-->
ऐ दिलची मांडवली

ऐ दिलची मांडवली

संपादकीय पान मंगळवार दि. २५ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
ऐ दिलची मांडवली
पाकिस्तानी कलाकार असलेला ऐ दिल मुश्कील हा चित्रपट प्रदर्शित होण्याचा आता मार्ग शंभर टक्के मोकळा झाला आहे. खरे तर मनसेने ज्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची घोषणा केली त्याचवेळी हा चित्रपट नक्कीच प्रदर्शित होणार हे स्पष्ट झाले होते. मात्र त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मध्यस्थिने मांडवली करावी ही बाब दुदैवी म्हटली पाहिजे. आजवर कॉँग्रसेच्या राज्यात अशा प्रकारच्या धमक्या मनसे व शिवसेनेने दिल्या होत्या. मात्र त्यांनी त्यावेळी वैयक्तीक पातळीवर मांडवली केल्या होत्या सरकारने त्यावेळी कोणताही चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत ठाम भूमिका घेऊन सिनेमागृहांना संरक्षण दिले होते. मात्र यावेळी उलटेच झाले. मुख्यमंत्र्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व चित्रपट क्षेत्रातील नामवंतांची बैठक आपल्या निवासस्थानी बोलाविली व चर्चा केली. खरे तर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची बैठक बोलाविण्याची काहीच गरज नव्हती. आपण या चित्रपटास संरक्षण देऊ व याचे प्रदर्शन करु अशी ठाम भूमिका घेणे गरजेचे होते. त्याऐवजी मनसेने टाकलेल्या अटी या बैठकीत मान्य करण्यात आल्या व यापुढे पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणार नाही असे लेखी करण जोहर याने लिहून दिले. अर्थात करण जोहरचे पैसे या चित्रपटात लागले आहेत, त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्याला जे काही करणे शक्य होते ते त्याने केले. त्याचबरोबर उरी घटनेचा निषेध, आपण अस्सल भारतीयच आहोत असे सांगितले. खरे तर एखाद्या भारतीय नागरिकास, मग तो कोणत्याही धर्माचा असो, असे सांगण्याची वेळ यावी ही बाबच दुदैवी ठरावी. अशा प्रकारे आपण इथल्या कलाकारांवरही अविश्‍वास दाखवित आहोत. राष्ट्रप्रेम हे पाकिस्तानी कलाकार न घेतल्याने सिध्द होत असल्याने आता राष्ट्रवादाचे नियमच बदलले आहेत. आर्मि वेलफेअर फंडाला पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव हा तर हास्यास्पदच ठरावा. कारण अशा प्रकारे पैसे देऊन राष्ट्रवाद विकत घेता येतो हे सिध्द झाले आहे. म्हणजे जर पुढच्या वेळी कोणी पाकिस्तान कलाकार आपल्या चित्रपटात घेतलाच तर त्याची ही वेलफेअर फंडाची खंडणी बहुदा दहा कोटींवर जाईल, असेच दिसते. मुख्यमंत्र्यांनी एका संघटनेच्या दादागिरीपुढे झुकून मांडवली केल्याचा आक्षेप कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यांची ही भूमिका योग्यच आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी कायदा सुरक्षा व्यवस्था पाळताना आपल्याकडे हा चित्रपट प्रदर्शित करताना कोणत्याही अटी न लादता प्रदर्शित करण्याची तयारी ठेवली पाहिजे होती. या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साधला अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अर्थात यातून मनसे-भाजपा एकत्र येतील असे नव्हे. फक्त शिवसेनेेला खिजविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चांगलाच बाण मारला आहे. हा बाण शिवसेना प्रमुखांच्या जिव्हारी बसला. कारण उध्दव ठाकरे यांनीही या मांडवलीला विरोध केला आहे. असे असले तरी शिवसेनेचा पाक कलाकारांचा असलेला विरोध कायमच आहे. मुंबई वा आणखी एक-दोन महापालिकांसाठी भाजप थेट मनसेचा हात धरण्याची शक्यता नाही. कारण तसे केल्यास शिवसेना दुखावली जाऊन राज्यातील सरकार समोरचे पेच जसे आणखीन वाढतील तसेच मुंबईतील जो अमराठी मतदार सध्या भाजपच्या सर्वाधिक जवळ आहे तो अकारण दुरावला जाईल. एवढेच नव्हे तर तोंडावर असलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप विरोधकांना तो आयताच प्रचाराचा मुद्दा मिळेल. मनसेची यूपी-बिहारींबाबतची भूमिका सर्वश्रुत असल्याने आणि उत्तर प्रदेशातील निवडणूक भाजपच्या राष्ट्रीय राजकारणासाठी अत्यंत कळीची असल्याने तूर्त तरी भाजप मनसेला जवळ करण्याची शक्यता नाही. हे पाकिस्तानी कलाकार काही बेकायदेशीर भारतात अतिरेक्यांसारखे आलेले नाहीत. त्यांच्याकडे रितसर व्हिसा आहे व काम करण्याचे परमिट त्यांना भारत सरकारने दिले आहे. मग हे परमिट सरकार रद्द का नाही करीत? तसेच या सर्व कालाकारांचा व्हिसा भारत सरकारने रद्द करावा व त्यांना हाकलून द्यावे. उलट मोदी सरकारने अलिकडेच काही पाकिस्तानी कलाकारांना भारताचे नागरिकत्व बहाल केले आहे. अशा प्रकारे सत्ताधार्‍यांचा  राष्ट्रवाद हा नकली आहे. त्याचबरोबर या भूमिकेच्या विरोधी भूमिका मांडणारा मग तो हिंदू असला तरीही त्याला राष्ट्रविरोधी शिक्का मारण्याचे जे सध्या प्रयोग सुरु आहेत, ते घातकी आहेत. राष्ट्रवाद किंवा राष्ट्रप्रेम मोजण्याचे तंत्र म्हणजे पाकिस्तान विरोध हे समिकरण जणू तयार झाले आहे. जो पाकिस्तानची स्तुती करेल मग तेथील जनतेच्या चार चांगल्या गोष्टी जरी एखाद्याने सांगितल्या तरी तो राष्ट्रविरोधी ठरविण्याचे सध्या फॅड आले आहे. त्यासाठी सरकारची भूमिकाच कारणीभूत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकेकाळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी गुलुगुलू बोलत होते, मात्र अचानकपणे त्यांनी मैत्रीचे पाश तोडून संघर्षाची भूमिका घेतली. खरे तर ऐ दिलच्या चित्रिकरणाची सुरुवात झाली त्यावेळी मोदींचे नवाझ शरीफ यांच्यांशी सूर जुळले होते, मात्र हा चित्रपट प्रदर्शनास तयार झाला त्यावेळी उभय देशातील सुर बेसूर झाले होते. त्यामुळे हे सर्व रामायण झाले. जर उभय देशात चांगले संबंध असते तर हा चित्रपट सुरळीत प्रदर्शित झाला असता. पण तसे झाले नाही, मांडवलीचा तर प्रश्‍नच उद्दभवला नसता. मात्र तसे व्हायचे नव्हते. या मांडवलीच्या निमित्ताने सरकारला मांडवलीच्या विविध प्रश्‍नांची उत्तरे काळाच्या ओघात द्यावी लागणार आहेत.
------------------------------------------------------------------

0 Response to "ऐ दिलची मांडवली"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel