखात्याला त्यांनी चांगलीच शिस्त लावली. ‘युनिफाइड कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-माओइस्ट’ या पक्षाचे उपाध्यक्ष असलेले भट्टराय यांचा नेपाळी संसदेत चौथा मोठा पक्ष आहे. 
सध्या तरी त्यांच्या नेतृत्वाला सर्वांनी मान्यता देऊन त्यांच्या मागे संसदेतील दोनतृतीयांश खासदार उभे आहेत. त्यांची पत्नी हिसिला यामी यादेखील लोकसभेवर निवडून आल्या आहेत. तसेच ‘युनिफाइड कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-माओइस्ट’ या पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सदस्य आहेत. त्यांची कन्या मौन्सी हीदेखील याच पक्षाची सदस्य असून विद्यार्थी नेता म्हणून प्रसिद्ध आहे. नेपाळमधील कम्युनिस्ट पक्षांचे गट व नेपाळी काँग्रेस यांच्याबरोबर नेपाळी लष्कर या सर्वांना सोबत घेऊन भट्टराय यांना आपले पद टिकवण्याची कसरत करावी लागणार आहे. 

Prasadkerkar73@gmail.com

0 Response to "बाबुराम भट्टराय माओवादी विचारवंत ते पंतप्रधान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel