-->
दिशादर्शक संवाद

दिशादर्शक संवाद

20 May 2020 अग्रलेख दिशादर्शक संवाद
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोमवारी चौथा लॉकडाऊन सुरु झाल्यावर राज्यातील जनतेशी साधलेला संवाद अतिशय संवेदनाशील जसा होता तसा राज्याला दिशादर्शकही ठरविणारा होता. विधानपरिषदेचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी सोमवारी शपथही घेतली होती, त्यानंतर राज्यपालांची सदिच्छा भेटही घेतली होती आणि भाजपाच्या सत्ताकांक्षेवर पाणी फिरविले होते. त्यामुळे राज्यातील राजकीय स्थैर्याचा विचार करता हा दिवस फार महत्वाचाही होता. या सर्व घटनांमुळे मुख्यमंत्र्यांच्या भाषणात एक नवा विश्वासही जाणवत होता. उध्दव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, त्याची आकडेवारी, नव्याने सुरु झालेले उद्योगधंदे, परराज्यातील मजुरांचे स्थलांतर, स्थानिकांची गावाकडे जाण्यासाठी असलेली ओढ, त्यातून उदभवणारे प्रश्न, नव्याने येणाऱ्या उद्योगांना दिल्या जाणाऱ्या सवलती या सर्व विषयांवर उहापोह केला. आपल्याकडे राज्यात कोरोनाचा प्रदुर्भाव प्रामुख्याने मुंबईसह प्रमुख महानगरात आहे. तसे असणेही स्वाभाविक आहे कारण आपल्याकडील शहरातील दाट लोकवस्ती. राज्यात सध्या 33 हजार रुग्ण असून त्यातील 20 हजार रुग्ण हे मुंबईतच आहेत. मात्र त्यापैकी साडे पाच हजार रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. त्यामुळे मुंबईत प्रत्यक्षात सुमारे 15 हजारच रुग्ण आहेत. राज्याचा विचार करता ऑरेंज व ग्रीन या विभागात आता बहुतांशी व्यवहार सुरु झाले आहेत. मात्र जिल्हाबंदी कायम आहे, कारण आपल्याला ग्रीन झोन तसेच राखून ऑरेंज आहेत त्यांना ग्रीन झोनकडे नेण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. तसेच जे रेड झोन आहेत ते प्रामुख्याने शहरी भाग आहेत, तेथील रुग्णसंख्या कशी कमी होईल त्यासाठी भविष्यात आखणी करावी लागणार आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत आपल्याला कोरोनावर मात करावयाची आहे, असे लक्ष्य ठेऊन आपण काम करीत असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आज रेड झोनमध्ये निर्बंध ठेवण्याची गरज आहे, कारण जर तेथे ढिलाई दिली तर लगेचच लोकांची हालचाल वाढेल व कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे, त्यामुळे हळूहळू निर्बंध सैल करत कोरोनाशी लढाई करणे हेच आपले धोरण असल्याचे ठाकरे यांनी सांगितले व ते योग्यच आहे. त्याचबरोबर राज्यातील सुमारे 50 हजार उद्योगधंदे सुरु झाले आहेत, त्यातील सुमारे 70 लाख लोकांचा रोजगार पुन्हा सुरु झाला आहे, ही फार महत्वाची माहीती त्यांनी दिली. पंतप्रधांनांनी आपल्या मागच्या 45 मिनिटांच्या भाषणात मजुरांच्या स्थलांतराच्या प्रश्नावर बोलण्याचे टाळले होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाला हात घालून केवळ भीतीपोटी राज्यातून पायी जाऊ नका असे आवाहनही केले. गेल्या काही दिवसात परराज्यातील सुमारे पाच लाख मजुरांना पुन्हा त्यांच्या राज्यात पाठविले आहे, ही आकडेवारी देताना त्यांनी कुणीही पायी जाऊ नये, प्रत्येकाची जाण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वस्थ केले. तसेच या सर्व मजुरांची तिकिटे मुख्यमंत्री सहाय्य निधीतून देण्यात आली आहे, हे सांगून त्यांनी भाजपाचा खोटारडेपणा उघड केला. मुख्यमंत्र्यांनी परराज्यातील मजुरांना दिलेला हा धीर फार मोलाचा ठरणार आहे. त्याचबरोबर राज्यातील लोक आपल्या गावी जाण्यास उत्सुक आहेत, प्रामुख्याने कोकणातील लोक दरवर्षी मुंबई, पुण्यातून आपल्या गावी जातात. त्यांनीही आपला धीर न सोडता पायी जाण्याचे टाळावे. हळूहळू प्रत्येकाची जाण्याची सोय करण्यात येणार आहे, हा मुख्यमंत्र्यांनी वडिलकीच्या नात्याने दिलेला सल्ला लोक एकतील अशी अपेक्षा आहे. चीनमधील अनेक उद्योगधंदे भारतात येणार व त्यातील बरेच उद्योग हे भाजपाशासित राज्यात जातील अशी हवा सोशल मिडियाच्या मार्फत भाजपाने निर्माण केली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, महाआघाडीचे सरकार आल्याचे राज्याचे किती मोठे नुकसान होणार आहे, हे जनतेला दाखविण्याचा भास निर्माण केला जात आहे. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शैलीत चोख उत्तर दिले आहे. राज्यात नवीन उद्योग यावेत व राज्यातील प्रगतीत त्यांचा हातभार लागावा हे धोरण असल्याने त्यासाठी या उद्योगांसाठी 40 हजार हेक्टर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे. जर संबंधीत उद्योगाला जमीन खरेदी करावयाची नसेल तर त्यांना भाडेपट्टीवर देण्याचाही तयारी राज्य सरकराने ठेवली आहे. त्याशिवाय त्यांना सर्व पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. विदेशी उद्योजकांचे व गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे भविष्यात राज्य सरकारने उद्योगासाठी ज्या पायघड्या घातल्या आहेत त्याचे स्वागत करुन उद्योग येथेच येतील असा विश्वास वाटतो. त्याचबरोबर आता मुख्यमंत्र्यांनी नाणारचे स्वागत करुन या प्रकल्पाचीही पुर्नस्थापना करण्याची घोषणा करावी, त्यामुळे उद्योजकांच्या मनात सध्याच्या सरकारबाबत विश्वास निर्माण होईल. शिवसेना वगळता आता या प्रकल्पाला कोणाचाही विरोध नाही. नारायण राणे यांनी देखील अलिकडेच या प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला होता. या प्रकल्पामुळे जसे कोकणाचे भले होणार आहे तसेच संपूर्ण राज्याच्या अर्थकारणालाही गती मिळणार आहे. कोरोनानंतर राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी उध्दव ठाकरे यांनी जी योजना आखली आहे ती गुंतवणूकदारांसाठी मोठी आकर्षक ठरावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कोरोनानंतर राज्य हे पुन्हा एकदा प्रगतीपथावर असेल, यात काही शंका नाही. कोरोनाची लढाई ही प्रदीर्घ काळ आहे व ती आपल्यालाच लढावयाची आहे. प्रत्येक जण यातील योध्दा असेल हे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे योग्यच आहे. एकूणच उध्दव ठाकरे यांच्या या संवादाने राज्यातील जनतेशी एक सुसंवाद साधला गेला व भविष्यातील राज्याची दिशाही समजली.

0 Response to "दिशादर्शक संवाद"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel