-->
कर्तृत्ववानांचा गौरव

कर्तृत्ववानांचा गौरव

सोमवार दि. 28 जानेवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
कर्तृत्ववानांचा गौरव
यंदा सरकारने दरवर्षी प्रमाणे प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंधेला पद्म पुरस्कार जाहीर केले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी राष्ट्पती प्रणब मुखर्जी, राष्ट्ीय स्वयंसेवक संघाचे नेते व समाजसेवक नानाजी देशमुख, संगीताचे जाणकार भूपेन हजारिका यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. तसेच अन्य झालेले पद्म पुरस्कार पाहता त्यावर संघाचे प्रभूत्व किंवा वरचश्मा जाणवते. खरे तर हे पुरस्कार देताना कोणतेही राजकारण असू नये अशी अपेक्षा असते. परंतु आजवर सर्वच सत्ताधार्‍यांनी यात राजकारण केले आहे. त्यामुळे यात भाजपाचे सरकार अपवाद कसे ठरेल, असाही प्रश्‍न आहे. त्यातच सध्याच्या सरकारमध्ये संघाचा वरचश्मा आहे. अनेक मंञालयात संघाने मोक्याच्या जागी आपली माणसे बसविली आहेत. त्यामुळे पद्म पुरस्कारातही त्यांचा बोलबाला राहणार हे ओघाने आलेच. असो. प्रणब मुखर्जी यांचे कत्वृत्व मोठे आहेच, यात काही शंका नाही. परंतु त्यांना काँग्रेसला डिचविण्यासाठी हा सन्मान केला गेला आहे हे देखील तेवढेच खरे. प्रणबदा हे इंदिरा गांधीचे निष्ठावान म्हणून ओळखले गेले होते. त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा ही काही लपून राहिली नव्हती. परंतु सोनिया गांधींनी त्यांच्याएवजी डॉ. मनमोहनसिंग यांना पंतप्रधान केले. नंतर प्रणबदांना राष्टपती करतानाही सोनिया गांधी मनापासून तयार नव्हत्या अशी चर्चा होती. प्रणबदांनी काँग्रेसमध्ये एकदा बंडखोरी करुन वेगळा पक्ष स्थापन केला होता, हा इतिहास सोनिया विसरल्या नव्हत्या. प्रबदांना आपल्यावर नेहमीच अन्याय झाला असे वाटत राहिले. यातूनच ते संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि काँग्रेसने त्यांच्यावर फुल्लीच मारली. त्यांची लेक माञ आजही काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत. भाजपाने, संघांने व मोदींनी प्रणबदांच्या या दुखर्‍या नसीवर बोट ठेऊन त्यांना मोठे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. आताचा सर्वोच्च पुरस्कार देण्यामागचे हेच राजकारण आहे. परंतु याचा भाजपाला फारसा फायदा होणार नाही. कारण प्रणबदा हे काही लोकनेते नाहीत. बरेचदा त्यांनी राज्यसभेचा मार्ग स्वीकारला होता. फक्त काँग्रेसची जिरवली याचा आनंद यातून मोदींना मिळेल एवढेच. संघाचे ज्येष्ठ नेते व समाजसेवक नानाजी देशमुख यांच्या कार्याचा खरे तर गौरव या पुरस्काने अगोदरच व्हायला पाहिजे होता. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या विरोधात  त्यांनी डाव्या व उजव्यांना एकञ आणण्याची किमया जयप्रकाशजींच्या सोबतीने करुन दाखविली होती. हिंगोलीत जन्मलेले नानाजी संघाच्या मुशीतून तयार झाले होते. जनता पक्षाचा प्रयोग अयशस्वी झाल्यावर माञ त्यांनी राजकारण सोडले व समाजसेवेला वाहून घेतले. त्यांना जनता दलाचा फसलेला प्रयोग व त्यावेळचे राजकारण त्यांच्या प्रकृतीला पटणारे नव्हते. यातूनच त्यांनी राजकारण सन्यास घेतला. ग्रामीण भारत स्वयंपूर्ण व्हावा यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले. चिञकूट येथे त्यांनी भारतीय संस्कृती व शिक्षण यात त्यांनी विपूल काम केले. 2010 साली त्यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. नानाजी हे एक भारतीय संस्कृती रुजवलेले मागच्या पिढीतील संघाचे निष्ठावान व महान नेते होते. त्यांच्या कार्याची या पुरस्काराच्या रुपाने नोंद मोदी सरकारने नोंद घेतली हे स्वागतार्हच आहे. अर्थात नानाजींचा त्याग व त्यांचे कार्य पुरस्काराने तोलता येणार नाही, हे देखील तेवढेच खरे आहे. संगीतातील एक जाणते व्यक्तीमत्व, गायक, गीतकार, दिग्दर्शक असलेले भूपेन हजारिका यांचा सरकारने योग्य असा सन्मान केला आहे.माञ यासाठी त्यांनी ईशान्य भारतात येऊ घातलेल्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीचा मूहुर्त काढला हे जरा खटकतेच. अर्थात यामुळे हजारिका यांचे महत्व कमी होत नाही, फक्त भाजपाच्या पुरस्कारातील राजकारणाची किव करावीशी वाटते. या पुरस्कारांच्या जोडीला मिळालेल्या पद्म पुरस्कारात महाराष्टातील नामवंतांचा समावेश आहे. यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, एल. अँड टी.चे अध्यक्ष अनिलकुमार नाईक, डॉ अशोक कुकडे, डॉ. कोल्हे दाम्पत्य, नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे, दिवंगत अभिनेते कादर खान, अभिनेता मनोज वाजपेयी, नाट्य अभिनेते दिन्यार कॉन्ट्क्टर, सुदाम काटे, गायक शंकर महादेवन, सामाजिक कार्यकर्ते शब्बीर सय्यद यांच्यासारख्या एकूण 113 जणांचा हा सन्मान करण्यात आला आहे. त्यात एका तृतीयपंथीयाचाही समावेश आहे. देशात प्रथमच तृतीय पंथीयाला हा सन्मान दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करावेसे वाटते. यावेळच्या पुरस्कारांवर संघाची छाप असली तरीही यावेळचे पुरस्कार कोणत्या वादाच्या भोवर्‍यात सापडतील असे दिसत नाही. त्याचबरोबर यावेळी महाराष्टातील 12 जण आहेत. शिवाय भारतरत्न मिळालेले नानाजी देशमुख हे महाराष्टाचेच आहेत. त्यामुळे यावेळी पुरस्काराच्या निवडीत राज्यावर कृपा झालेली दिसते. कदाचित यातून राज्याच्या निवडणुका जिंकण्याचा मनसुबा असावा. परंतु अशा पुरस्कांनी निवडणुका जिंकता येत नाहीत. सरकारचा उद्देश काहीही असो कत्वृत्वानांचा यशोचित सन्मान या पुरस्काराने झाला आहे, हे माञ मान्यच करावे लागेल.
-----------------------------+-

0 Response to "कर्तृत्ववानांचा गौरव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel