-->
बाय, बाय, मान्सून...

बाय, बाय, मान्सून...

संपादकीय पान मंगळवार दि. १८ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
बाय, बाय, मान्सून...
नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांनी आता महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. यंदा दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर उशीरा म्हणजे १९ जूनला सुरु झालेला मान्सून तब्बल १२० दिवसांच्या मुक्कामानंतर महाराष्ट्रातून परतल्यानंतर यंदाच्या पावसाळ्याचा अधिकृत शेवट झाला आहे. राज्याच्या सरासरीच्या तुलनेत यंदा ९७.४ टक्के पाऊस झाला. कोकण आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त अनुक्रमे ११५.८ आणि ११६.९ टक्के पाऊस नोंदला गेला. त्यामुळे यंदाचा पावसाळा हा दिलासादायक ठरला आहे. यंदा पावसाने किमान सरासरी तर गाठलीच उलट काही ठिकाणी सरासरी देखील ओलांडली. ज्या अनेक भागात गेली तीन वर्षे पावसाने आपले तोंडही दाखविले नव्हते तेथे यंदा पूर स्थिती आली होती. त्यामुळे आता पावसाला बस्स म्हणण्याची पाळी काही भागात आली होती. मान्सूनचा महाराष्ट्रातील परतीचा प्रवास १४ ऑक्टोबरला सुरू झाला. दोनच दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी फिरला आहे. महाराष्ट्राबरोबरच बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, छत्तीसगड तसेच पश्चिम बंगालसह ईशान्य भारतातील राज्यांमधूनही मान्सूनने काढता पाय घेतला. आता केवळ आंध्र प्रदेश व कर्नाटकचा काही भाग आणि तामिळनाडू, केरळ व अंदमान-निकोबर बेटांवर मान्सून आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या भागातूनही तो परत फिरण्यासाठी अनुकूल हवामान स्थिती आहे. गेल्या आठवड्यापासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे पडसाद राज्यात दिसले आहेत. राज्यात कोठेही दमदार पावसाचे वृत्त नाही. गेल्या २४ तासांत कोकण-गोव्यातील तुरळक ठिकाणच्या पावसाचा अपवाद वगळता राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे होते. पुढच्या दोन-तीन दिवसांत संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. यंदाच्या पावसाळा कोकण आणि मराठवाड्यासाठी सर्वाधिक समाधानकारक ठरला. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरी ११३६.३ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या वर्षी राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत फक्त ७७ टक्के पाऊस झाला होता. यंदाच्या पावसाची टक्केवारी ९७.५ आहे. कोकणात ३ हजार ४९९ मिलिमीटर पाऊस झाला. नाशिक विभागात ६८५ मिलिमीटर, पुण्यात ८६६ मिलिमीटर, तर औरंगाबाद विभागात ८७८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अमरावती आणि नागपूर विभागात अनुक्रमे ७९८.४ व १०४२.७ मिलिमीटर पाऊस झाला. राज्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या धरणांची संख्या ३ हजार ५२८ आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठा ३३ हजार ५४० दशलक्ष घनमीटर एवढा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवसात राज्यातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी फक्त ४४.३४ टक्के होती. यंदा यात तब्बल ४० टक्क्यांची वाढ झाली असून ती आता ८३.७६ टक्के झाली आहे. त्यामुळे राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळपास मिटला आहे. राज्यात सर्वदूर यंदा समाधानकारक पाऊस झाला. सह्याद्री डोंगररांगावर मात्र पावसाचा अभूतपूर्व जोर होता. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वसलेल्या पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमधल्या कित्येक गावे आणि वाड्यावस्त्यांना तीन हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाने झोडपून काढले. यंदा अगदी वेळेत म्हणजे १८ मे रोजी अंदमानात पाऊस दाखल झाला. त्यानंतर  ८ जूनला पावसाने केरळ किनारपट्टी ओलांडली व १९ जूनच्या आसपास तळकोकणात मान्सूनचे आगमन झाले. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी आसुसलेला होता. मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी भागात दुष्काळी स्थिती होती. या पार्श्‍वभूमीवर २१ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला गेला. यंदा कसा पाऊस पाऊस पडेल या विषयी शंका व्यक्त होत होती. गेले दोन वर्षे देशातील पावसावर अल् निओचा प्रभाव होता. यंदा हा प्रभाव कमी होईल व चांगला पाऊस पडेल हा हवामान खात्याचा अंदाज होता. परंतु हवामान खात्याच्या अंदाजावर कोणाचा विश्‍वास बसत नाही. यंदा मात्र हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. यंदा राज्यातील चार ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यात रत्नागिरीतील शिरगाव (९ हजार ५०४ मिमी.), सातार्‍यातील लामज (८ हजार ३० मिमी.), सिंधुदुर्गातील
आंबोली (६ हजार ८५६ मिमी.) व सातार्‍यातील महाबळेश्वर (६ हजार ८३२ मिमी.) यांचा समावेश होता. त्यामुळे यंदा सुखद धक्का देऊन पावसाळा आता परतला आहे. गेल्या वर्षी पावसाळा समाधानकारक नव्हता. यंदा कसा असेल त्यावर अनेकांना शंका होत्या कारण शेतीचे मोठे नुकसान त्यात झाले होते. तसेच मोठ्या शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत होते. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकर्‍यांची पिके गेल्या वर्षी हातातून गेल्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले होते. आता निदान त्यांचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा करता येईल. यंदाच्या चांगल्या पावसाळ्यामुळे विविध पिकांचे उत्पादन वाढणार आहे. पावसाने जाताना काही भागात नुकसान केले असले तरीही त्याने फारसा काही फरक पडणार नाही असे सध्या तरी दिसते आहे. त्याचबरोबर यंदा राज्यातील बहुतांशी तलाव तुडुंब भरले आहेत. त्यातील पाण्याच्या साठ्याचा योग्य विनिमय होऊन पाण्याचे वाटप समान तत्वावर केल्यास पाणी टंचाईच्या झळा जाणवणार नाहीत. सरकार यावेळी समन्यायी पाणी वाटप करणार किंवा नाही हा सवाल आहे. अनेक ठिकाणी यावेळी जलसाठ्यात वाढ झाली आहे, तसेच पाण्याची पातळी वाढली आहे. लातूरसारखी भीषण दुष्काळाच्या झळा लागलेल्या शहरात यंदा पूर आला होता. पावसाला बाय बाय करताना सरकारने समन्यायी पाणी वाटक केल्यास यंदाच्या वाढलेल्या पावसाच्या सरासरीचा उपयोग होईल, हे लक्षात ठेवले पाहिजे.
--------------------------------------------------------------

0 Response to "बाय, बाय, मान्सून..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel