-->
जिओने दात दाखविले / मंदी आणि मर्सिडिज

जिओने दात दाखविले / मंदी आणि मर्सिडिज

शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
जिओने दात दाखविले
आउटगोइंग कॉल मोफत देऊन देशातील दूरसंचार उद्योगातील समीकरणे बदलणार्‍या रिलायन्स जिओने आता त्यासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना धक्का दिला आहे. कॉल टर्मिनेशन शुल्काशी संबंधित नियमांमधील अनिश्‍चिततेमुळे रिलायन्स जिओ आउटगोइंग कॉलसाठी आता ग्राहकांकडून प्रति मिनिट सहा पैसे दराने शुल्कआकारणी करणार आहे. मात्र, आकारलेल्या शुल्काइतकाच डेटा मोफत देऊन त्याची भरपाईही करण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे सुरुवातीला फुकट देऊन ग्राहकांना आकर्षित करणार्‍या रिलायन्स जिओने आता आपले दात दाखविण्यास सुरुवात केली आहे. कंपनीच्या ग्राहकांना अन्य ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर करण्यात येणार्‍या कॉलसाठी काही रक्कम देणे बंधनकारक असेल, तोपर्यंत प्रति मिनिट सहा पैशांप्रमाणे ग्राहकांकडून शुल्कवसुली करण्यात येणार आहे. मात्र, हे शुल्क जिओच्या ग्राहकांनी अन्य जिओ यूजरच्या क्रमांकावर केलेले कॉल, व्हॉट्सअ‍ॅप, फेसटाइम आदी प्लॅटफॉर्मचा उपयोग करून करण्यात येणारे फोन आणि लँडलाइन कॉल्स आदींवर लागू होणार नसल्याचेही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी दूरसंचार नियामक ट्रायने इंटरकनेक्ट यूसेज चार्ज प्रति मिनिट 14 पैशांवरून घटवून सहा पैशांवर आणले होते. त्या वेळी हे शुल्क जानेवारी 2020पासून रद्द करण्याचीही घोषणा करण्यात आली होती. आता ट्रायने या संदर्भात शुल्क रद्द करण्यासाठी आणखी वेळ देण्याची आवश्यकता आहे का या विषयावर शिफारस मागवली आहे. जिओच्या नेटवर्कवर व्हॉइस कॉलिंग मोफत आहे. त्यामुळे कंपनीला भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया आदी अन्य ऑपरेटर्सना करण्यात आलेल्या कॉल्ससाठी 13,500 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. ट्रायच्या या भूमिकेमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जिओने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या नेटवर्कवर करण्यात आलेल्या कॉलसाठी प्रति मिनिट सहा पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथमच जिओच्या ग्राहकांकडून व्हॉइस कॉलसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. सध्या जिओतर्फे केवळ डेटासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारण्यात येते. कंपनीतर्फे देशभर कोठेही आणि कोणत्याही नेटवर्कवर व्हॉइस कॉलची सुविधा पूर्णपणे मोफत आहे. सध्या जिओच्या नेटवर्कवर अन्य स्पर्धक कंपन्यांकडून येणारे इनकमिंग कॉल मोफत आहेत. अशा प्रकारे रिलायन्सने ग्राहकांना आता लुबाडण्यास सुरुवात केली आहे. अन्य मोबाईल कंपन्या मात्र या सेवेसाठी ग्राहकांकडून काही पैसे आकारत नाही. मग रिलायन्स कसे घेते, असा देखील सवाल उपस्थित होतो. ग्राहकांना फुकट देऊन आपली मक्तेदारी निर्माण करावयाची व त्यानंतर दर वाढवत नेत गडगंज नफा कमवायचा हे रिलायन्सचे धोरण आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे टेलिकॉम उद्यागातील महानगर टेलिफोन निगम व भारत संचार निगम या दोन कंपन्या तोट्यात गेल्याने सरकार याच रिलायन्सच्या घशात घालण्यास सज्ज झाले आहे. कदाचित रिलायन्सने भविष्यात या दोन कंपन्या आपल्या ताब्यात आल्यावर भारतीय बाजारपेठ काबीज केल्यावर आपल्याला कुणीच स्पर्धक राहाणार नाही हे ओळखून आत्तापासूनच ग्राहकांना लुटण्यास सुरुवात केली आहे. 
मंदी आणि मर्सिडिज
सध्या जगात मंदीचे वारे असताना आणि आपल्या देशाच्या उंबरठ्यावर मंदी आलेली असताना आपल्याकडे सरकार मात्र मंदी असल्याचे काही मान्य करीत नाही. मात्र दुसरीकडे मंदी दूर होण्यासाठी उद्योगांना पॅकेजही देत आहे. या मंदीचा पहिला झटका वाहन उद्योगाला बसला आहे. मारुतीच्या विक्रीत 25 टक्के व टाटा मोटार्सच्या विक्रीत 50 टक्के एवढी विक्रमी घट झाली आहे. गेले सहा महिने वाहन उद्योगावर मोठे संकट आले आहे. सुमारे दहा लाख लोकांच्या नोकर्‍या यातून संकटात आल्या आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या दसर्‍याच्या दिवशी मर्सिडीज बेंझने मुंबई, गुजरात आणि देशातील इतर शहरांमध्ये एकाच दिवसात 200 हून अधिक गाड्या विकल्या. त्यामुळे मंदी कुठे आहे असे सरकार समर्थक पुन्हा एकदा बोलू लागले आहेत. मात्र त्यांनी एक बाब लक्षात घेेतली पाहिजे की, मर्सिडिजच्या ग्राहकाला मंदीचे काहीच देणे घेणे नाही. वाहन उद्योगात लक्झरी गाड्यांच्या विक्रीला फारशी झळ पोहोचलेली नाही, तीय यामुळेच. मारुती व टाटांच्या लहान व मध्यम आकारातील गाड्यांच्या विक्रीला सर्वाधिक फटका बसला आहे. याचे कारण म्हणजे, याचा ग्राहक हा मध्यमवर्गीय व निम्म मध्यमवर्गीय आहे. इटालीतील सुपरस्पोर्ट्स कार कंपनी लॅम्बोर्गिनीची विक्री या वर्षी सुमारे 30 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असा अहवाल काही दिवसांपूर्वीच आला होता. 2019 मध्ये 65 पेक्षा जास्त लॅम्बोर्गिनी गाड्यांची विक्री होऊ शकते, असा अंदाज आहे. यानुसार सरासरी दर आठवड्याला एक लॅम्बोर्गिनी विकली जातेय. या गाडीची किंमत 3 कोटींच्या आसपास आहे. दुसरीकडे वाहन क्षेत्रातील इतर कंपन्यांची अवस्था वाईट आहे. गेल्या काही महिन्यांत वाहनांची विक्री कमी झाल्याने विक्रेत्यांवरील बोजा वाढला आहे. परिणामी अनेक डिलर बंद होत आहेत. घटत्या विक्रीमुळे मारुती, ह्युंदाई, होंडा, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा या कंपन्यांनी अनेक दिवसांपासून उत्पादन बंद केले आहे. त्यामुळे एका दिवसात 200 मर्सिडिज विकल्या गेल्याने मंदी नाही ही मोजपट्टी लावणे चुकीचे आहे.
--------------------------------------------------------

0 Response to "जिओने दात दाखविले / मंदी आणि मर्सिडिज "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel