-->
संपादकीय पान बुधवार दि. ३० जुलै २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
आपची निवडणूक लढविण्याची हौस फिटली
---------------------------------
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणार्‍या आम आदमी पक्षाने अखेरीस महाराष्ट्र, हरयाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधून माघार घेतली आहे. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनीच याबाबत अधिकृत घोषणा केली. आपची ही घोषणा एैकून अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला असेलही. मात्र आपल्या पक्षाचे निराशाजनक चित्र जनतेपुढे येण्यापेक्षा आपली झाकली मुठ सव्वा लाखाची या म्हणीप्रमाणे ही निवडणूक न लढविण्याचा आपने मोठा धुर्त निर्णय घेतला असेच म्हणावे लागेल. आपची तीन दिवसीय कार्यकारिणी बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आम आदमी पक्षाकडे निवडणुकीसाठी लागणारी पुरेशी कुमक नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. पक्ष चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढत नसला तरी देशभरातील कार्यकर्त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन केजरीवाल यांनी यावेळी केले. दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग भाजपच्या दबावामुळे विधानसभा निवडणुकांची घोषणा टाळत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. तसेच येत्या २१ ऑगस्ट रोजी पंजाबमध्ये विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत असून या दोन्ही जागांवर मात्र आप उमेदवार उभे करणार आहे. या दोन उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाची स्थापना होईन जेमतेम एक वर्षाच्या आतच त्यांच्या ताब्यात दिल्लीचे मुख्यमंत्रीपद आले होते. भले त्यावेळी आपला संपूर्ण बहुमत मिळाले नाही हे वास्तव नाकारण्यात येऊ शकत नाही. परंतु अरविंद केजरीवाल हे कॉँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. मुळातच हीच बाब अनेकांना त्यावेळी खटकली होती. ज्या पक्षाच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना संपविण्याची भाषा करणारा आप हा पक्ष केवळ सत्तेच्या राजकारणासाठीच कॉँग्रेसशी हातमिळविणी करीत होता. त्यामुळे या पक्षाची लोकप्रियता झपाट्याने लोप पाऊ लागली होती. त्यातच अगदीच बिनबुडाच्या मुद्यावरुन दिल्लीची आलेली सत्ता सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आपची ही धरसोड वृत्ती अनेकांना खटकली होती. तसेच आपला कोणतीही एक धड विचारधारा नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले होते. अण्णांच्या आंदोलनातून झपाट्याने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले केजरीवाल यांना या आंदोलनातून सत्ता काबीज करण्याची स्वप्ने पडू लागली. अण्णांना आपले आंंदोलन हे पक्षविरहीत ठेवायचे असल्याने तसेच त्यांची ही भूमिका त्यांनी नेहमीच स्पष्ट केल्याने केजरीवाल अण्णांच्या सोबतीत राहू शकले नाहीत. कारण आंदोलनानंतर केजरीवाल यांची राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाली होती. यातूनच केजरीवाल यांनी आपल्या पक्षाचे दुकान सुरु केले. केजरीवाल यांचा पक्ष म्हणजे देशात काही मोठी क्रांतीच करणार आहे अशी हवा तयार करण्यात ते यशस्वी झाले. त्यातच त्यांची स्वयंसेवी संघटना असल्याने काम कमी व देखावा कसा मोठा करायचा याची त्यांना चांगलीच जाण होती. आपल्या पक्षाचे लॉँचिंगही त्यांनी याच धर्तीवर केले. विदेशातून तसेच विदेशी भारतीयांकडून मोठ्या देणग्या त्यांच्या पक्षाला सुरु झाल्या. अनेक विदेशी भारतीय मायदेशी परतून आपच्या प्रवाहात सामिल झाले. त्यांच्याही समाजसेवा व राजकारणाच्या ज्या काही समजुती होत्या त्यांच्याशी आपची नाळ जुळली आणि आपला भरघोस पाठिंबा मिळू लागला. शहरातील प्रामुख्याने दिल्लीतील युवकांनी केजरीवाल यांची जोरदार साथ दिण्याचे ठरविले. यातून केजरीवाल अखेरीस मुख्यमंत्री झाले आणि आता देशाचे पंतप्रधान होणार असे चित्र निर्माण केले गेले. परंतु नरेंद्र मोदींच्या देशव्यापी लाटेत जसे अन्य पक्ष वाहून गेले त्यात आपचीही धुळधाण झाली. मात्र यातून आप काही सावरला नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे आम आदमी पक्ष हा अन्य पक्षांपेक्षा वेगळा असेल व काही तरी वेगळे करुन दाखवेल ही लोकांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे भविष्यात होणारे आपले पानिपत रोकण्यासाठी महाराष्ट्रासह चार राज्यातील विधानसभा निवडणुका न लढविण्याचा आपने निर्णय घेतला असावा, असेच दिसते.
-----------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel