-->
संपादकीय पान शनिवार दि. २० सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
फाजिल आत्मविश्‍वास
------------------------------
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी केंद्रात विराजमान झाल्यावर त्यांनी आपले अत्यंत जवळचे विश्‍वासू सहकारी अमित शहा यांच्याकडे सुत्रे सोपविली खरी पण शहांनी आपल्या पहिल्याच महाराष्ट्र दौर्‍यात मुळात युतीत दुही निर्माण करण्याचे संकेत दिले. केंद्रातील कॉँग्रसेच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारला पायउतार करण्यासाठी कॉंग्रेसमुक्त भारताचे आवाहन केल्यानंतर लोकांनी त्याला साद दिली. आता कॉंग्रेसमुक्तीची सुरुवात महाराष्ट्रापासून व्हावी आणि महाराष्ट्र भाजपयुक्त व्हावा, असे सांगत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारच्या प्रचारात शतप्रतिशत भाजपचा नाराही त्यांनी दिला. त्याचवेळी महायुती होताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखणारे जागावाटप व्हायला हवे, असे सांगत ताठ भूमिका कायम ठेवली. केंद्रात जशी जनतेने भाजपाला एकहाती सत्ता दिली तशीच सत्ता राज्यात मिळावी यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. त्यासाठी केंद्रात सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा वेळोवेळी व्यक्त केली होती. सुरुवातीला युतीतील जागा वाढविण्यासाठी दडपण निर्माण करावे या हेतूने ही भाषा भाजपावाल्यांनी केली असावी असा अंदाज होता. मात्र अमेत शहांच्या दौर्‍यातील तपशील पाहता भाजपा एकला जाण्यावर ठाम आहे असेच दिसते. शहा यांनी गुरुवारी सकाळी कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन घेत भाजपच्या प्रचाराची सुरुवात केली. त्यानंतर नगर जिल्ह्यातील चौंडी येथे आ. पंकजा मुंडे पालवे यांच्या संघर्षयात्रेच्या समारोपाला ते हजर होते. तर संध्याकाळी शहा यांची पुण्यात सभा झाली. त्यावेळी मुंबईचे मनसेचे आमदार राम कदम यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या जोडीला अनेक जण भाजपात प्रवेशकर्ते झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचे सरकार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी करताना महायुतीतील घटक पक्षांचा व राज्यातील प्रमुख मित्रपक्ष शिवसेनेचा नामोल्लेख टाळला. एवढेच नव्हे; तर १५ ऑक्टोबरला कमळावर बटण दाबण्याचे स्पष्ट आवाहन त्यांनी केले. शरद पवार व मंडळींचे राज्य संपवा. त्यांनी महाराष्ट्राला लुटले आहे. ११ लाख ८० हजार कोटींचा घोटाळा केला आहे. खरे तर जेथे आघाडीचे सरकार असते, तेथे विकासाची स्पर्धा असते. पण येथे दोन्ही कॉंग्रेसने लुटीची स्पर्धा केली. राज्यात ३५ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, १५ ते २० तास लोडशेडिंग सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. गुजरात आणि उत्तर प्रदेशातील विजय आता जुना झाला. या संपूर्ण दौर्‍यात अमित शहांची बॉडिलँग्वेज ही भाजपाने एकटे जाण्याविषयीची होती. त्यांनी महायुतीतल कोणत्याही पक्षांचा उल्लेख करणे टाळले. भाजपने युती तोडल्यास त्याचा त्यांना जबर किंमत मोजावी लागेल, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. युती तुटल्यास आपल्यालाच फायदा होईल असा शिवसेना व भाजपाचा हा दोघांचाही भ्रम आहे. भाजपचा इतिहास पाहता मराठी जनता मोदी-शहा या जोडीऐवजी बाळासाहेब ठाकरेंच्या वलयामुळे सेनेला प्राधान्य देऊ शकतात. मोदी लाटेच्या जीवावर उड्या मारणार्‍या राज्यातील भाजप नेत्यांना आपल्या संघटनेची महाराष्ट्रात काय क्षमता आहे याची जाणीव नाही. भाजपकडे राज्याची नस माहित नसलेला एकही नेता आता राहिलेला नाही. तळागाळातील नेता व बहुजनांचा चेहरा असलेल्या गोपीनाथ मुंडेंसारख्या वरिष्ठ नेत्यांचे निधन झाल्याने भाजप देवेंद्र फडणवीस व विनोद तावडेंसारख्या नवख्या व अननुभवी नेत्यांची हातात मोदी-शहा जोडीने दिला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे संघटनात्मक पातळीवर आजही मोठी ताकद आहे. शहरी भाग वगळल्यास भाजपकडे लढायलाही नेते नाहीत. तसे पाहता भाजपाचा राज्यातील चेहरा हा व्यापार्‍यांचे प्रतिनिधीत्व करणारा पक्ष व शहरातील लोकांचे प्रतिनिधीत्व करणारा पक्ष असाच राहिला आहे. त्यामुळे त्यांना सध्या विरोधी पक्षांतून नेते आयात करण्याची पाळी आली आहे. परंतु हे आयात केले जाणारे नेते पुढील काळात त्यांना महागात पडणार आहेत कारण सत्तेच्या आशेने आलेले हे मुंगळ्यांची भूक भाजपा कशी भागविणार हा सवाल आहे. भाजप स्वतंत्र लढल्यास मुंबई-ठाणे-नाशिक पट्टा, मराठवाड्यात पक्षाला मोठा फटका बसू शकतो. कोकणात पक्षाचे अस्ततिव मर्यादीतच आहे. पुणे शहरातील कोथरूड, कसबा-पर्वती मतदारसंघ सोडले तरी भाजपची पुणे जिल्ह्यात कोठेही प्रभावी ताकद नाही. विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात भाजपला एकट्याच्या बळावर यश मिळू शकते. मात्र त्या भागात जागाच मुळीच ९० च्या घरात आहे. त्यामुळे भाजप कोणत्या निकषावर स्वतंत्र लढण्याचा विचार करीत आहे याचा उलगडा होत नाही. सध्या भाजपा स्वतंत्र विदर्भाची भाषा मोठा आव आणून करीत आहे. मात्र याच मुद्यावर त्यांच्या अनेक जागा धोक्यात येऊ शकतात याचा त्यांनी काही अंदाज बांधलेला नाही. दिल्लीतील सत्ता नरेंद्र मोदी यांनी स्वबळावर खेचून आणली. मात्र ही लाट एवढी जबरदस्त होती की त्यात मोदींनी एखाद्या दगडालाही तिकिट दिले असते तरी तो निवडून आला असता. राज्यातील भाजपाच्या मोदीभक्तांनाही अशीच लाट राज्यात येईल व आपण सत्तेत येऊ असे वाटते. मात्र गेल्या शंभर दिवसात मोदींची लाट बर्‍यापैकी ओसरली आहे व नुकत्याच झालेल्या विविध राज्यातील पोटनिवडणुकात भाजपाला जबरदस्त फटका सहन करावा लागला आहे. याचे भान त्यांना महाराष्ट्रात राहिलेले नाही. त्यामुळेच अमित शहा यांनी आपल्या दौर्‍यात महायुतीवर नव्हे तर सर्व लक्ष भाजपावर केंद्रीत केले होते. त्यांचा हा फाजिल आत्मविश्‍वास आहे.
-------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel