-->
संपादकीय पान गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
मोदी मंत्र फळणार नाही
-------------------------------
निवडणुकीत आता हळूहळू रंग भरु लागला आहे. प्रत्येक पक्षाचे यावेळी जवळजवळ प्रत्येक म्हणजे २८८ मतदारसंघात उमेदवार उभे असल्यामुळे या रंगात अजून भर पडली आहे. यापूर्वी जसे पक्षाने तिकिट नाकारल्याने बंडखोरी करणारे जास्त असायचे तसे यावेळी फारच कमी ठिकाणी चित्र आहे. अनेक मतदारसंघात पक्षांना मारुनमुटकून आपले उमेदवार उभे करावे लागले असल्याने अनेकांना पक्षाच्या अधिकृत तिकिटावर लढण्याची एक संधी चालून आली आहे. सेना-भाजपा यांची युती तुटली व कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही त्यापाठोपाठ काही क्षणात फुटली. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक पक्षाने आता आपल्या जाहीराती रेडिओ, टी.व्ही. व वृत्तपत्रातून वर जोरात सुरु केल्या आहेत. तसेच सोशल मिडियाच्या मार्फतही विविध बातम्या अपलोड करुन प्रचाराला वेग आला आहे. या जाहीरातींवर एक कटाक्ष टाकल्यास एक बाब प्रकर्षाने जाणवते की, भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर यावेळी विधानसभेलाही मोदी मंत्र जपण्याचे ठरविलेले आहे. भाजपाच्या प्रत्येक जाहीरातींवर केवळ नरेंद्र मोदींची छबी आहे. राज्यातल्या कोणत्याही उमेदवाराचा फोटो सोडून द्या पण साधे नाव देखील नाही. त्यामुळे भाजपाचे नेते मनातून खट्‌ट्‌ू असल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरु आहे. मात्र मोदींच्या या एककल्ली कारभारला चॅलेंन्ज करणार कोण असा सवाल आहे. सध्या मोदींच्या जीवावर केंद्रातली सत्ता आल्याने भाजपाच्या प्रत्येक नेत्याला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही त्यांचे एैकून घ्यावे लागत आहे. खरे तर संघाच्या पठडीत अशा प्रकारचा व्यक्ति केंद्रीत कारभार करणे काही बसत नाही. परंतु मोदींनी ज्या गतीने पक्षावर आपली पकड बसविली व सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली ते पाहता संघही आता हतबल झाल्यासारखा झाला आहे. लोकसभेला मोदींची जादू चालली असले तरी यावेळी मात्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत मोदींची जादू चालणार नाही हे मात्र नक्की. याचे कारण म्हणजे केंद्रात भाजपाचे सरकार आल्यावर नरेंद्र मोदी यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा लोकांना होत्या. त्या अपेक्षांची पूर्तता सोडा परंतु जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक होण्याच्या दृष्टीने पावले देखील सरकारने टाकली नाहीत. वाढती महागाई हा निवडणुकीतील महत्वाचा प्रश्‍न चर्चीला गेला होता. मात्र भाजपाच्या मोदी सरकारने सत्तेत येताच महागाईला आळा घालण्याऐवजी चालना दिली. सर्वसामान्यांचा स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेल महाग करुन महागाईत तेल ओतले. त्याच्या जोडीला सार्वजनिक व्यवस्थेचा कणा असलेल्या रेल्वेचीही भाडेवाढ करुन सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले. त्यापाठोपाछ मिरची, कांदे-बटाटे या जीवनावश्यक वस्तू देखील गगनाला भिडल्या होत्या. त्यामुळे मोदींबद्दल लोकांचा भ्रमनिरास व्हायला सुरुवात केली. कारण मोदींनी लोकांना अच्छे दिन आणण्याचा वादा करुन सत्ता काबीज केली होती. मोदींच्या या आश्‍वासनाला जनता भूलली होती. अर्थात लोकांची फसवणूक झाल्याची आता भावना निर्माण झाली आहे आणि याला सर्वस्वी नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. याचे पडसाद नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत उमटले. बिहार, गुजरात व उत्तरप्रदेश या राज्यात जिकडे लोकसभेला भरघोस मतांनी भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते तिकडे पोटनिवडणुकीत मात्र भाजपाच्या उमेदवारांना मोठा मार खावा लागला. त्यावरुन मोदींच्या भोवतीचे ग्लॅमर आता सरु लागल्याचे स्पष्ट जाणवत आहे. अशावेळी भाजपा महाराष्ट्रात मोदींच्या जादूची कांडी फिरेल व आपल्या हाती संपूर्ण सत्ता येईल असे स्वप्न बाळगून आहे. मात्र त्यांचे हे स्वप्न भंग पावणार आहे, कारण मोदींच्या नावावर महाराष्ट्रात मतांचा जोगवा मागून ही जनता आता दुसर्‍या वेळी भूलणार नाही. कारण मोदींनी भ्रमनिरास केला आहे. ज्या मोठ्या अपेक्षेने मतांची झोळी भाजपाची भरली त्याने भ्रमनिरास झाला आहे. त्याचबरोबर सेना-भाजपा युतीही आता तुटली आहे. एकीच्या बळाचा फायदा होऊ शकतो हे या युतीतील नेत्यांनी यापूर्वी अनुभवले होते. मात्र आता फाटाफुटीमुळे दोन्ही पक्षांना फटका बसणार आहे. भाजपाच्या मनात अचानक केंद्रात सत्ता आल्यावर आता आपण महाराष्ट्र देखील सोशल नेटवकिर्ंंवर प्रचार करुन काबीज करु असा फाजिल आत्मविश्‍वास भाजपाला वाटतो. भाजपाचा मुख्यमंत्री यावेळी राज्यात बसेल अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेशी २५ वर्षे असलेला संसारही मोडला. अर्थात हे सर्व मोदींनी दिल्लीतून सोडलेल्या आदेशानुसार होत होते. आपण आता दिल्ली काबीज केल्यावर देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई व महाराष्ट्र ताब्यात घेऊ असे मोदींना वाटते. मात्र ते शक्य नाही. भाजपाची स्वबळावर सत्ता काबीज करण्याची राज्यात ताकद नाही. परंतु ओढून ताणून सर्व २८८ उमेदवार उभे केल्यावर सत्ता मिळविणे सोडे जाईल असे भाजपाला वाटते तो त्यांचा भ्रम आहे. सेना-भाजपा ही संयुक्तपणे लढत असताना त्यांची जी ताकद होती ती ताकद आता विभागली जाणार आहे याचा विचारही भाजपाचे नेते करावयास तयार नाहीत. केवळ मोदींचा नावाचा मंत्र जपला की आपल्याला मतांचा पाऊस पडणार आणि आपण सत्तास्थानी योणार असे त्यांना वाटते. त्यासाठी त्यांनी ज्याप्रकारे लोकसभेला आक्रमक जाहीरातींचा पाऊस पाडला होता तसाच आता पाऊस राज्यात पाडला आहे. मात्र त्यावेळी कॉँग्रेस विरोधाची लाट अधिक तीव्र होती. आता केवळ मोदींच्या नावावर मते मिळण्याचे दिवस संपले आहेत. मोदींचा मंत्र जपून मते मिळणार नाहीत हे भाजपाला निकालानंतर समजेलच.
------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel