-->
गुजरातमध्ये काय होणार?

गुजरातमध्ये काय होणार?

मंगळवार दि. 12 डिसेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
गुजरातमध्ये काय होणार?
सध्या राजकीय पातळीवर देशात एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे, गुजरातमधील निवडणुकीत काय होणार? भाजपा पुन्हा सत्तेत येणार की कॉग्रेस 22 वर्षांच्या वनवासानंतरक सत्तेची पायरी चढणार? कधी नव्हे ते गेल्या चार वर्षात प्रथमच काही अंदाज व्यक्त करणार्‍या कंपन्यांनी कॉग्रेस बहुमताच्या जवळ पोहोचणार असे अंदाज व्यक्त केले आहेत. अर्थात त्यामुळे भाजपाचा येथे पराभव नक्की असे म्हणणे म्हणजे भ्रम ठरेल. आता पहिल्या टप्प्यातील मतदान झाले असून दुसरा टप्पा पार पडल्यावर 18 तारखेला मतमोजणी होईल. त्यावेळी तर सर्व चित्र स्पष्ट होईलच, मात्र यावेळी कॉग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी भाजपाचा चांगलाच घाम काढला आहे व ही निवडणूक त्यांच्यासाठी मोठी आव्हानात्मक ठरली आहे. अर्थात राहूल गांधी यांच्यावर जेवढी भाजपा टिका करणार आहे तेवढे त्यांच्यातील नैराश्य जवळ आल्याचे दिसते. गुजरातमधील या रणसंग्रामापुढे हिमाचलप्रदेशातील निवडणूक अगदीच झाकोळली गेली आहे. असो, परंतु या निवडणुकीचे निकाल काहीही लागोल राहूल गांंधी यांचे नेतृत्व या निमित्ताने देशापुढे आले आहे. ज्यांना भाजपाने पप्पू म्हणून हिणवले त्यांनींच एक मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे करावे हा एक मोठा बदल आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा बदल गेल्या तीन वर्षात झालेला आहे. राहुल गांधी यांनी दाखविलेली जिगर आणि त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे भाजपामध्ये भयमिश्रित आश्‍चर्याची भावना आहे. पटेलांच्या मुद्द्यावरून जातीचे समीकरण संपूर्णपणे बिघडल्याची हळहळ भाजप नेतृत्वात आहे. स्थानिक नेतृत्व फारसे प्रभावी नसल्याची तक्रार आहे. 2013 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये चांगले यश मिळविल्यानंतर आता भाजपात प्रथमच चिंतेचे वातावरण आहे. मात्र कॉग्रेसकडे ही निवडणूक जिंकण्यासाठी यंत्रणा आहे का? असा सवाल आहे. कारण गुजरातमध्ये कॉग्रेसची गेल्या 22 वर्षात मोठी पडझड झालेली आहे व त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज शिल्लक राहिलेली नाही. अर्थात यावेळी पाटीदार समाज, दलित हे मोठ्या प्रमाणावर त्यांच्या जोडीला आल्यामुळे त्यांची फौज त्यांना उपयोगी ठरु शकते. मात्र या जर तर च्या गप्पा झाल्य. मोदी- शहा यांच्या नेतृत्वात अन्य राज्यांमध्ये भाजपने लढलेली निवडणूक आणि गुजरातची निवडणूक यांत फार मोठा फरक आहे. ही निवडणूक भाजप विजयासाठी फारशी पसंती नसलेला पक्ष म्हणून नव्हे, तर सत्तेचा प्रमुख दावेदार तसेच सत्ताधारी पक्ष म्हणून लढत आहे. गुजरातची स्थिती वेगळी आहे. केंद्रात आणि गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. एवढेच नव्हे, तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच दोन्ही ठिकाणी नेते आहेत. पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष गुजरातचे आहेत. मोदींनी जी गुजरात मॉडेलची हवा निर्माण केली होती ती तेथे आजही आहे का, ते आता समजणार आहे. त्याचबरोबर हे मॉडेल देशात नेण्याचा त्यांचा संकल्प होता. परंतु जर भाजपाचा गुजरातमध्ये पराभव झाला तर या मॉडेलला जनतेने तेथेच नाकारले असा त्याचा अर्थ होईल. तेथील व्यापार-उदीम आणि उत्पादकतेवर आधारित अर्थव्यवस्थेचा विकास जिथल्या तिथे थांबला आहे. यामुळे तरुणांमधील अस्वस्थता वाढली आहे. प्रामुख्याने नोटाबंदी व जी.एस.टी चा मोठा फटका येथील व्यापारी वर्गाने सहन केला आहे. राज्यातील कापड उद्योगावर मोठे संकट आले आहे. गुजरात मॉडेल या शब्दाने 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांना सत्तेच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या कार्यकाळात उद्योग, कृषी आणि पायाभूत विकासाच्या क्षेत्रात उदंड प्रगती झाली. ऊर्जा आणि सिंचन क्षेत्रात प्रशासकीय पातळीवर काही मोठ्या आणि नावीन्यपूर्ण सुधारणा झाल्या. उद्योजकांचे प्रेमळ पाठबळही मोदी यांच्यामागे होते. यामुळे यूपीएच्या दहा वर्षांच्या राजवटीला कंटाळून मतदारांनी मोदींना निवडून दिले. गुजरातमधील दंगलींच्या आठवणी मागे टाकत मोदी यांचे विकास पुरुष असे झालेले नवे ब्रँडिंग मान्य करून जनतेने त्यांच्यावर विश्‍वास दाखवला. असे असले तरीही गेल्या दोन आठवड्यांत गुजरातमधील रणधुमाळीत विकास हा शब्द पार हद्दपार झालाय. ज्या गुजरात मॉडेलने मोदी यांना केंद्रात सत्ता मिळवून दिली, त्याचा साधा उल्लेखही या काळात झाला नाही. राहुल गांधी आणि त्यांच्या चुका, औरंगजेब, खिलजी, नेहरू आणि सोमनाथ मंदिर, राहुल यांनी कोणत्या रजिस्टरमध्ये स्वाक्षरी केली, सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशीद वादावर कपिल सिब्बल काय म्हणालेत, यावरच सारा प्रचार झाला. प्रचाराचा लोलक 2002 प्रमाणे पुन्हा मोदी आणि विरोधकांची ओळख, अल्पसंख्याकांचा विरोध आणि काँग्रेसचा कुटुंबवाद याच भोवती फिरला. गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस गुजरातमध्ये सतत परभूत होत आला आहे, याची जाणीव आहे. तरीही या पक्षाची 40 टक्के पक्की मते आहेत. यामुळे हा पक्ष एक शक्ती आहेच. 18 डिसेंबरला निर्णय काहीही लागो, राहुल गांधी यांचा एकप्रकारे विजयच झाला आहे. भाजपसारखा शक्तिशाली आणि वर्चस्व असलेला पक्ष लोकसभेत केवळ 46 खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्यावर टीका करण्यात सर्व वेळ खर्ची घालत आह, हाच कॉग्रेसचा व राहूल गांधींचा विजय ठरावा.
-----------------------------------------------------------------------

0 Response to "गुजरातमध्ये काय होणार?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel