-->
भारतीय बुध्दीमत्तेचा जागतिक गौरव

भारतीय बुध्दीमत्तेचा जागतिक गौरव

रविवार दि. १६ ऑगस्ट २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
भारतीय बुध्दीमत्तेचा जागतिक गौरव
-----------------------------------------------------------
एन्ट्रो- आता केवळ वयाच्या ४३ व्या वर्षी गुगलच्या सीईओपदी सुंदर पिचाई नियुक्त झाल्याने बुद्दीमत्तेची भारतीय पताका आता अमेरिकेत मोठ्या दिमाखाने फडकू लागली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, पेप्सीच्या इंद्रा नुई, मास्टरकार्डचे अजय बांगा, ऍडोबेचे शंतनू नारायण, डीबीएसचे पियुष गुप्ता, नेटऍपचे जॉर्ज कुरियन, डियाजिओचे इव्हान मेन्झीस, रेकिटचे राकेश कपूर, नोकियाचे राजीव सुरी, सॉफ्टबॅकचे निकेश अरोरा यांच्या जोडीला आता सुंदर यांचे नाव आले आहे. गेल्या दशकात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय वंशांच्या लोकांना संधी मिळाली आहे. आता गुगलच्या नेतृत्वपदी एका तरुण भारतीयाला संधी मिळणे ही भारतातील प्रत्येकाला एक अभिमानाची बाब म्हटली पाहिजे...
----------------------------------------------------
मायक्रोसॉफ्टनंतर आता गुगल कंपनीनेही भारतीय बुध्दीमत्तेचा गौरव केला आहे. भारतात उच्चशिक्षण घेऊन अमेरिकेत स्थायिक झालेल्या सुंदर पिचाई यांची गुगलने कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती केली आहे. जगातल्या आय.टी. उद्योगातल्या आघाडीच्या पाच कंपन्यातील दोन कंपन्यांचे नेतृत्व आता भारतीयांकडे आले आहे. १९७२ साली जन्मलेल्या सुंदर यांचा जन्म चेन्नईत झाला. आता केवळ वयाच्या ४३ व्या वर्षी गुगलच्या सीईओपदी नियुक्त झाल्याने बुद्दीमत्तेची भारतीय पताका आता अमेरिकेत मोठ्या दिमाखाने फडकू लागली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, पेप्सीच्या इंद्रा नुई, मास्टरकार्डचे अजय बांगा, ऍडोबेचे शंतनू नारायण, डीबीएसचे पियुष गुप्ता, नेटऍपचे जॉर्ज कुरियन, डियाजिओचे इव्हान मेन्झीस, रेकिटचे राकेश कपूर, नोकियाचे राजीव सुरी, सॉफ्टबॅकचे निकेश अरोरा यांच्या जोडीला आता सुंदर यांचे नाव आले आहे. गेल्या दशकात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय वंशांच्या लोकांना संधी मिळाली आहे. आता गुगलच्या नेतृत्वपदी एका तरुण भारतीयाला संधी मिळणे ही भारतातील प्रत्येकाला एक अभिमानाची बाब म्हटली पाहिजे. गुगल कंपनीच्या पुनर्बांधणीनंतर गुगलचे सर्च इंजिन, गुगल मॅप, यू-ट्युब, अँड्रॉइडची धुरा पिचाई यांच्याकडे येणार आहे. सुंदर पिचाई यांनी आयआयटी खरगपूरमधून बीटेक पदवी घेतल्यानंतर अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमएस आणि व्हॉर्टन स्कूलमधून एमबीए केले. २००४पासून ते गुगलमध्ये कार्यरत असून सध्या कंपनीच्या उत्पादन विभागाचे उपाध्यक्ष आहेत. गुगलचे सीईओ लॅरी पेज यांनी ब्लॉगद्वारे नव्या घडामोडींची घोषणा केली व त्यात त्यांनी पिचाई यांचे खास कौतुक केले आहे. पिचाई यांच्यासारखा अतिशय हुशार सहकारी मिळाल्याने मी सुदैवी आहे. असंख्य नव्या कल्पना ते सातत्याने मांडतात. सुंदर यांच्या नियुक्तीमुळे आम्ही उत्साही आहोत, असे पेज यांनी लिहिले आहे. सध्या गुगल व्यवसायाची पुनर्बांधणी करीत असून, सर्व कंपन्या व नवी उत्पादने अल्फाबेट या नव्या कंपनीच्या पंखाखाली येणार आहेत. लॅरी पेज व सर्जी ब्रिन यांच्या हाती नव्या कंपनीची धुरा असेल. त्यामुळे या बदलांमध्ये प्रतिष्ठेच्या गुगल कंपनीवर विशेष जबाबदारी आहे.
लॅरी पेज गुगल एक्स, गुगल बलून आणि गुगल ग्लाससारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या धर्तीवर मून शॉट्स या नव्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहेत. त्यासाठी त्यांनी गुगल सर्च इंजिनची जबाबदारी पिचाई यांच्यावर सोपवली आहे. कंपनीत कार्यरत एकूण एक्झिक्युटिव्हजपैकी पिचाई यांच्यावर सर्वाधिक विश्वास. ऑक्टोबर २०१४पर्यंत पिचाई कंपनीच्या सर्वांत पॉवरफुल एक्झिक्युटिव्हजपैकी एक बनले. पेज यांच्या विश्वासू सहकार्‍यांपैकी एक. गुगलच्या वर्तुळाच्या बाहेरही पिचाई यांचे नाव मोठे आहे. २०११मध्ये ट्विटरने पिचाई यांना ऑफर दिली होती. त्यावेळी गुगलने त्यांना ३५० कोटींचे पॅकेज बहाल केले होते. त्यानंतर गुगल टूलबार, गुगल क्रोम, अँड्रॉइड आणि गुगल व्हॉइस सारख्या प्रकल्पांची जबाबदारी पिचाई यांनी यशस्वीरित्या सांभाळली. तंत्रज्ञानाच्या बाजारात दररोज क्रांतिकारी कल्पना सातत्याने पुढे येतात. त्यामुळे कामकाजाचा आवाका वाढविण्याची आवश्यकता भासते, अशी प्रस्तावना लॅरी पेज यांनी आपल्या ब्लॉगवर अल्फाबेटची निर्मिती नेमकी कशासाठी हे स्पष्ट करताना केली आहे. याचाच अर्थ कंपनी आता सर्च इंजिनसह अन्य बाबतींमध्येही गुंतवणूक करू इच्छित आहे. त्यासाठीच कंपनीने अल्फाबेटला जन्म दिला. गुगल ही आता अल्फाबेटची उपकंपनी असेल आणि लॅरी पेज तिचे सीईओ असतील. आणखी एक संस्थापक सर्जी ब्रिन नव्या कंपनीचे अध्यक्ष असतील. गुगलही सर्वांत मोठी कंपनी असेल. गुगलचा संशोशन विभाग एक्स लॅब आता अल्फाबेटच्या अंतर्गत काम करेल. या लॅबमधूनच सेल्फ ड्रायव्हिंग कार, गुगल ग्लास आणि इंटरनेट बलून या प्रकल्पांवर काम करण्यात येते. गुगलचा आरोग्य विभागही अल्फाबेटच्या अंतर्गत काम करेल.
अशा प्रकारे गुगलच्या संपूर्ण फेररचनेच्या प्रक्रियेनंतर तिच्या वृध्दीची मोठी जबाबदारी सुंदर यांच्यावर आली आहे. चेन्नईतील एक कनिष्ठ मध्यनमवर्गीयातील हा मुलगा आता गुगलच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचणे ही तरुणांसाठी एक मोठी प्रेरणादाई बाब ठरते. चेन्नईत राहाणार्‍या सुंदर यांचे बालपण तसे गरीबीतच गेले. घरात फक्त एक स्कूटर होती. कित्येक वर्षे घरात साधा फोनही व टीव्ही ही नव्हता. परंतु आपल्या बुध्दीमत्तेच्या जीवावर आय.आय.टी.त प्रवेश घेतल्यावर सुंदर यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. एका सर्वसामान्य कुटुंबातून वर आलेला सुंदर आता अमेरिकेत आघाडीच्या कंपनीच्या सीईओपदी पोहोचणे ही घटना फार महत्वाची आहे. यातून तरुणांना प्रेरणा घेण्यासारखीच बाब आहे.  
-----------------------------------------------------------------

0 Response to "भारतीय बुध्दीमत्तेचा जागतिक गौरव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel