-->
भाजपाचा खरा चेहरा

भाजपाचा खरा चेहरा

सोमवार दि. 22 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
भाजपाचा खरा चेहरा
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी व भाजपाच्या भोपाळ येथील उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी देशाचे थोर सुपुत्र व दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्याविषयी काढलेले अनुद्गार पाहता भाजपाचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. हेमंत करकरे यांनी या खटल्यातील शोध मोठ्या धैर्याने लावून देशात सुरु असलेला भगवा दहशतवाद उघड केला होता. आज करकरे नाहीत, परंतु ते जर असते तर त्यांनी हा दहशतवाद जनतेसमोर उघड करुन दाखविला असता. त्यानंतर भाजपाचे सरकार आल्यावर ज्या हिंदुत्ववाद्यांवरचे खटले मोठ्या शिताफिने मागे घेण्यात आले किंवा हे खटले दुबळे करण्यात आले. परंतु हा भगवा दहशतवाद काही लपलेला नाही. तो भाजपाच्या व प्रज्ञा ठाकूर यांच्या रुपाने आज आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी करकरेंसंबंधी केलेल्या विधानावरुन स्पष्ट होते. करकरेंनी त्यावेळी भगवा दहशतवाद असे त्याचे जे नामकरण केले होते ते योग्यच होते हे आता पटत आहे. दहशतवादी ते भाजप उमेदवार या प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रवासात भाजपचे मोठे योगदान राहिले आहे. भाजपचा खोटा राष्ट्रवाद आणि बेगडी देशप्रेमाचा बुरखा आता फाटला असून शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणार्‍या प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देताना भाजपला लाज कशी वाटत नाही? भाजपाला याची जराही लाज असेल तर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांची उमेदवारीही रद्द करावी. परंतु भाजपा तसे करणार नाही. कारण अशा प्रकारे हिंदुत्ववादाला पोसून आपल्या मतपेट्या सुरक्षित राखण्याचे संकुचित काम भाजपा  करीत आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महाराष्ट्राचे महान वीरपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अवमान केला आहे. हा फक्त करकरेंचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशातील शहीदांचा अवमान आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवडणूक प्रचाराच्या भाषणात काही ठिकाणी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांचे फोटो लावून त्यातून मते मागण्याचा दळभद्रीपणा केला होता. एकीकडे आपण शहीदांचा सन्मान करीत मते मागायची तर दुसरीकडे शहीद झालेल्या करकरेंच्या विषयी अनुद्गार काढावयाचे, असे दुटप्पी धोरण भाजपाचे आहे. महाराष्ट्राचे वीरपुत्र शहीद हेमंत करकरेंचा अपमान करणार्‍या प्रज्ञा ठाकूरचा मुख्यमंत्र्यांनी अद्याप साधा निषेधही केला नाही. करकरे परिवाराने आपला कुटुंबप्रमुख गमावला त्याचे दुःख पचवताना एकच प्रामाणिक अपेक्षा ठेवली की आपल्या कुटुंबाच्या बलिदानाचा देशातील जनता आदर राखेल परंतु या भावनेलाच भाजपने बाधा पोहोचवली आहे. आता भाजपने शहीद करकरेंना देशद्रोही ठरवले आहे त्यामुळे त्यांच्या कुटुबियांना प्रचंड वेदना होत असतील, याची कल्पनाही न केलेली बरे. खरे तर भाजपाने साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर यांना उमेदवारी देवून आतंकवादाला समर्थन दिले आहे. या कसल्या साध्वी? त्या ज्या प्रकारे भाषा वापरतात त्याचा त्यांच्या स्वाध्वीपणाशी काडीचाही संबंध नाही. अतिरेक्यांना नेहमी अतिरेक्यांशीच जमते. म्हणूनच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतात पुन्हा मोदी सरकारच यावे असे म्हटले आहे. या साध्वीच्या रुपाने भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजप आतंकवादाशी लढत असल्याचे ढोंग करत आहे हे स्पष्ट असून भाजपचा खरा चेहरा काय आहे ते जनतेपुढे आले हे बरे झाले. माझ्या शापाने देशद्रोही हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे. मग यच प्रज्ञा ठाकूरांना कोणाच्या शापाने कॅन्सर झाला असे म्हटल्यास चालेल का? महाराष्ट्रात ईदच्या एक दिवस अगोदर मालेगाव मध्ये बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला तर कितीतरी लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे होता. तपासात मोटारसायकल ही साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर यांची होती हे निष्पन्न झाले होते. साध्वी प्रज्ञासिंग यांना मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक झाल्यावर करकरे यांच्याबाबत संशय व्यक्त केला होता. परंतु या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे करकरे यांनी अखेर शोधून काढलेच होते. दुर्दैवाने मुंबईतील अतिरेकी हल्ल्यात करकरे शहीद झाले त्यामुळे आपण एक कार्यक्षम अधिकारी गमावला होता. भाजपाच्या राजवटीत साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर या जामीनावर सुटल्या आहेत. परंतु त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही, हे भाजपाने लक्षात घ्यावे. मात्र भाजपने त्यांना उमेदवारी देवून दहशतवादाला खतपाणी घातले आहे, कारण अजूनही प्रज्ञा ठाकूर यांना न्यायालयाने निर्दोष सोडलेले नाही. शेवटी त्यांनी उमेदवारी मिळताच जे करकरेंविषयी गरळ ओकले ते पाहता, त्यांची नाळ ही भगव्या दहशतवादाशी जुळणारीच आहे. भाजप हेमंत करकरे यांचा देशद्रोही बोलून अपमान त्यांनी अपमान केला आहे. भाजपा प्रज्ञा यांना आज पाठीशी घालीत आहे, परंतु जनता या अतिरेकी प्रवृत्तीला थारा देणार नाही. जनता त्यांना निवडणुकीत झिडकारेल यात काही शंका नाही.
-------------------------------------------------------------

0 Response to "भाजपाचा खरा चेहरा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel