-->
रिओतून घ्यावयाचा धडा

रिओतून घ्यावयाचा धडा

संपादकीय पान बुधवार दि. २४ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
रिओतून घ्यावयाचा धडा
रिओ ऑलिंम्पिकचे अखेर सूप वाजले आहे. आपल्या ११७ खेळाडूंपैकी तब्बव ११५ खेळाडूंना हात हलवत परत यावे लागले. यातील किमान पाच खेळाडूंनी खर्‍या अर्थाने लढत दिली. त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांना सलाम. मात्र बहुतांशी खेळाडू हे स्पर्धेत कुठे विचारात घेण्याएवढेही दिसले नाहीत. आपल्या १२० कोटींच्या देशात आपण केवळ दोनच पदके मिळवू शकलो याचा विचार कधी करणार आहेत? गेल्या वर्षी आपला पदकांचा आकडा सहा होता. मात्र यंदा तर आपण अगदीच निराश कामगिरी केली आहे. रिओमध्ये बॅडमिंटन महिला एकेरीचे रौप्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू, महिला कुस्तीत कांस्य विजेती साक्षी मलिक यांची कामगिरी उत्तमच होती. तसेच ५२ वर्षांत भारताला पहिल्यांदा जिम्नॅस्टिकमध्ये सन्मान मिळवून देणारी दीपा कर्माकरला यश मिळाले नसले तरीही तिने दिलेली लढत लक्षणिय होती. सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करुन त्यांचा यशोचित सन्मान केला आहे. भारताचा उत्कृष्ट नेमबाज जितू रायलाही सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं आहे. खेलरत्नसाठी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याचे नाव देखील होते. पण ऑलिम्पिकमुळे त्याची दावेदारी कमकुवत बनली. बीजिंग ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देणार्‍या अभिवन बिंद्राचे रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न ०.१ गुणाने हुकले. फायनलमध्ये स्थान मिळवणारा स्टार नेमबाज अभिनव बिंद्रा १६३.८ गुणांसह चौथ्या स्थानावर फेकला गेला. मात्र त्याने दिलेली लढत कौतुकास्पद होती. कुस्तीमध्ये भारतासाठी पदकाचे आशास्थान असलेला मल्ल योगेश्वर दत्त पात्रतेच्या फेरीमध्ये पराभूत झाला. योगेश्वर दत्त पराभूत झाल्याने भारतीयांची आणखी एका पदकाची आशा संपुष्यात आली. यावेळी भारताचे ऑलिंपिकमधील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे पथक होते. २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये ८३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यावेळी भारताला ६ पदके मिळाली होती. यावेळी मात्र आपल्याला दोन पदकांवर समाधान मानावे लागले आहे. गेली सहा ऑलिंपिक खेळणारा लिअँडर पेस यंदा काही कमाल करू शकला नाही. लिएंडर पेस आणि त्याचा जोडीदार रोहन बोपण्णा यांना पुरुष दुहेरीच्या पहिल्याच मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर दुहेरी बॅडमिंटनमध्ये ज्वाला गुट्टा व अश्विनी पुन्नप्पा यांच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र, त्यांचीही कामगिरी समाधानकारक नव्हती. सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरे महिला डबल्समध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झाल्या. ललिता बाबर स्टीपलचेस स्पर्धेत १० व्या क्रमांकावर आली. मात्र तिचे यश म्हणजे ३२ वर्षानंतर एखादी भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोहचली होती. भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल रिओ ऑलिम्पिकच्या दुसर्‍या ग्रुप सामन्यात पराभूत होऊन ऑलिम्पिकमधून बाहेर पडली. जागतिक क्रमवारीत ६१ व्या स्थानावर असलेल्या युक्रेनच्या मारिया युलेटिनाने सायना नेहवालचा १८-२१, १९-२१ ने पराभव केला. टेनिसपटू लिएंडर पेस आणि त्याचा जोडीदार रोहन बोपण्णा यांना पुरुष दुहेरीच्या पहिल्याच मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा यांचे आव्हान संपुष्टात आले. भारतीय हॉकी पुरुष संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहचला होता. मात्र बेल्झियमकडून १-३ असा पराभव होताच भारताचे आव्हान संपुष्टात आले. भारतीय महिला हॉकी संघ ३६ वर्षानंतर ऑलिंपिंकमध्ये पात्र ठरला खरा पण रिओत भारतीय महिलांना एकही विजय मिळवता आला नाही. जपानविरूद्धची लढत २-२ अशी बरोबरीत राहिली. मात्र उर्वरत तीन ही सामने गमावले. दीपिका कुमारी या आघाडीच्या भारतीय महिला तिरंदाजाला वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी इव्हेंटमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. लांब उडीत भारताचा अंकित शर्मा क्वालीफाय राऊंडमध्ये बाहेर पडला. लैश्राम बोम्बायला देवी व दीपिका कुमारी या आघाडीच्या भारतीय महिला तिरंदाजांना वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी इव्हेंटमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. ऑलिंपिक स्पर्धेत ७५ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत भारताचा बॉक्सर विकास कृष्णन यादव पराभूत झाला. प्रतिकूल वातावरण आणि खडतर प्रतिस्पर्ध्यासमोर कडवी लढत देणारा भारताचा अतानू दास उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. एकूणच पाहता यंदा रिओत आपल्या पदरी निराशाच जास्त आली आहे. मात्र यासाठी आपणच जबाबदार आहोत. आजवर सरकारने खेळाकडे कधीच गांभीर्याने पाहिलेले नाही. आपल्याकडे एवढा मोठा देश असून आपण दरवर्षी केवळ ४८० कोटी रुपये फक्त क्रिडाच्या विकासासाठी खर्च करतो. तर आपला शेजारचा चीन दरवर्षी खेळांसाठी २२ हजार कोटी रुपये खर्च करतो. इंग्लेड तर ऑलिंम्पिकसाठी खेळाडू निवडून त्यांच्या विकासाठी प्रत्येक दहा कोटी रुपये खर्च करतो. आपण किती खर्च करतो? हा विचार कोणच करीत नाही. यात खेळाडूंना दोष देऊन काही उपयोग होणार नाही. खेळाडू जागतिक पातळीवर चमकण्यासाठी त्यांना तसे प्रशिक्षण द्यावे लागते. अर्थात हे आपल्याकडे कोणच करीत नाही. पुढील ऑलिंम्पिकची तयारी खरे तर आत्तपासून सुरु केल्यास जपानमध्ये भरणार्‍या २०२० सालच्या ऑलिंम्पिकमध्ये आपण चमकदार कामगिरी करु शकतो. त्यासाठी आत्तापासून खेळाढूंची निवड करुन त्यांच्याकडून तसा दररोज अभ्यास करुन घेतला पाहिजे. सिंधूच्या कोचने तिच्यासाठी घेतलेली मेहनत पाहिल्यास आपल्याला त्याची कल्पना येऊ शकते. आपल्या १२० कोटी लोकसंख्येच्या देशात आपल्याला २५ पदके मिळविणे सोपे नाही. मात्र त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी पाहिजे. सरकारने त्यासाठी इच्छाशक्ती दाखविली पाहिजे. अन्यथा रिओचीच पुनरावृत्ती जपानमध्ये होईल हे नक्की.
------------------------------------------------------------

0 Response to "रिओतून घ्यावयाचा धडा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel