-->
भाजपातील खदखद

भाजपातील खदखद

शनिवार दि. 14 डिसेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
भाजपातील खदखद
राज्यातील सत्ता गेल्यावर आता भाजपामध्ये जोरदार खदखद व लठ्ठालठ्ठी सुरु झाली आहे. गेली पाच वर्षे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी एकाधिकारशाही सुरु होती त्याच्या विरोधात बंड करुन उठण्याची तयारी होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. आता सत्ता गेल्यावर या खदखदीला वाट मोकळी करुन मिळाली आहे. गुरुवारी गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यात ही खदखद व्यक्त झाली आहे. या मेळाव्याची खरे तर अगोदरपासूनच सतत चर्चा झाली होती. गेली पाच वर्षे भाजपाने ज्यांना विजनवासात ढकलले होते ते एकनाथ खडसे व आता पराभूत झाल्याने अस्वस्थ झालेल्या पंकजा मुंडे हे दोघे कोणती भूमिका मांडतात याकडे सार्‍या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. खडसे यांनी या मेळाव्यापूर्वी दोनच दिवस अगोदर शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेक चर्चा सुरु झाल्या. खडसे यावेळी बंड करतील व शिवसेना, राष्ट्रवादी या दोन पैकी कुठेतरी प्रवेश करतील असा राजकीय निरिक्षकांचा होरा होता. त्यातच कॉँग्रेसनेही त्यांना आमंत्रण देऊन त्यांच्यासाठी रेड कार्पेट घातले होते. खडसे नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे होते. कारण खडसे हे भाजपाचे गेली चार दशके सक्रिय नेते आहेत तसेच त्यांच्याकडे ओ.बी.सी.चे नेते म्हणून पाहिले जाते. विधानसभेत खडसे यांनी भाजपाचा किल्ला किमान तीन दशके लढविला आहे. ज्यावेळी भाजपा पक्ष सत्तेच्या नजरेतही नव्हता त्यावेळपासून त्यांची पक्षाची धुरा खांद्यावर पाहिली आहे. आज खडसेंच्या मागे समर्थक किमान एक डझन भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्र्यांनी आपला स्पर्धक म्हणून त्यांच्याकडे पाहून त्यांचे पंख छाटण्यास सुरुवात केली व त्यांचे पूर्णपणे खच्चीकरण करण्यात आले. तयंच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, तसे भाजपाच्या अनेक मंत्र्यांवर झाले. परंतु त्यांचे एवढे खच्चीकरण झाले नाही जेवढे खडसे यांचे झाले. त्यामुळे खडसे यांना संपविणे म्हणजे आपण सुरक्षित अशी भावना फडणवीस यांची होती. त्यातून खडसेंचा बळी गेला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकिट नाकारण्यात आले. मात्र अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांच्या मुलीला देण्यात आले. मात्र त्या कशा पडतील याचीही खबरदारी घेण्यात आली. शेवटी ज्या पक्षाला आपण वाढविले त्यात आपली होत असलेली अवहेलना कडसे यांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली. सत्ता गेल्यावर फडणवीस जसे पक्षात एकटे पडू लागले तसे खडसे यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली. कॉँग्रेस ज्यावेळी सत्तेत होती त्यावेळी अशाच प्रकारे नेत्यांचे पत्ते काटले जायचे. तशाच प्रकारचे राजकारण भाजपातील नेत्यांनी प्रामुख्यांनी फडणवीस व त्यांच्या भोवती असण्यार्‍या नेत्यांच्या कंपुंनी केली. भाजपाने कसे कॉँग्रेसीकरण झाले आहे त्याचे हे एक उत्तम उदाहरण ठरावे. आता मात्र फारे फिरु लागले आहेत. खडसे आपल्यावरील अन्यायाची जाहीर वाच्याता करु लागले व मनातील खदखद व्यक्त करु लागले. भाजपाला त्यांच्यासारख्या नेत्यांची आता पडत्या काळात आठवण झाली. त्यामुळे खडसेंची मनधरणी करण्यास प्रारंभ झाला. शेवटी या मेळाव्यातील भाषण पाहता खडसे यांनी आपल्याला गृहीत धरु नका, असा स्पष्टच इशारा पक्षाला दिला आहे. याचा अर्थ खडसे पक्ष सोडण्याच्या विचारात नक्की आहेत, फक्त ते योग्य वेळेची संधी पाहत आहेत. किंवा त्यांना भाजपा विरोधातल्या कोणत्या पक्षात जाणे सोयीस्कर आहे त्याचा ते परिपूर्ण विचार करीत असावेत. परंतु खडसे फार काही भाजपात राहात नाहीत हे मात्र नक्की. पंकजाताईंचे देखील तळ्यात मळ्यातच आहे. मात्र त्यांनी भाजपाच्या कोअर कमिटीचा राजीनामा देऊन मोठा धक्का दिला आहे. त्याचबरोबर येत्या 26 जानेवारीला  मुंबईत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे कार्यालय सुरु करणार असल्याची घोषणा केली. त्याच्या जोडीला राज्यभर दौरा करण्याची त्यांची ही घोषणा म्हणजे पक्षात राहूनच संघर्ष करण्याची त्यांनी तयारी ठेवली आहे. खरे तर भाजपात अशा प्रकारचे पक्षात राहून पर्यायी संघटना उभी करण्याचे राजकारण चालत नाही. कोणताच पक्ष अशा प्रकारचे राजकारण खपवून घेत नाही. नारायण राणेंनी ज्यावेळी शिवसेना सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या स्वाभिमान संघटना विसर्जीत करण्याचा त्यांच्यावर पक्षातून दबाव होता. परंतु शेवटपर्यंत राणेंनी तसे काही केले नाही. पंकजाताईंकडे आज राजकारणातील थेट अनुभव फार कमी गाठीशी आहे, मात्र गोपीनाथरावांसोबत राहून त्यांनी राजकारण फार जवळून पाहिले आहे. त्यामुळे लगेचच त्या पक्ष सोडतील असे नाही. उलट त्यांनी पक्षालाच मला काढून टाका अशी धमकी दिली आहे. सध्याच्या स्थितीत भाजपा त्यांना पक्षातून काढून टाकण्याचे काही धाडस दाखवू शकत नाही. येत्या एप्रिल महिन्यात विधानपरिषदेच्या जागा रिकाम्या होत आहेत, त्यावर खडसे किंवा पंकजाताई यांची किंवा दोघांचीही वर्षी न लागल्यास ही खदखद फुटीत रुपांतर होऊ शकते. जर यातील कोणीही नेता फुटला तर भाजपाला ते राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. ओ.बी.सी. समाज जो गोपीनाथरावांनी भाजपाकडे खेचून आणला होता, तो रिव्हर्स गीअरमध्ये जाण्याचा धोका आहे. सत्ता गेल्याने आगामी काळ भाजपासाठी कसोटीचा ठरणार आहे.   
------------------------------------------------------------ 

0 Response to "भाजपातील खदखद"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel