-->
सरन्यायाधीशांचे स्वागत

सरन्यायाधीशांचे स्वागत

मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
सरन्यायाधीशांचे स्वागत
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या 47 वे सरन्यायाधीश पदाची शपथ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून घेतली. शरद बोबडे 23 एप्रिल 2021 मध्ये ते निवृत्त होत असल्याने त्यांचा कार्यकाळ 17 महिने असणार आहे. एक मराठी माणूस देसाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्याने तमाम मराठी बांधवांना त्यांचा अभिमान वाटणे स्वाभाविकच आहे. खरे तर त्यांचे पद एवढे सर्वोच्च आहे की तिकडे मराठीबाणा दाखविणे चुकीचे ठरेल, परंतु आपल्याला त्यांचा अभिमान वाटणे काही चूक नाही. नागपूरमध्ये जन्मलेल्या न्यायमूर्ती बोबडेंचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. यानंतर 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली होती. 2012 मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी पदभार सांभाळला होता. यानंतर 2013 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात त्यांची नियुक्ती करण्यात आली. अलिकडेच माजी सरन्यायाधीश गोगोई यांच्याविरूद्ध लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत न्यायमूर्ती बोबडे सहभागी होते. त्यामुळे ते प्रकाशझोतात आले होते. आनंदी आणि मृदुभाषी असणार्‍या बोबडे यांना बाइक राइडिंग आणि कुत्र्यांची आवड आहे. पुस्तके वाचणे हा त्यांचा छंद आहे. त्यांच्यातला साधेपणा त्यांंच्या प्रत्येक ठिकाणी दिसतो. त्यांची राहाणीही अतिशय साधी आहे. माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी 3 ऑक्टोबर 2018 रोजी 46 वे सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ 13 महिने 15 दिवसांचा होता. त्यांच्या काळात अयोध्या विवादावर ऐतिहासिक निर्णय दिला. तसेच राफेल प्रकरणातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. त्याचबरोबर गोगाई यांनी सरन्याधीशांना आरटीआयच्या कक्षेत आणले. त्यांच्या काळातील अनेक निर्णय हे ऐतिहासिक ठरले आहेत. आता बोबडे यांच्या काळात कोणते निकाल लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्या. बोबडे हे सरन्यायधीशपदी पोहोचलेले काही पहिले मराठी माणूस नाहीत. त्याचबरोबर नागपूरातील ते या पदावर पोहोचलेले पहिले नाहीत. यापूर्वी नागपूरचे न्या. मोहम्मद हिदायतुल्ला हे सरन्यायाधीश होऊन गेले. आता बोबडे यांना हा मान मिळाला आहे. त्यांच्या नियुक्तीने नागपूरचाही सन्मान होत आहे. न्या. मोहम्मद हिदायतुल्लो आणि न्या. शरद बोबडे  या दोघांच्याही जडणघडणीत नागपूर-विदर्भाचा मोलाचा वाटा राहिला. वैदर्भीय वकील आणि न्यायाधीश हीच त्यांच्या कारकीर्दीची ओळख आहे. तसे पाहता अनेक नामवंत वकिल नागपूरच्या भूमिने दिले आहेत. पाकिस्तान सरकारच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांना आन्तरराष्ट्रीय न्यायालयातून फाशीच्या शिक्षेतून सोडविणारे हरिष साळवे हे देखील नागपूरचेच. नागपूरने भारताला दोन सरन्यायाधीश दिले आहेत. न्या. हिदायतुल्ला पन्नास वर्षांपूर्वी होऊन गेले, तर दुसरे न्या. शरद अरविंद बोबडे यांनी 47 वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. न्या. बोबडे हे पूर्णत: नागपूरकर आहेत. त्यांचा जन्म, बालपण, शिक्षण, वकिली, न्यायाधीशपद सारे काही नागपुरात झाले. त्यांचे भाग्य असे की, त्यांना वकिली व्यवसायाचा थोर वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा मनोहर रामचन्द्र बोबडे हे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रसिद्ध वकील होते. त्यांचा अर्धपुतळा आकाशवाणी चौकातील न्यायमंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आजही वकिलांना प्रेरणा देत आहे. वडील अरविंद उपाख्य भाऊसाहेब बोबडे हेही विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील ख्यातनाम वकील होते. महाराष्ट्र सरकारचे महाधिवक्ता म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. मोठे बंधू विनोद हेही सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील होते. असा संपन्न वारसा घेऊन न्या. शरद बोबडे भारताच्या सरन्यायाधीशपदी आरूढ होत आहेत. देशाच्या इतिहासातील महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सक्रिय सहभाग हे न्या. बोबडे यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. वर्षानुवर्षे चिघळलेल्या अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणातील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात ते होते आणि ऐतिहासिक ठरलेला एकमताचा निर्णय त्यांनी दिला. सरन्यायाधीश होण्याच्या अवघ्या आठवडाभर आधी एवढा महत्त्वपूर्ण निकाल देणारे ते पहिलेच सरन्यायाधीश असावेत. आधार कार्ड नसलेल्या नागरिकांना मूलभूत सेवांपासून आणि सरकारी सेवांपासून वंचित ठेवता येणार नाही, असा निर्णय न्या. बोबडे यांच्यासह तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिला होता. 22 वर्षे वकील आणि गेली वीस वर्षे न्यायाधीश म्हणून ते कार्यरत आहेत. विदर्भाने एवढे अनुभवी सरन्यायाधीश देशाला देण्याचा हा दुसरा प्रसंग आहे. याआधी, पन्नास वर्षांपूर्वी हिदायतुल्ला अकरावे सरन्यायाधीश झाले होते. ते मूळचे वैदर्भीय नसले तरी त्यांचे वकील आणि न्यायाधीश होणे विदर्भाच्या योगदानामुळेच शक्य झाले आहे. हिदायतुल्ला यांचा जन्म बैतुलला झाला. त्यांचे शालेय शिक्षण रायपूरला आणि महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झाले. त्यांनी वकिलीही नागपुरातच सुरू केली आणि ते महाधिवक्ता, हायकोर्ट न्यायाधीश आणि मुख्य न्यायाधीश या सर्व पदांवर नागपुरातच कार्यरत होते. आता न्या. बोबडे यांच्या काळात कोणते महत्वाचे निकाल लागतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
--------------------------------------------------------

0 Response to "सरन्यायाधीशांचे स्वागत"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel