-->
बेकारीची कुर्‍हाड / सर्वांसाठी आधारच

बेकारीची कुर्‍हाड / सर्वांसाठी आधारच

सोमवार दि. 29 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
बेकारीची कुर्‍हाड
एखाद्या देशात मंदीची सुरुवात झाली की त्याचा पहिला फटका वाहन उद्योगाला बसतो असे म्हणतात. आपल्याकडे त्याची सुरुवात झाली आहे. वाहन उद्योगातील मंदीचे भीषण परिणाम दिसण्यास सुरुवात झाली असून गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठ गमावून बसलेल्या या उद्योगाशी संबंधित सुमारे 10 लाख कर्मचार्‍यांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. कार, व्यावसायिक वाहने, दुचाकी आदींच्या उत्पादनासाठी आवश्यक असणार्‍या सुट्या भागांची निर्मिती करणार्‍या कंपन्यांना या मंदीची सर्वाधिक झळ बसली आहे. याच कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकरकपात सुरू केली आहे. त्यामुळे लाखो लोक बेकार होऊ लागले आहेत. ऑटोमोटिव्ह कॉम्पोनण्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ए.सी.एम.ए.) या वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांच्या संघटनेच्या सांगण्यानुसार, वाहन उद्योगात सध्या प्रचंड मंदी आहे. गेल्या वर्षभरापासून या उद्योगात मरगळ असल्याने अनेक कंपन्यांनी वाहनांचे उत्पादन घटवले आहे. वाहनांचे सुटे भाग तयार करणार्‍या कंपन्यांना याचा सर्वाधिक फटका बसला असून या पुरक उद्योगातील आठ ते 10 लाख कामगारांना नोकरी गमवावी लागली आहे. हरयाणा, पुणे, नाशिक, चेन्नई, जमशेदपूर व उत्तराखंडातील काही कंपन्यांनी ही नोकरकपात केली आहे. वाहन उद्योगातील या मंदीचे दुष्परिणाम अभूतपूर्व आहेत. बॉशसारख्या आघाडीच्या सुटे भाग पुरवठा कंपनीला सलग पाच दिवस काम बंद ठेवावे लागत आहे. ही धोक्याची घंटा असून सध्याची स्थिती अतिशय चिंताजनक आहेे. नोकरी गमावलेल्यांमध्ये उत्पादनाशी संबंधित कंत्राटी कामगारांचे प्रमाण अधिक आहे. सुट्या भागांच्या उत्पादनासाठी कारखान्यात काम करणारे, वाहनांची ने-आण सेवा देणारे आणि कारख्यान्यांतील अन्य पुरक कामांसाठीच्या कामगारांनी रोजगार गमावले आहेत. गाड्यांचे सुटे भाग पुरवणार्‍या कंपन्यांची आर्थिक उलाढाल प्रचंड आहे. देशभरात सुटे भाग निर्माण करणार्‍या कंपन्यांची संख्या सुमारे 50 हजार आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये ए.सी.एम.ए.ने चार लाख कोटी रुपयांच्या सुट्या भागांचे उत्पादन केले. यातील 2.3 लाख कोटी रुपयांचे सुटे भाग देशांतर्गत उत्पादनात वापरण्यात आले. उर्वरित भागांची निर्यात करण्यात आली. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचा 2.3 टक्के हिस्सा आहे. व्यावसायिक व खासगी वापरासाठीच्या कारच्या देशांतर्गत विक्रीमध्ये जून महिन्यात तब्बल 25 टक्क्यांनी घसरण झाली आहे. कारविक्रीत घट होण्याचा जून हा सलग आठवा महिना ठरला आहे. आघाडीची कार उत्पादक कंपनी असणार्‍या मारुती सुझुकीसह बहुतांश कंपन्यांच्या कारविक्रीवर काही महिन्यांपासून प्रतिकूल परिणाम झाला आहे. मागणी घटल्याने या कंपन्यांनी उत्पादन कमी करण्याचा यापूर्वीच निर्णय घेतला आहे. मारुती सुझुकीने गेल्या पाच महिन्यांपासून उत्पादन कमी केले आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स व टोयोटा आदी प्रमुख कंपन्यांच्या विक्रीला जूनमध्ये फटका बसला. वाहन उद्योगातील ही मंदी सध्या तरी दूर होण्याची शक्यता नाही. उलट ही मंदी काही प्रमाणात वाढण्याचीच शक्यता आहे. याचा सर्वात मोठा फटका रोजगारावर बसणार आहे.
सर्वांसाठी आधारच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आधार कार्डासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यांमधील लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मिळणार्‍या अनुदानासाठी आधार कार्डाच्या वापराला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सांगण्यानुसार, आधार कार्डाच्या वापरामुळे राज्यांतील योजनांमध्ये पारदर्शकता येईल व गैरप्रकारांना आळा बसेल. याचा फायदा गरजूंना मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोककल्याणकारी योजनांसाठी सरकारी निधीचा वापर होत असेल, तर त्यासाठी आधार कार्डाचा उपयोग करणे बंधनकारक आहे. या माध्यमातून सर्व प्रकारचे अनुदान संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आधार कार्डाची मदत घेणे आवश्यक आहे. एकूणच या निर्णयामुळे मोदी सरकारला आता आधारचे महत्व पटले आहे असेच दिसते. कारण आधारची सुरुवात कॉँग्रेसच्या काळात केल्यावर याला विरोध करण्यात भाजपा आघाडीवर होती. आता मात्र आधारचे घोडे पुढे तेच सत्तेत आल्यावर दामटत आहेत. आधार ही खरे तर काळाची गरज ठरणार आहे. प्रत्येक देशात आशा प्रकारचे एक ओळख पत्र नागरिकांना दिले जाते. त्यात त्या नागरिकाची सर्व माहिती साठवून ठेवली जाते. त्याचा असलेला क्रमांक ही त्याची ओळख असते. भारतासारख्या अवाढव्य देशात अशा प्रकारची यंत्रण उभारणे हे एक मोठे आव्हान होते. मात्र ते आव्हान पेलण्यात आले. आता आधार हे प्रत्येक क्षेत्रात वापरण्यासाठी सरकारने तरतूद केली पाहिजे. आपल्याकडे पॅन कार्ड, रेशन कार्ड, भविष्य निर्वाह निधीचा क्रमांक अशा अनेक प्रकारची ओळखपत्रे वापरली जातात. आता त्याऐवजी आधारच ग्राह्य मानून त्याच्या क्रमांकाखाली सर्व माहिती आणण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. आधार हे सर्व ठिकाणी वापरले गेल्यास सर्वानाच त्याचा फायदा होऊ शकेल.
--------------------------------------------------------------------

0 Response to "बेकारीची कुर्‍हाड / सर्वांसाठी आधारच"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel