-->
घारापुरीवरील नवी पहाट

घारापुरीवरील नवी पहाट

शनिवार दि. 24 फेब्रुवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
घारापुरीवरील नवी पहाट 
गेट वे ऑफ इंडियापासून अरबी समुद्रात हाकेच्या अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावर आता वीज पोहोचल्याने या बेटावर आता खरी पहाट उजाडली आहे, असे म्हणणावयास काही हरकत नाही. स्वातंत्र्यानंतर येथे वीज पोहोचलीच नव्हती असे नव्हे तर तेथे वीज पोहोचविण्याचे अनेक प्रयत्न झाले होते, मात्र ते शंभर टक्के यशस्वी झाले नव्हते. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते महावितरणच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण झाले आणि घारापुरी बेट वीजेने उजळून निघाले. घारापुरी बेटाचे एकूण क्षेत्रफळ साधारणतः 15 चौ.कि.मी. असून, तेथील लोकसंख्या सुमारे 950 इतकी आहे. घारापुरी बेट हे आर्थिक राजधानी मुंबईच्या जवळ असूनही काही अपरिहार्य कारणामुळे, विद्युतीकरणापासून, स्वातंत्र्योत्तर काळापासून वंचित राहिले, त्यामुळेच बेटाची प्रगती आणि पर्यटन विकासामध्ये अडसर निर्माण झाली होती. याआधी येथे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यात आले होते. परंतु, सदर प्रकल्प तांत्रिक अडचणीमुळे यशस्वी होऊ शकला नाही. परिणामी, पारंपरिक  स्रोताद्वारे घारापुरी बेटाचे 100 टक्के विद्युतीकरण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी महावितरणवर सोपविली. सद्यःस्थितीत 164हून अधिक कुटुंबे आणि दुकानांचे विद्युतीकरण झाले असून, हे सर्व ग्राहक अखंड विद्युत सेवेचा लाभ घेणार आहेत. महावितरणतर्फे राज्यात प्रथमच अशा पद्धतीने समुद्र तळाखालून केबल टाकण्याचे काम करण्यात आले असून, देशाच्या इतिहासात प्रथमच समुद्र तळाखालून सर्वात लांब केबल टाकण्यात महावितरण यशस्वी झाले आहे. याकामी सीआरझेड, वन विभाग, भारतीय नवसेना, भारतीय पुरातत्त्व विभाग, जेएनपीटी, सीडको, नवी मुंबई महानगरपालिका अशा विविध कार्यालयांची परवानगी मिळाल्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये या कामाची सुरुवात झाली होती. यामध्ये प्रामुख्याने 22 केव्ही, सिंगल कोअर केबल समुद्राखालून 7.5 कि.मी. टाकण्याचे काम करण्यात आले. सदर काम करण्यासाठी प्लाउड तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करण्यात आला. या कामासाठी 16 कोटी रुपये खर्च झाला. आता विद्युतीकरणामुळे घारापुरीच्या पर्यटनात लक्षणीय वाढ होणार आहे, यात काहीच शंका नाही. या घारापुरीची लेणी जगात प्रसिद्द आहेत. तसेच येथील प्रत्येक शिल्प हे बोलके आहे व येथे पुरातन काळापासूनचा इतिहास दडला आहे. भूतकाळात (घारा) पुरी हे इ .स 5 वे ते 7 वे  या शतकांच्या दरम्यान कोकणच्या मौर्यांच्या अधिपत्याखाली होते व उत्तर कोकणाची राजधानी म्हणून नावारुपाला आलेली होती. याचे अनेक पुरावे आजही या मातीत सापडतात. बदामीचा चालुक्य राजा पुलकेशिन ह्याच्या ऐहोळे येथे असलेल्या लेखात सुध्दा पुरीचा उल्लेख येता. या उल्लेखानुसार सहाव्या शतकात घनघोर नाविक युद्धानंतर पुलकेशिन याने मौर्यांची राजधानी पुरी हस्तगत केली या उल्लेखावरूनच तत्कालीन पुरीचे महत्व लक्षात येत. या शिवाय शिलाहारांच्या लेखातही (घारा ) पुरीचे अनेक उल्लेख सापडतात. पोर्तुगीजांच्या वृतान्त्तामध्ये घारापुरीचा उल्लेख आयलंड ऑफ पोरी असा करण्यात आलेला आहे. प्राचीन काळापासून येथे पोहचण्यासाठी मुंबई खेरीज उरण तालुक्यातील न्हावा-शेवा, मोरा या स्थळांचा वापर करण्यात येत होता. आजही घारापुरी हे बेट उरण तालुक्यातच आहे त्यामुळे हे बेट रायगड जिल्ह्याचा एक भाग आहे. घारापुरीची अजून एक असलेली ओळख म्हणजे सागरी बंदर, त्या काळी ज्या अरब व्यापारी व प्रवाश्यांनी या बेटाला भेट दिली, त्यांच्या वृत्तांतात या बंदरांचा उल्लेख आढळतो. इद्रिसीसाच्या वृतांतामध्ये पुरीचा उल्लेख संदबुर असा आला आहे. स्थानिक परंपरेनुसार घारापुरी हे संतापूर म्हणून ओळखले जात होत. असे अनेक घारापुरीचे महत्व विशद करणारे उल्लेख इतिहासाच्या पाना पानात आढळतात. घारापुरी बेट हे येथील लेण्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. 1987 साली या लेण्यांना युनेस्कोने  जागतिक वारसा म्हणून घोषित केले. लेण्यात असलेल्या एका प्रचंड आकाराच्या हत्तीच्या शिल्पावरून पोर्तुगीजांनी या लेण्यांना एलिफन्टा केव्हज् असे नाव दिले. एलिफंटा लेणी समूहात एकूण सात शैलकृत लेणी आहेत. त्यापैकी पाच शैलकृत लेणी पश्‍चिम टेकडीवर आहेत तर उरलेल्या दोन या पूर्वेकडील टेकडीवर आहेत. मुख्य लेणी मध्ये उत्तरेकडून प्रवेश केल्यानंतर प्रदक्षिणा मार्गाने जाताना पहिल्यांदा नजरेस पडते ते लकुलिशाचे शिल्प. त्यानंतर अनुक्रमे रावणानुग्रहाच, शिवपार्वती सारीपाट खेळतानाचे शिल्प लक्ष वेधून घेत. मंडपाच्या दक्षिणेकडील उल्लेखनीय शिल्पात अर्धनारीनटेश्‍वर , कार्तिकेय आणि भृंगी ,चतुर्मुखाचा  ब्रह्मदेव, यांचा समावेश होतो. मुख्य  मंडपातील आकर्षण म्हणजे सदाशिवाची मूर्ती. या कलाकृतीत  शिवाला तीन मुख दाखविण्यात आले आहेत. म्हणूनच हे शिल्प त्रिमूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे, या शिल्पात  डावीकडे अघोर (रुद्र) रूप आहे. त्याच्या मुकुटात साप, विंचू आणि मेलेल्या माणासाचे शिर आहे. हातात फुत्काराने फणा उभारलेला नाग, तिसरा डोळा आणि पिळदार मिशा पाहून चेह-यावरचा रुद्र भाव लक्षात येतो. म्हणूनच या मूर्तीला अघोर किंवा भैरव असे  म्हणतात. मधला चेहरा शांत निरामय आहे. त्याला  तत्पुरुष महादेव असे म्हणतात. इंग्रजांनी 1904 व 1917 साली दोन प्रचंड लोखंडी तोफा घारापुरी माथ्यावर बसविल्या. उत्तर-दक्षिण दिशेला बसविण्यात आलेल्या दोन्ही तोफांना समांतर भुयारी मार्गही बनविले गेले. तसेच दारूगोळा ठेवण्यासाठी व पुरविण्यासाठी खंदकही ह्याच काळात खोदण्यात आले. स्वातंत्र्यानंतर येथे आपण पूर्णपमे दुर्लक्षच केले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आता मात्र येते वीज पोहोचल्यामुळे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर एक चांगले पर्यटन केंद्र म्हणून विकसीत होण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. घारापुरीवरील ही नवी पहाट निश्‍चितच प्रेरणादायी ठरावी.
---------------------------------------------------------------------------------------

0 Response to "घारापुरीवरील नवी पहाट "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel