-->
काश्मीरमधील धोकादायक स्थिती

काश्मीरमधील धोकादायक स्थिती

संपादकीय पान मंगळवार दि. २८ जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
काश्मीरमधील धोकादायक स्थिती
काश्मीर खोर्‍यात पाकिस्तानी ध्वज फडकाविणे ही काही नवीन बाब राहिली नाही. ज्यावेळी कॉँग्रेसचे सरकार सत्तेत होते त्यावेळी विरोधात असलेला भाजपा याबद्दल सतत आक्रमकपणे बोलून हे सत्ताधारी किती नालायक आहेत व पाकसमर्थक लोकांचे कसे समर्थन करतात असे सांगत असत. परंतु आता भाजपात केंद्रात आहे व राज्यातही सत्तेतील वाटेकरी पक्ष म्हणून सध्या आहे. अशा स्थीतीतही काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकविले गेले, यामागच्या कारणांचा अभ्यास भाजपाने केला आहे का, असा प्रश्‍न पडतो. पाकिस्तानी झेंडा आपल्या देशात फडकाविण्याच्या या घटनेचे कुणीही समर्थन करु शकत नाही हे वास्तव असले तरीही आता भाजपा सत्तेत असताना हे झेंडे का फडकाविले जातात, याचे उत्तर भाजपाने द्यायला हवे. पाकसमर्थक व काश्मीर खोर्‍यातील मुस्लिम विभाजनवाद्यांचा १९४७ पासून असाच परिपाठ राहिला आहे. परंतु गेल्या काही महिन्यांत इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड अल शानचा (इसिस) सुन्नी जहाल, दहशतवादी संघटनेचे काळे झेंडे फडकविण्याच्या घटना घडल्या आहेत. पश्‍चिम आशियातील या संघटनेने घातलेले थैमान जगाच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली आहे. पश्‍चिम आशिया, उत्तर आफ्रिकेसह जगातील ६२ देशांत इसिसकडून दहशतवादी कृत्ये घडवून आणली जात आहेत. इसिसचे जगात असलेले समर्थक आता काश्मीरमध्ये निर्माण होणे ही एक मोठी चिंतेची बाब ठरावी. नुकत्याच झालेल्या जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. यातून मार्ग काढण्यासाठी व या राज्यात सत्तते वाटेकरी होण्यासाठी आसुसलेल्या भारतीय जनता पक्षाने मुक्ती मोहंमद सैद यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीशी (जी.डी.पी.) या विभाजनवादी शक्तींशी जवळीक असलेल्या पक्षाशी युती करून सरकार बनविले. जमाते इस्लामी आणि हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांच्या बळावर मुक्ती आणि त्यांची कन्या मेहबूबा मुक्ती यांचे राजकारण चालले आहे. हे माहीत असतानाही भाजप तेथे सत्तेत सामील झाला. अपेक्षेप्रमाणे सहा महिन्यांतच राज्यातील परिस्थिती चिघळत गेली. अली शाह गिलानी, मिरवैझ उमर फारूक, यासिन मलिक यांच्या जाहीर मेळाव्यातून भारतविरोधी आग पेटविण्याचा प्रयत्न झाला. जम्मू- काश्मीरचा स्वतंत्र ध्वज राष्ट्रध्वजाच्या बरोबरीने फडकाविण्याचा प्रयत्न झाला. यानंतरही भाजपचे नेते मूग गिळून गप्प बसले. राज्यात दहशतवाद - विभाजनवादाला पुन्हा जोर आला. आता तर पाकिस्तानच्या झेंड्याबरोबरीने इसिसचे झेंडेही नाचविले गेले. १९८० व ९० च्या दशकातील हे विभाजनवादी नेतृत्व विश्‍वासार्हता गमावून बसल्याने काश्मीर खोर्‍यातील तरुणपिढीला आता अल् कायदा, तालिबान व इसिसच्या मार्गाचे आकर्षण वाटू शकते. इसिस ज्या वेगाने फैलावले ते लक्षात घेऊन छोटेसे काश्मीर खोरे आपण सहज हस्तगत करू, अशी त्यांची धारणा बनू शकते. त्यामुळेच श्रीनगर, अनंतनागमध्ये फडकणार्‍या इसिसच्या झेंड्यांची घटना दुर्लक्षिता येणार नाही. सौदी अरेबिया पुरस्कृत वहाबी सुन्नी इस्लामला सुफी इस्लाम मान्य नाही. काश्मीर खोर्‍यात सुफी संतांच्या दर्ग्यांचे महत्त्व संपविण्याची मोहीम यापूर्वीच सुरू झाली आहे. मुक्ती मोहंमद सैद यांचे दहशतवाद्यांशी मवाळ वागणारे सरकार आणखी काही काळ टिकले, तर या राज्यातील विभाजनवादी हिंसेचे परिमाण पूर्ण बदलून गेलेले असेल. भाजपाला आपल्या हिंदू-हिंदूच्या जपामुळे सर्व काही प्रश्‍न सुटतील असे वाटत आले आहे. परंतु यातून प्रश्‍न वाढत जाणार आहेत. यापूर्वीच्या सरकारने काश्मीर प्रश्‍न सोडविण्यासाठी फार मोठे काम केले असे नव्हे परंतु त्यांनी दुफाळी कशी कमी होईल हे तरी पाहिले. आता मात्र या राज्यातील दोन धर्मीयांतील दुफळी वाढत चालली आहे. काश्मीरमध्ये उशीरा का होईना रेल्वे पोहोचली. परंतु आता येथील तरुणांना काम देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. काश्मीरचा प्रश्‍न उद्भवण्याची जी अनेक कारणे आहेत त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे येथील तरुणांच्या हाताला काम नसल्याने तो तरुण अतिरेक्यांच्या हवाली पोहोचविला जातो. मात्र याचा विचार यापूर्वीच्या कॉँग्रेसच्या सरकारनेही नाही व आताच्या भाजापा-पीडीपीच्या सरकारनेही विचार केला नाही. काश्मीरमधील सर्वसामान्य जनतेला शांती हवी आहे. त्यांना पाकिस्तानमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नाही. कारण पाकिस्तानात आज ज्या दहशतवाद्यांच्या कारवाया चालल्या आहेत त्याचा विचार करता भारतातील स्थिती हजारपटीने चांगली आहे. अशा वेळी काश्मीरच्या विकासाला हातभार लागणे ही आजची गरज आहे. काश्मीरमध्ये विकासाची गंगा वाहून तेथील तरुणांना रोजगार तातडीने मिळण्याची गरज आहे. परंतु यादृष्टीने कोणच विचार करीत नाही. तेथील पाकधार्जिण्या अतिरेकी शक्ती या संपविल्याच पाहिजेत याबाबत काहीच शंका नाही. मात्र त्याचबरोबर या राज्यातील सर्वच शक्ती पाकधार्जिण्या नाहीत हे देखील लक्षात घेतले पाहिजे. इस्लामाबादमधील इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटीत अनेक कुख्यात दहशतवादी म्होरक्यांना दीक्षा देण्यात आली आहे. जॉर्डन, सीरिया, इराक, पॅलेस्टाईन, येमेन, सौदी अरेबिया आदी देशांबरोबरच अमेरिका व युरोपातूनही तेथे कडव्या इस्लामची शिकवण घेण्यास दाखल झाले. सीरिया व इराकमधील शिया वर्चस्वाच्या सरकारांविरोधात लढणार्‍या इसिसला सौदी अरेबिया व तुर्कस्तानचा छुपा पाठिंबा आहे. या संघटनेकडे असलेला पैसा व शस्त्रे त्याची साक्ष देतात. आता अमेरिकेबरोबरच ब्रिटननेही आयसिस विरोधात मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, इराक व सीरिया पलिकडे अफगाणिस्तान, तिथून पाकिस्तान व नंतर काश्मीर खोरे हे त्यांचे लक्ष आहे. आयसिसने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतून ते स्पष्ट झाले आहे. इसिसच्या आवाहनाला साद देण्यास भारतातील फक्त १४ जणच पुढे झाल्याचे आतापर्यंत माहीत झाले आहे. काश्मीरमधील ही धाकादायक परिस्थिती सरकारने ओळखून त्यादृष्टीने पुढील कारवाई करण्याची गरज आहे.
----------------------------------------------------------------------------

0 Response to "काश्मीरमधील धोकादायक स्थिती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel