-->
महागाई...महागाई...

महागाई...महागाई...

रविवार दि. 06 ऑगस्ट 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
महागाई...महागाई...
----------------------------------------
एन्ट्रो- सध्या गगनाला भिडलेला कांदा सहा महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांनी त्याला दर नसल्यामुळे रस्त्यावर फेकला होता. त्यावेळी एक रुपया किलोवर कांदा आल्याने शेतकर्‍यांना हा रस्त्यावर फेकून देणे भाग पडले होते. आता हाच कांदा किंमतीची उच्चांक गाठीत आहे. अर्थात लहान व मध्य शेतकर्‍यांना याचा फायदा नाही. मोठा शेतकरी, ज्याच्याकडे माल साठवून ठेवण्याची क्षमता आहे, त्याचा यात फायदा झाला. त्याच्या जोडीला साठेबाजांनी आपले हात धुवून घेतले आहेत. एकूणच काय सरकारच्या नियोजनशून्यतेमुळे ही महागाई वेग घेऊ लागली आहे. मग कॉग्रेस व भाजपाची राजवट यात फरक तो काय?
----------------------------------------------------
केंद्रात भाजपाचे सरकार येऊन आता तब्बल तीन वर्षे लोटली आहेत. तीन वर्षापूर्वी भाजपाची सत्ता आल्यावर बिचार्‍या जनतेला आता आपल्यासाठी सुगीचे दिवस म्हणजे अच्छे दिन येणार अशी समजूत झाली होती. कारण कॉग्रेसच्या राज्यात महागाईने कहर गाठला होता व अनेक जीवनावश्यक वस्तू तसेच स्वैयंपाकाचा गॅस महाग होत गेला होता. आता या सर्व बाबींपासून दिलासा मिळेल असे जनतेला वाटत होते. निदान जनतेला तसे नरेंद्र मोदी यांनी आश्‍वासन तरी दिले होते. हे ते आश्‍वासन पूर्ण करतील असा विश्‍वासही त्यांना वाटत होता. कारण मोदींनी तसा माहोलच तयार केला होता. आपल्याकडे जादुची कांडी आहे व ती फिरवताच आपण जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक करु असे आभासी चित्र उभे केले होते. मात्र हा केवळ आभासच राहिला आहे. कारम सध्या महागाई दिवसेंदिवस भडकत चालली आहे. सर्वसामान्यांना त्यांचे जीवन हैराण झाले आहे. अशा प्रकारची महागाई कॉग्रसेच्या राज्यात तर होती आता भाजपाच्याही राज्यात कशी असा प्रश्‍न बिचार्‍या जनतेलाही भेडसावित आहे. आता सरकारच्या हातात फक्त दोन वर्षे राहिली आहेत. भाजपाचा मुख्य मतदार हा मध्यमवर्गीय आहे, शेतकरी व कामगार हा त्यांचा मतदार नाही. देशातील मध्यमवर्गीयांच्या भाजपाच्या सरकारविषयी अनेक अपेक्षा होत्या. मात्र आता त्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत घरगुती गॅस सिलिंडर 32 रुपयांपर्यंत महाग करण्याचा व गॅस सिलिंडरवरची दिली जाणारी सर्व सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपाच्या या मतदारांमध्ये संतापाची लाट उमटली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महागाई आणखीनच भडकणार यात काही शंका नाही. त्यामुळे हे सरकार आपले नाही व त्यांनी आपली केवळ फसगतच केली आहे. भ्रष्ट कॉग्रेसला बाजूला सारुन आपण भाजपाला सत्तेत आणले हे चांगेल झाले असले तरी आपला हा निर्णय चुकला हे वास्तव आता या जनतेला पटले आहे. हे नवे सरकार महागाई कमी करेल, पेट्रोलियम पदार्थांच्या किमतींवर नियंत्रण ठेवेल, भ्रष्टाचार कमी करेल, अशी अपेक्षा जनतेला होती. मात्र यासंबंधी मध्यमवर्गीयांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी विरोधात असताना त्यांनी तत्कालीन सरकारवर महागाईच्या प्रश्‍नावर चांगलेच धारेवर धरले होते. जनतेला यातून त्यंच्यावर विश्‍वास वाटू लागला होता. मात्र आता महागाईच्या प्रश्‍नावर हे सरकार पूर्णपणे फेल गेले आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतींच्या बाबतीतही असेच झाले आहे. खरे तर पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती या आन्तरराष्ट्रीय बाजारात ठरविल्या जातात. त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर व पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीवर परिणाम हा होत असतो. अशा वेळी ही वस्तुस्थिती समजून घेऊन त्यावेळचे सत्ताधारी असलेल्या कॉग्रेसला सहकार्य करण्याची मोदींची आवश्यकता होती. मात्र त्यांनी तसे न करता सरकारविरोधी रान पेटविले. आता नेमके त्यांच्याच विरोधात फासे पडले आहेत. कॉग्रेस विरोधात आहे व भाजपा सत्तेत आहे. जागतिक पातळीवर पेट्रोलियम पदार्तांच्या किंमती वाढल्या असताना मोदी देशात किंमती कमी करण्याची जादू करु शकत नाहीत. उलट सत्तेत आल्या आल्या या किंमती खालच्या पातळीवर गेल्या होत्या मात्र त्यावेळी भारतातील जनतेला हे दर कमी करुन दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. आता तर या किंमती कमी करणे अशक्य ठरणार आहे. 2009 ते 2011 या काळात आंतरराष्ट्रीय तेलबाजारात तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होत होती व सबसिडीचा बोजा अर्थव्यवस्थेवर पडत असल्याने विकास कामे रखडली जात होती. म्हणून त्या सरकारने तेलबाजारातील किमतीच्या चढउतारावर देशातील पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कमी- जास्त ठेवण्याचा निर्णय घेतला होता व हे काम टप्प्याटप्प्याने सुरू होते. पण 2011 नंतर आंतरराष्ट्रीय तेलबाजारातील कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी गडगडण्यास सुरुवात झाली आणि 2014मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर या कमी किंमतींचा लाभ मिळाला होता. मोदींनी त्यावेळी आपले नशिब चांगेल आहे असे म्हटले होते. मग आता मोदींचे नशिब फिरले आहे असे म्हणावे का, असा प्रश्‍न आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढत राहिल्या तर केरोसिन वापरणार्‍या गरीब वर्गाला घरात सिलिंडर येईल हे छोटे स्वप्नही पाहता येणार नाही. जर 2 कोटी कुटुंबांनी सबसिडी सोडून दिली असेल तर त्याचा फायदा गरिबांना देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. तसे न केल्यास केरोसिनवर सबसिडी अधिक असल्याने गॅसऐवजी केरोसिन वापरण्यवार या वर्गाला अन्य पर्याय उरणार नाही. पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतीबरोबरीने कांदा व टॉमेटोनेही किंमतीचा नवा उच्चांक गाठला आहे. टॉमेटो व कांदा महाग झाल्याने खरेदीदार मात्र एकीकडे हैराण झाला असताना ज्या शेतकर्‍याकडे आपल्या कृषी मालाची साठवणूक करण्याची क्षमता आहे तो शेतकरी मात्र आनंदी आहे. त्यामुळे मोठा शेतकरीच या लाभाचा धनी ठरला आहे. त्यामुळे सध्याची ही दरवाढ सर्व शेतकर्‍यांना लाभदायी ठरणारी नाही तर मोठ्या शेतकर्‍यांनाच याचा फायदा झाला आहे. पावसाने गुजरातमधील कांदा खराब झाला आहे. तर मध्यप्रदेश राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून 800 रूपये प्रतिक्विंटल दराने मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कांदा आपला किंमतीचा नवीन उच्चांक गाठला. मध्य प्रदेशातून या कालावधीमध्ये इतर राज्यात जाणारा कांदा रवाना झाला नाही. कांद्याच्या भावात तेजी दिसत असली तरी गेल्या पाच महिन्यांपासून साठवणूक केलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी आणत आहे. सरकारच्या नियोजनशून्यतेमुळे हे सर्व होत आहे. सध्याचे सरकार शेतकर्‍यांच्या मूळ प्रश्‍नाला हात घालून त्यांची सोडवणूक करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र ही अपेक्षा काही पूर्ण झालेली नाही. सध्या गगनाला भिडलेला कांदा सहा महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांनी त्याला दर नसल्यामुळे रस्त्यावर फेकला होता. त्यावेळी एक रुपया किलोवर कांदा आल्याने शेतकर्‍यांना हा रस्त्यावर फेकून देणे भाग पडले होते. आता हाच कांदा किंमतीची उच्चांक गाठीत आहे. अर्थात लहान व मध्य शेतकर्‍यांना याचा फायदा नाही. मोठा शेतकरी, ज्याच्याकडे माल साठवून ठेवण्याची क्षमता आहे, त्याचा यात फायदा झाला. त्याच्या जोडीला साठेबाजांनी आपले हात धुवून घेतले आहेत. एकूणच काय सरकारच्या नियोजनशून्यतेमुळे ही महागाई वेग घेऊ लागली आहे. मग कॉग्रेस व भाजपाची राजवट यात फरक तो काय?
-----------------------------------------------------------

0 Response to "महागाई...महागाई..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel