-->
झंझावती अम्मा

झंझावती अम्मा

संपादकीय पान बुधवार दि. 07 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
झंझावती अम्मा 
तामीळनाडूच्या मुख्यमंत्री व एकेकाळच्या दक्षिणेतील नामवंत अभिनेत्री जे. जयललिता यांच्या निधनामुळे तामीळनाडूमध्ये एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांच्या समर्थकांकडून ज्या प्रकारे शोक व्यक्त केला जात आहे ते पाहता जयललिता यांची लोकप्रियता किती होती याच अंदाज येऊ शकतो. तामीळनाडूत तर घराघरात आपल्या घरातील माणूस गेल्यासारखे चित्र आहे. महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्रीपदी असताना जे फार कमी राजकारण्यांचे निधन झाले त्यात त्यांचा समावेश झाला आहे. चित्रपटाच्या करिअरमध्ये यस मिळविल्यानंतर राजकीय कारर्किद सुरु करुन त्यात यशस्वी झालेले फार कमी राजकारणी आहेत, त्यात जयललितांचा समावेश होता. जयललिता यांचे राजकीय गुरु एम.जी. रामचंद्रन यांचे देखील तसेच होते. त्यांनी देखील दक्षिणेतील अनेक चित्रपटात कामे केल्यावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला व मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले होते. त्याच एम.जी. आर. यांच्या राजकीय वारस म्हणून त्यांना जनतेने स्वीकारले ते अगदी त्यांच्या निधनापर्यंत. जयललितांनी आपल्या राजकीय कारर्किदीत अनेक संघर्ष केले, त्यात त्यांना कधी यश तर कधी अपयश लाभले. अगदी मुख्यमंत्रीपदी असताना त्यांना पद सोडून जेलमध्ये जाण्याची पाळी आली, मात्र त्यातूनही त्या बचावल्या व पुन्हा मुख्यमंत्रीपदी आरुढ झाल्या. एकूणच त्यांचे जीवन संघर्षमय होते. कॉग्रेस असो वा भाजपा या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना त्यांनी राज्यात कधीच स्थीरावण्याची संधी दिली नाही. नेहमीच त्यांना जयललितांच्या किंवा द्रमुकच्या एम. करुणानिधी यांच्या पायाशी जाऊन सहकार्य करण्याची पाळी आली. अशा प्रकारे त्यांनी आपली तामीळी अस्मिता जपली. पूर्वीच्या म्हैसूर राज्यातील एका खेड्यात जयललिता यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा हे म्हैसूर घराण्याचे सर्जन होते. सुशिक्षीत व श्रीमंत म्हणून समजलेल्या गेलेल्या घराण्यातील त्यांचा जन्म होता. ज्याकाळी सहसा महिलांना चित्रपटात काम करणे कमीपणाचे समजले जाई अशा काळात त्यांनी चित्रपटात भूमिका केल्या. जयललिता यांचे तमीळ, तेलुगु, कन्नड, हिंदी, मल्याळम व इंग्रजी भाषांवर प्रभूत्व होते. शालेय शिक्षणापासून त्या शिक्षणात हुशार होत्या. मॅट्रीक पास झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली होती. महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच त्यांनी भारतनाट्यम तसेच विविध नृत्य प्रकारात त्यांनी प्रविण्य मिळविले. सुरुवातीला जयललिता यांनी नाट्यक्षेत्रात व नंतर सिनेसृष्टीत पदार्पण केले. 1965 साली त्यांचा पहिला तमीळ चित्रपट प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून त्यांचे एकेक चित्रपट हिट होऊ लागले. एम.जी.आर. आणि जयललिता यांची जोडी याच दरम्यान हिट झाली. 1966 साली त्यांचे प्रदर्शित झालेले सर्वच्या सर्व म्हणजे 11 चित्रपट सुपरहिट ठरले. त्यानंतर जयललिता व त्यांच्या समवेत असलेल्या एम.जी.आर. यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. दक्षिणेतील प्रत्येक भाषेतून त्यांनी चित्रपटात काम केले. फिल्मफेअर अवॉर्डपासून विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 1977 सालापासून त्यांच्या करिअरला राजकारणाची जोड मिळाली. एम.जी.रामचंद्रन यांनी स्थापन केलेल्या ए.आय.डी.एम.के. पक्षात त्यांनी प्रवेश केला. मध्यंतरीच्या काळात त्यांनी चित्रपट उद्योगाला रामराम केला आणि पूर्णवेळ राजकारणात प्रवेश केला. त्यांची 83 साली पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. 84 साली त्यांची राजयसभेवर नियुक्ती झाली व त्यांचे इंग्रजी चांगले असल्याने त्यांनी दिल्लीचा गड सांभाळावा असे रामचंद्रन यांना वाटे. त्याचवर्षी त्यांनी कॉग्रेससमवेत युती करुन राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली. खरे तर त्यावेळी त्यांचे रामचंद्रन यांच्याशी मतभेद होण्यास सुरुवात झाली होती. मात्र त्याच दरम्यान मुख्यमंत्रीपदी असलेल्या रामचंद्रन यांच्या निधनानंतर पक्षात उभी फूट पडली. रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली व जयललिता पक्षात एकट्या पडल्या. मात्र काही मोजके लोक त्यांच्या समवेत राहिले. त्यावेळी पंतप्रधान राजीव गांधी यांनी घटनेच्या 356व्या कलमाचा वापर करुन जानकी यांचे सरकार बरखास्त केले. 1989 साली तामीळनाडूत विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यात त्यांची विधीमंडळातील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. मात्र पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले व त्याचे नेतृत्व जयललिता यांच्याकडे आले. 1991 साली जयललिता यांची पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. त्यावेळी त्या राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरल्या होत्या. जयललिता यांनी राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक पावले टाकली. त्यात प्रामुख्याने मुलींचा घटलेला जन्मदर पूर्ववत होण्यासाठी योजना आणल्या तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास सर्व महिला कर्मचारी असलेल्या पोलिस ठाण्यांची निर्मिती केली. वाचनालये, विविध दुकाने, बँक, सहकारी संस्था यात महिलांची चालवाव्यात यासाठी प्रोत्साहन दिले. 96 साली राज्यात त्या टॉपला असताना विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा स्वत:चाही पराभव झाला व पक्षालाही अनपेक्षित पराभवाचा झटका सहन करावा लागला. मात्र 2001 सालच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाला पुन्हा विजयाकडे नेले व त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. 2014 साली त्यांना मुख्यमंत्री असतानाच मालमत्तेच्या हिशेबातील अनियमितता आढळल्याने न्यायालयाने जेलमध्ये पाठविले. मात्र त्यांची त्यातून सुटका झाल्यावर त्या पुन्हा मुख्यमंत्रीपदी रुजू झाल्या. त्यांचा एकूणच राजकीय चढउतार पाहाता त्यांचे आयुष्य हे सतत संघर्षमय राहिले. त्यात त्यांच्यावर अनियमित मालमत्तेचे आरोप झाले, मात्र त्यानंतरही त्यांची लोकप्रियता काही कमी झाली नाही. त्यांचे विरोधक जेवढे कडवे होते तसेच त्यांचे समर्थकही होते. त्यांच्या निधनामुळे दक्षिणेतील एक झंझावती नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
------------------------------------------------------

0 Response to "झंझावती अम्मा "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel