-->
आता २४ तास खुले...

आता २४ तास खुले...

संपादकीय पान शनिवार दि. ०२ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आता २४ तास खुले...
मध्यंतरी शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरातील सर्व दुकाने, मॉल्स, थिएटर्स २४ तास खुली ठेवण्याचा आग्रह धरला होता. परंतु आदित्यचा हा बाल हट्ट राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी काही पुरविला नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो पुरविला आहे. केंद्र सरकारने देशातील दुकाने २४ तास व आठवडयाचे सातही दिवस खुली ठेवण्याच्या कायद्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार दुकाने, मॉल्स व चित्रपटगृहे सातही दिवस २४ तास खुली ठेवता येऊ शकतील. या कायद्यानुसार उत्पादन प्रकल्प वगळता १० किंवा अधिक कामगार असलेल्या दुकाने, मॉल्स, चित्रपटगृहे यांना ३६५ दिवस त्यांचे काम खुले ठेवण्याची परवानगी दिली जाईल व त्यांना संबंधित आस्थापन केव्हा बंद ठेवायचे, केव्हा खुले ठेवायची यासाठी मुभा असेल. महिलांना पुरेशा सुरक्षेत रात्रपाळीत काम करण्याची परवानगी दिली जात असून कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, उपाहारगृह, प्रसाधनगृह व प्रथमोपचार सेवा असणे आवश्यक राहील. द मॉडेल शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट या नवीन कायद्यास मंत्रिमंडळाकडून मंजूर देण्यात येईल. या कायद्याला संसदेची मंजुरी लागणार नाही. कामगार मंत्रालयाच्या या आदर्श कायद्यानुसार राज्यांना त्यांच्या गरजानुसार बदल करता येतील. यातून रोजगारवीढीची अपेक्षा आहे, दुकाने व इतर आस्थापने चालवण्यात लवचिकता राहील. आयटी व जैवतंत्रज्ञान कर्मचार्‍यांना रोज ९ तास व आठवडयाला ४८ तास काम असते, त्यांना यातून सूट दिली आहे. केंद्र सरकारला या कायद्याबाबत वेळोवेळी सूचना मिळाल्या होत्या व त्यानुसार हा कायदा तयार केला आहे, त्याच्या अंमलबजावणीचा विकल्प राज्यांना राहील. त्यात दुरुस्त्याही करता येतील. केंद्राने याची एक ठोबळ सूचना केल्यावर आता विविध राज्यात याची अंमलबजावणी कशी करण्यात येईल ते संबंधित राज्य ठरविल. महाराष्ट्राने याबाबत अजून कोणताही निर्णय जाहीर केला नसला तरी २४ तास खुले ठेवण्याच्या बाजूनेच असेल, यात काही शंका नाही. सर्व दुकाने, मॉल्स, थिएटर्स २४ तास खुली ठेवल्यामुळे देशातील रोजगाराच्या संधी वाढतील असा एक होरा आहे. परंतु हा अंदाज काही शंभर टक्के खरा नाही. कारण मोठी शहरे वगळता अन्य ठिकाणी अशा प्रकारे दुकाने २४ तास खुली ठेवण्याने व्यवसाय वृध्दी होणार नाही किंवा रोजगारही वाढणार नाही. मोठ्या शहरातही रात्रीच्या वेळी ही आस्थापने २४ तास खुली ठेवल्याने तेथील सुरक्षा व्यवस्था ही तशी कडेकोट ठेवावी लागणार आहे. विदेशातील काही शहरात अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी झाले आहेत म्हणून आपल्याकडे ते यशस्वी होईल असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्याचबरोबर रात्रीच्यावेळी काम करणार्‍या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍नही आहेच. सध्या कॉल सेंटर्स ही बहुतांशी २४ तास खुली असतात, मात्र ती जागतिक वेळेशी जोडलेली असल्यामुळे खुली ठेवावी लागतात. परंतु दुकाने, थिएटर्स ही २४ तास खुली ठेवण्याची आवश्यकताच आहे असे नव्हे. त्याएवजी सध्या शनिवार, रविवार अथवा सार्वजनिक सुट्टीच्या आदल्या दिवशी ही आस्थापने २४ तास उघडी ठेऊन त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे शहाणपणाचे ठरेल.

0 Response to "आता २४ तास खुले..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel