-->
विराट थाप!

विराट थाप!

शनिवार दि. 11 मे 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
विराट थाप!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर खोटे बोला पण रेटून बोला समोरच्याला खरे वाटते असा मंत्रच सर्व मोदी भक्तांना व भाजपावाल्यांना दिला होता. यानुसार गेली पाच वर्षे मोदींचा कारभार बिनबोभाटपणे सुरु आहे. आजवर अनेक बाबी मोदींनी बिनबोभाटपणाने रेटून खोट्या बोलून पचवून नेल्या आहेत. मात्र आता प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना त्यांनी थाप ही उघड पडली आहे. एकूणच पाहता मोदींचे ग्रह फिरलेले दिसतात असेच यातून म्हणावे लागेल. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या कौटुंबिक सहलीसाठी आयएनएस विराटचा टॅक्सीसारखा उपयोग केला, असा प्रचार सभेत आरोप केला. त्यांच्या या आरोपानंतर बहुदा गांधी घराण्याची पुरती बदनामी होईल व जनता सर्व मते कमळाला देईल असे त्यांना वाटले असावे. परंतु पंतप्रधानपदासारख्या जबाबदारपदी बसलेली ही व्यक्ती खोटे बोलतेय हे पाहणे जनतेच्या नशीबी आले. या आरोपाच्या चिंध्या-चिंध्या निवृत्त व्हाइस ऍडमिरल विनोद पसरिचा आणि निवृत्त नौदल प्रमुख एल रामदास यांनी केल्या आहेत. त्यांच्या स्पष्टीकरमानुसार, आयएनएस विराटवर पंतप्रधान राजीव गांधी सपत्निक आले होते हे खरे आहे, मात्र ते अधिकृत भेटीवर होते. आणि तेही फक्त दोन दिवसांसाठीच. आपल्या विधानाला बळकटी देण्यासाठी त्यांनी त्या भेटीचा फोटोही त्यांनी प्रसृत केला. राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीच्या काळात म्हणजे 1984 ते 1989मध्ये पसरिचा आयएनएस विराटचे प्रमुख अधिकारी होते. सर्व राजशिष्टाचार, नियमांचे पालन करूनच ही भेट झाली होती, आणि एकही विदेशी नागरिक व्यक्ती तेव्हा जहाजावर आली नव्हती, हे त्यांनी स्पष्ट केले. मोदी जेव्हा असले आरोप करतात तेव्हा एकच गोष्ट स्पष्ट होते, की त्यांना वाटते कुणालाही विकत घेता येते. त्यांच्यासाठी जशी न्यायालये, मिडिया वाकतात तसेच सैन्यही वाकू शकेल अशी त्यांची ठाम समजूत होती. विराटचा मार्ग बदलून गांधी कुटुंबियांसाठी ती वापरली गेली असा धांदात खोटा आरोप त्यांनी केला. विराट नौका लक्षद्वीपला दहा दिवस थांबवून घेण्यात आल्याचा विनोदी आरोपही त्यांनी केला. माजी नौदलप्रमुख ऍडमिरल रामदास यांनी स्पष्ट सांगितले आहे, विराटच काय कोणतेच नौदलाचे जहाज गांधी कुटुंबियांच्या व्यक्तिगत वापरासाठी कुठेही वळवण्यात आले नव्हते, आणि कोणत्याही नौदलाच्या जहाजावर विदेशी नागरिक व्यक्ती कधीही आल्या नव्हत्या. जे दोन दिवस राजीव गांधी विराटवर आले होते ते कशासाठी? तर त्रिवेंद्रममधील कार्यक्रमानंतर द्वीप-विकास मंडळाची सभा जी कधी अंदमानला होते, कधी लक्षद्वीपला होते, ती त्यावेळी लक्षद्वीपला होती. त्यासाठी त्यांनी विराटमधून प्रवास केला होता, हेही माजी ऍडमिरल रामदास यांनी स्पष्ट केले. लक्षद्वीपातील बंगाराम या बेटावर सुट्टीसाठी जाण्याची वेळ वेगळी होती. त्यात नौदलाचा संबंध कुटुंबियांशी नव्हता. पंतप्रधान म्हणून जी सुरक्षा देणे गरजेचे होते तेवढाच संबंध नौदलाचा होता. या सहलीचा रहाणे, जेवणे, प्रवास यातील सर्व  कुटुंबियांचा सर्व खर्च गांधी कुटुंबियांनीच दिला. राजीव गांधींबरोबर आयएनएस विराटवर सुट्टी घालविण्यासाठी इटलीवरून त्यांचे सासू-सासरेही आले होते. विदेशी लोकांना देशाच्या युद्धनौकेवर घेऊन जाणे हा देशाच्या सुरक्षेशी खेळ नव्हता का? केवळ राजीव गांधी यांच्या सासूरवाडीची मंडळी होती म्हणून त्यांना वेगळी वागणूक का देण्यात आली? या सर्व लोकांची ऊठबस करण्यासाठी आपल्या लष्कराला कामाला लावण्यात आले होते. लष्कराच्या हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींवर केलेले आरोप चुकीचे आहेत. एवढेच नव्हे तर, त्यामुळे नौदलाची बदनामी होत आहे, अशी प्रतिक्रिया देत निवृत्त अ‍ॅडमिरल आय. सी. राव यांनी नाराजी व्यक्त करणे स्वाभाविकच आहे. खरे तर संरक्षण आणि नौदलाच्या प्रोटोकॉलनुसार, कुठल्याही पंतप्रधानांच्या औपचारिक दौर्‍यावर युद्ध नौका किंवा हेलिकॉप्टर वापर करण्यात काही गैर नाही. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक असते. कारण खासगी हॉटेल्स किंवा गेस्ट हाऊसवर माहिती लिक होण्याची होण्याची भीती असतेे. लक्षद्वीप दौर्‍यावर राजीव गांधी असताना कुठलीही पार्टी झाली नव्हती, कोणीही परदेशी पाहुणे नव्हते. सोनिया गांधी आणि राहुल गांधींव्यतिरिक्त कोणीही ऑन बोर्ड नव्हते, असेही राव यांनी स्पष्ट केल्याने मोदी यांचा अशा प्रकारचा आरोप करुन राजकीय हेतू साध्या करण्याचा जाव होता हे सिध्द झाले आहे. राजकारणासाठी संरक्षण खात्याच्या नावाचा वापर होणे चुकीचे आणि निंदनीय आहे. पंतप्रधानपदासारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने याची काळजी घेण्याची जरुरी असते. गांधी परिवाराने दोन पंतप्रधान देशाला दिले. दोघांचीही हत्या झाली. एवढा मोठा त्याग या परिवाराने केल्यानंतर नरेंद्र मोदींच्या तोंडी अशी भाषा शोभणारी नाही. आपण पंतप्रधानपदावर आहोत. या पदावर असताना अधिक काळजी घेणे आवश्यक असते. मात्र अशी काळजी न घेता अशा प्रकारची भाषा मोदींकडून बोलली जात आहे, हे दुर्दैवी आहे.
------------------------------------------------------------

0 Response to "विराट थाप!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel