-->
सोन्याच्या झळाळीमागचे ‘काळे’ अर्थकारण

सोन्याच्या झळाळीमागचे ‘काळे’ अर्थकारण

 Published on 02 Sep-2011 Edit
सणासुदीचे दिवस आता सुरू झाल्याने सोन्याच्या वाढलेल्या किमतीला पुन्हा एकदा झळाळी येणार आहे. गेल्या तीन महिन्यांत सोन्याच्या कि मतींनी नवीन उच्चांक गाठण्याची स्पर्धाच चालवली होती. दुसरीकडे शेअर बाजारात मंदी आल्याने व सोन्यातील गुंतवणुकीत चांगला परतावा मिळत असल्याने या गुंतवणूकदारांची पावले सोन्यातील गुंतवणुकीकडे वळत आहेत. एकूणच काय तर सोने खरेदीला सध्या चांगले दिवस आले आहेत. तसे पाहता आपल्याकडे सोन्याची खरेदी बारमाही चालू असते. सणासुदीच्या दिवसात ही खरेदी वाढते. सध्या महागाईने लोकांना ग्रासले असले तरी सोने खरेदीची लोकांची ओढ काही थांबलेली नाही. त्यामुळे महागाई लोकांना खरोखरीच जाणवते का, असा प्रश्न पडतो. परंतु महागाई आणि सोने खरेदी यांचा काही विश्ेाष संबंध नाही असेच दिसते. अन्यथा एवढी महागाई असताना सोनारांची दुकाने ओस पडली असती. परंतु तसे काही होत नाही. आपल्याकडे गरिबांपासून मध्यमवर्गीय ते र्शीमंतापर्यंत प्रत्येक जण आपल्या आर्थिक कुवतीनुसार सोने खरेदी करतो. सोने खरेदीचा हा कल शहरात जसा आहे तसाच तो ग्रामीण भागातही आहेच. ग्रामीण भागात शेतकरी पीक विकून हातात पैसा आला की भविष्याची तरतूद म्हणून सोन्याची खरेदी करतो. सोने कधीही अडचणीच्या काळात विकून पैसे उभारता येतात. त्यामुळे सोन्याची खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो आणि ते खरेही आहे. अशा प्रकारे आपल्याकडे सोने सर्व थरांत खरेदी केल्याने सोन्याची मागणी सातत्याने वाढत चालली आहे. 30 जून 2011 रोजी संपलेल्या 12 महिन्यांत भारताची सोन्याची मागणी 1,100 टनांवर गेली, तर संपूर्ण जगात सोन्याची मागणी 3,372 टन होती. याच काळात सोन्याचे दागिने, नाणी यांचीही मागणी झपाट्याने वाढली. या वाढत्या मागणीमुळे सोन्याची जागतिक बाजारपेठेत 2008 मध्ये असलेली किंमत एक हजार डॉलर प्रति औंसावरून आता 1830 डॉलरवर पोहोचली आहे. भारतातही सोन्याची किंमत याच गतीने वाढली आहे. तीन वर्षांपूर्वी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 13 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम होती. ती आता 27 हजार रुपयांवर गेली आहे. देशात सोन्याची मागणी सर्व थरांतून होत असली तरी सोन्याच्या किमती वाढण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे सोन्यातील या गुंतवणुकीकडे काळा पैसा मोठय़ा प्रमाणात वळला आहे. आपल्याकडे काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था आहे. अण्णांनी देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्याचा चंग बांधला असला तरी काळ्या पैशाच्या या समांतर अर्थव्यवस्थेला कसा पायबंद घालणार, याचे उत्तर अण्णांकडे आणि त्यांच्या साथीदारांकडेही नाही. आपल्याकडे काळ्या पैशाचे असलेले अर्थव्यवस्थेचे वर्चस्व आपण बघतोच आहोत. आज जवळजवळ प्रत्येक उद्योगात काळा पैसा वावरताना दिसतो. हा काळा पैसा ज्या उद्योगात मोठय़ा प्रमाणात शिरला तिकडे किमतींने उच्चांक गाठलेला आहे. रिअल इस्टेट उद्योगात जी यापूर्वी तेजी आली त्यामागेही हाच काळा पैसा होता. मुंबई, पुणे या महानगरात रिअल इस्टेटमध्ये किमतीचा एक कृत्रिम फुगवटा याच काळ्या पैशाच्या वावरामुळे निर्माण झाला. तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत मंदी आली त्या वेळी आपल्याकडेही रिअल इस्टेटमधील किमतीचा फुगा फुटला आणि किमती घसरल्या. मात्र मंदीचे वातावरण शिथिल होताच पुन्हा या दरांनी उसळी घेतली. शेवटी जागांच्या किमती वाढीलाही काही र्मयादा आहेत हे पटल्यावर या उद्योगात फिरत असलेला काळा पैसा अन्य जागा शोधू लागला. मध्यंतरीच्या काळात शेअर बाजारातही तुफान तेजी आली. त्या वेळी हेज फंडांच्या मार्फत भारतातलाच काळा पैसा मॉरिशसमार्गे पुन्हा भारतात आल्याची चर्चा होती. आता सोन्यातील तेजीमागेही काळा पैसा असल्याचा संशय आहे. कारण सध्याच्या जागतिक पातळीवरील अस्थिर काळात सोने हेच गुंतवणुकीसाठी एक उत्तम साधन आहे. अमेरिकेची डळमळीत झालेली अर्थव्यवस्था, युरोपातील काही देशांचे भवितव्य अंधारलेले असल्याने युरो हे चलन टिकेल किंवा नाही अशी शंका आहे. काळे सोने म्हणून ओळखल्या गेलेल्या खनिज तेलाचे दरही उतरणीला लागले आहेत. चार वर्षांपूर्वी गुंतवणुकीसाठी जागतिक पातळीवर ‘हॉट डेस्टिनेशन’ म्हणून दुबईकडे सार्‍या जगाचे लक्ष होते. परंतु दुबईचे हे ग्लॅमरही संपुष्टात आले. अशा स्थितीत सध्या तरी सोने हाच गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यातच आपल्या देशात काळ्या पैशाविरोधात जोरदार मोहिमा सुरू झाल्याने स्वित्झर्लंडमधून या पैशाला पाय फुटू लागल्याचे बोलले जाऊ लागले आहे. पूर्वी स्वित्झर्लंडमधील काळा पैसा हा ‘सुरक्षित’ राहणार अशी हमी काळ्या पैशाच्या मालकास होती. मात्र ही हमी भविष्यात राहणार नाही अशी हवा तयार झाल्यापासून हा काळा पैसा बेनामी मार्गाने मायदेशी परतू शकतो. हा काळा पैसा आता देशातच विविध मार्गांनी गुंतवला जाण्याची शक्यता जास्त आहे. सोन्याच्या किमती ज्या गतीने वाढल्या आहेत ते पाहता काळ्या पैशाने सोने खरेदीत आपले पाय रोवले असण्याची शक्यता आहे. अर्थात कोणत्याही बाजारपेठेत सतत तेजी राहत नाही. तसे 15 वर्षांच्या मंदीच्या आवरणातून बाहेर आलेल्या सोन्याच्या बाजारपेठेतही पुन्हा मंदी कधीतरी येणारच. परंतु जोपर्यंत सोन्याच्या बाजारपेठेवर काळ्या अर्थकारणाचा वरचश्मा आहे तोपर्यंत तरी या किमती उतरणे कठीणच आहे

0 Response to "सोन्याच्या झळाळीमागचे ‘काळे’ अर्थकारण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel