-->
पुन्हा सूर जुळले

पुन्हा सूर जुळले

सोमवार दि. 30 एप्रिल 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पुन्हा सूर जुळले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाझालेला दोन दिवसांचा चीनचा अनौपचारिक हार्ट टू हार्ट दौरा म्हणजे पुन्हा एकदा उभय देशांमध्ये निर्माण झालेल्या बेसुराचे स्वरुप बदलून सुर मिळविण्याचा केलेला एक प्रयत्न म्हणावा लागेल. अर्थात भारताने थोडा फार आगावूपणा केल्यामुळेच चीन गेल्या दोन वर्षात दुखावला होता. मात्र चीनला दुखावून चालणार नाही, हे भारतास म्हणजे मोदी यांना पटले असावे. चीन ही आज जगातली दुसरी मोठी अमेरिकेच्या खालोखाल असलेली महासत्ता आहे. भले आपली अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकावर असली तरीही चीनने जी मजल मारली आहे त्यातुलनेत आपण बरेच मागे आहोत ही वस्तुस्थिती नाकारण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे चीन आपला मोठा भाऊ आहे व आपल्याला आशिया खंडात सौहार्दानेच चीनशी संबंध ठेवून पुढे जायला पाहिजे, हे मान्य करावे लागेल. मात्र भारताने उगाचच गेल्या दोन वर्षात कुरापती काढण्यास सुरुवात केल्यावर चीनी ड्रॉगन चवताळणे स्वाभाविक होते. आता मात्र पंतप्रधान मोदींना हे वास्तव पटले असावे त्यमुळेच त्यांनी पुन्हा एकदा चीनबरोबर अनौपचारिक का होईना भेटीचा घाट घातला व संबंध सुधारण्यासाठी पावले टाकली. मोदींची ही बदललेली भूमिका स्वागतार्ह ठरावी. डोलकामसारखा प्रश्‍न पुन्हा उद्भवू नये व तणाव टाळावा यासाठी दोघांनीही आपापल्या लष्करासाठी मार्गदर्शक तत्वे घालून देण्यावर एकमत झाले आहे. त्याबाबतीत चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनीही सहकार्याची दाखवलेली त्तपरता वाखाणण्याजोगीच होती. उभय देशांच्या असलेल्या 3488 किमी लांब सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेऊन परस्परांना सातत्याने माहिती देण्याचे ठरले आहे. तरी देखील सीमेवर तणाव निर्माण झालाच तर तो चर्चेच्या मार्गाने सोडविण्यावर उभयतांनी भर दिला. एकूणच काय उभय देशातील सीमेवर तणाव कमीत कमी करणे व त्यासंबंधी वर्षानुवर्षे सुरु असलेल्या चर्चेच्या फेर्‍या सुरु ठेवणे हा उत्तम उपाय असल्याचे धोऱण जे कॉँग्रेसच्या काळात राबविले होते त्याच धोरणावर आता मोदींनी वेगळ्या भाषेत सहमती व्यक्त केली आहे. मागच्यावेळचा सीमेवरील तणाव हा भारताने केलेल्या धाडसामुळे झाला होता, हे बहुदा मोदींना मान्य झाले असावे. आता नव्याने जमलेला सूर संपूर्ण आशिया खंडासाठी फायदेशीर ठरणारा आहे. भारताने दुखावल्यामुळे चीनने पाकिस्तानशी जरा जास्तच लगट करण्याची भूमिका घेतली होती, त्यामुळे भारताच्या शेपटीवर पाय पडले होते. परंतु आता मात्र पाकिस्तानला बाजुला सारुन अफगाणिस्तानात भारताशी हात मिळवित आर्थिक विकासाचे प्रकल्प उभारण्याचे चीनने मान्य केले आहे. यापुढे उभय देशात कोणत्याही विषयावर वाद निर्माण झाल्यावर तो वाढू नये व त्याच्या मुळाशी जाऊन चर्चा करुन लगेच त्याची सोडवणूक व्हावी यासाठी सातत्याने संवाद साधण्याचे उभयतांनी मान्य केले आहे. दहशतवादविरोधी लढ्यात दोन्ही देशांनी परस्परांना मदत करण्यावरही मतैक्य केले आहे. जैश ए महंम्मद वा मसूद अझहर या कळीच्या मुद्यावर लगेचच चर्चा होऊन तातडीने काही निर्णय होतील अशी अपेक्षा ठेवणे चुकीचेच होते. परंतु दहशतवादी लढ्यात भारताबरोबर राहाण्याचे चिनने दिलेले आश्‍वासनही महत्वाचे ठरावे. एक महत्वाचे आहे की, गेल्या दोन वर्षात उभय देशात तणाव निर्माण झाल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम व्यापार-गुंतवणूक यावर होणे हे ओघानेच आले होते. परंतु आता तणाव निवळल्याने व्यापार व गुंतवणुकीच्या क्षेत्रात नवे पर्व सुरु होऊ शकते. मात्र आपल्या देशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह त्यांच्या काही हिंदुत्ववादी संघटनानांनी चीनी मालावर बहिष्कार टाकण्याची जी घोषणा मोठ्या आवेशात केली होती, त्याचे काय होणार असाही प्रश्‍न उपस्थित होतो. असो, भारत-चीनमधील तणाव या दौर्‍याने निवळण्यास निश्‍चितच मदत होईल तसेच गुंतवणुकीचे व व्यापारवृध्दीला गती मिळू शकेल. आशिया खंडात आज चीन दादा आहे व त्याचा धाकटा भाऊ म्हणून आपण वावरत आहोत. भविष्यात जर अमेरिकी अर्थव्यवस्थेला आव्हान द्यायची वेळ आली तर चीन व भारत एकत्र आल्यास देऊ शकतात. चीन सीमा प्रश्‍नावर जरी आक्रमक दिसत असला तरीही त्याला आपला भारताबरोबरच व्यापार व गुंतवणुक वाढवायची आहे. कारण चीनची क्षितीजे झपाट्याने विस्तारत आहेत व त्याकामी भारताची जोड मिळाल्यास पाहिजच आहे. चीनचा सीमा प्रश्‍न तेवता ठेवण्यापेक्षा डीप फ्रीजमध्ये ठेऊन उभयतांनी सहकार्यासाठी नवे पावले टाकली पाहिजेत. यातून आशिया खंडाचे हित आहे. शिवाय भारताच्या झपाट्याने वाढत असणार्‍या अर्थव्यवस्थेला ते फायदेशीर आहे. दोन्ही देशांकडे उज्वल संस्कृती आहे, आपण केवळ शेजारी नाही तर सांस्कृतिकदृष्टा खूप जवळचे आहोत. अशावेळी आपण उभय देश आशियात महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. आर्थिकृदष्ट्या जगावर सामर्थ्य गाजवायचे असेल तर भारत-चीनने एकत्र येऊन काम करणे गरजेचे ठरणार आहे. आज अनेक भारतीय कंपन्या बहुराष्ट्रीय झाल्या आहेत. तशाच किंवा त्याहून जास्त मोठ्या कंपन्या चीनमध्ये आहेत. हे जर दोन देश एकत्र आले तर जगावर आपला ठसा उमटवू शकतो, हे वास्तव उशीरा का होईना नरेंद्र मोदींना समजले हे बरे झाले. त्यादृष्टीने त्यांनी चीनशी मैत्रीचा हात पुढे केला आहे. चीनने देखील मागच्या कटू घटना विसरुन मैत्रीला साथ देण्याचे ठरविले आहे. उभय देशांच्या नेत्यांनी एकत्र येऊन टाकलेली पावले स्वागतार्ह ठरावीत.
--------------------------------------------------------

0 Response to "पुन्हा सूर जुळले"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel