-->
श्वसनक्रियेची अवघड शस्त्रक्रिया शक्य

श्वसनक्रियेची अवघड शस्त्रक्रिया शक्य

श्वसनक्रियेची अवघड शस्त्रक्रिया शक्य
 Published on 31 Jan-2012 Nirayamay
 माणसाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची गरज असते? जगण्यासाठी अनेक बाबी आवश्यक आहेत, मात्र आपण जो श्वास घेतो ही सर्वात गरजेची गोष्ट आहे. कारण प्रत्येक श्वासाबरोबर आपण तो क्षण जगतो. श्वासच घेणे बंद झाले तर माणूस जगणारच नाही. जागतिक पातळीवरील नाक, घसा तज्ज्ञ डॉ. किशोर सांडू यांनी श्वसनक्रियेच्या या रोगाविषयी व त्यावर केल्या जाणार्‍या शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली. श्वसनक्रियेचा मार्ग संकुचित होण्याने रोग्याला फार मोठय़ा अडचणींना तोंड द्यावे लागते. श्वसनमार्ग बंद झाल्याने रोग्याला बोलता येत नाही. त्याला श्वास घेताना अडचण निर्माण होते. पोहता येत नाही. तो फार वेगाने धाऊ शकत नाही. तसेच पावसाळ्यात त्याला कुठे बाहेर जाताना मोठी अडचण होते, कारण या रोग्याला श्वासनलिकेच्या मार्गावर म्हणजे गळ्याच्या जागी भोक पाडून बाहेर नलिका काढली जाते. तसेच या रोग्यांना संडास होताना त्रास होतो. कारण आपण संडास करताना श्वास घेण्याचे मार्ग बंद असावे लागतात. अशा रोग्यांचा श्वास घेण्याचा मार्ग कधीच बंद होत नसल्याने संडासला त्रास होतो. मुलांमध्ये हा रोग जर झाल्यास खूपच अडचणी निर्माण होतात. अशा प्रकारचा रोग हा कोणासही होऊ शकतो. कोणत्याही वयोगटात हा रोग होतो. श्वसनक्रियेचा मार्ग आकुंचित होण्यामागे काही ठोस कारणही नसते. कुणालाही ते होऊ शकते. काही प्रसंगी हा जन्मजात दोषही असतो. मात्र कधीकधी दोष लगेचच न आढळता वयाच्या तिशीनंतर आढळतो. जगातील सरासरी सात ते दहा टक्के लोकसंख्या या रोगाने त्रस्त आहे. 
डॉ. किशोर सांडू हे मूळचे मुंबईचे. त्यांनी के.ई.एम.मध्ये एम.बी.बी.एस. केल्यावर नायरमध्ये कान, नाक व घसा यात एम.एस. केले. त्यानंतर काही काळ भारतात प्रॅक्टीस केल्यावर ते आठ वर्षांपूर्वी उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडमध्ये गेले. स्वित्झर्लंडच्या ते ज्या भागात राहतात तेथे फ्रेंच व र्जमन भाषा बोलली जाते. त्यामुळे ते फ्रेंच भाषा शिकले. तेथील विद्यापीठातून त्यांनी पी.एच.डी. केली. आता डॉ. सांडू हे स्वित्झर्लंडमधील लोझान राज्यातील एका सरकारी मालकीच्या रुग्णालयाचे प्रमुख आहेत. संपूर्ण युरोपात अशा प्रकारे एखाद्या भारतीय डॉक्टरला सरकारी रुग्णालयाचे प्रमुख करण्याची ही पहिलीच वेळ. स्वित्झर्लंडच्या या रुग्णालयात डॉ. सांडू हे एकमेव भारतीय डॉक्टर आहेत. तसेच ते या रुग्णालयात नाकाच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख आहेत. अशा प्रकारच्या श्वसनमार्गाच्या शस्त्रक्रिया जगात फक्त दोनच ठिकाणी होतात. अमेरिकेच्या सिनसिनाटी व स्वित्झर्लंडमधील लोझान या दोनच ठिकाणी या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे जगातून या दोन ठिकाणी रुग्ण येतात. येथील शस्त्रक्रिया जवळपास 90 टक्के यशस्वी होतात आणि त्यांची श्वसननलिका पूर्ववत होते. त्यानंतर हे रुग्ण चांगले आयुष्य जगतात. भारतीय रुग्णांची येथील संख्या फार अल्प असते. कारण तेथे जाऊन शस्त्रक्रिया करणे भारतीय रुग्णांना परवडणारे नसते. भारतातील रुग्णांना ही शस्त्रक्रिया परवडावी म्हणून डॉ. सांडू दरवर्षी चार दिवस भारतात येतात आणि मोफत शस्त्रक्रिया करतात. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ते या शस्त्रक्रिया करतात. 
Prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "श्वसनक्रियेची अवघड शस्त्रक्रिया शक्य"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel