-->
प्रश्‍न आदिवासी तरुणांचे

प्रश्‍न आदिवासी तरुणांचे

मंगळवार दि. 09 ऑक्टोबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
प्रश्‍न आदिवासी तरुणांचे
रायगड जिल्ह्यातील आदिवासी वाड्या, पाड्यांवर राहणारा तरुण व्यसनाधीनतेमुळे अनेक समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. दारुच्या व्यसनाच्या आधीन असलेले बहुसंख्य तरुण आरोग्याच्या समस्यांंशी झुंज देत आहेत. तर अल्पशिक्षणामुळेही अद्याप आदिवासींमध्ये मागासलेपण आहे, असा स्पष्ट निष्कर्ष अमिटी विद्यापीठाच्या एका अभ्यास समितीने काढला आहे. आदिवासी तरुणांना समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी काही शिफारसीही या समितीने केल्या आहेत. आदिवासींना समस्येच्या गर्तेतून काढून मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या संकल्पनेतून एसपी फेलोशीप ही संकल्पना राबविण्यात आली. राज्यातील पहिले खासगी विद्यापीठ म्हणून ओळखले गेलेले अमिटी विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक, महाविद्यालयीन तरुण व पोलीस अधिकार्‍यांच्या सहभागातून एक अभ्यास समिती नेमण्यात आली. आदिवासींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असलेल्या सुधागड तालुक्यातील 39 आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन आदिवासी समाजातील व्यसनाधीनतेचा आणि त्यामुळे होणार्‍या दुष्परिणामांचा अभ्यास या समितीच्या वतीने करण्यात आला. या समितीने आदिवासांच्या प्रश्‍नांचा अभ्यास तर केलाच परंतु या प्रश्‍नांची सोडवणूक कशी केली जाऊ शकतो हे देखील सुचविले आहे. त्यादृष्टीने या अभ्यास गटाच्या अहवालाला विशेष महत्व आहे. या समितीने सर्व्हेक्षणाचा अहवाल नुुकताच जिल्हा पोलीस अधीक्षक पारस्कर यांना सुपूर्द केला. व्यसनाधीनतेमुळे आदिवासी समाज समस्यांच्या गर्तेत असून, शैक्षणिक मागासलेपण कारणीभूत असल्याचे अभ्यास समितीच्या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले. अमिटी विद्यापीठ मुंबईचे सहाय्यक प्राध्यापक अमेय महाजन, विद्यार्थी आदित्य सालेकर, कल्पेश नाईक, कृतिका मंडलिक, मनोज गायकवाड, महेश ढोकरे, भूषण अंबाडे, उज्ज्वला शिंदे, नेहा कोर्लेकर, जिज्ञासा अरुणदेकर, रेणुका त्रिगुणाईत, ऐश्‍वर्या देसाई, चाऊस शेख या समितीने अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काईंगडे, मांडव्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे व अन्य पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने सुधागड तालुक्यातील 39 आदिवासीवाड्यांमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास केला. यासाठी विशेष जलद ग्रामीण मूल्यमापन पद्धतीचा वापर केला. आदिवासीवाड्यांमधील 700 आदिवासींची माहिती समितीने संकलीत केली. शिक्षणाचा अभाव, तरुणांपासून वृद्धांमध्ये दारु पिण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसले. या समितीने प्रत्यक्ष तेथील महिला, तरुण, ज्येष्ठ मंडळींशी भेटून त्यांना दारु पिण्याचे दुष्परिणामाबाबत माहिती दिली. दहा दिवस करण्यात आलेल्या या अभ्यासाचा अहवाल समितीने तयार केला. आदिवासीवाड्यांमध्ये अत्यल्प शिक्षणामुळे मागासलेपणा असल्याने हा समाज दारुच्या आहारी गेला असल्याचे मत या अहवालात मांडण्यात आले आहे. व्यसनामुळे आदिवासींचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास झाला नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे. तरुण गट आणि स्थानिक पोलिसांमध्ये सातत्यपूर्ण संवाद हवा, दारुमुक्त होणार्‍या आदिवासीपाड्याला विशेष प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात यावेत, शालेयस्तरापासून विद्यार्थ्यांना दारुच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती शिक्षकांच्या मदतीने करण्यात यावी, तरुणांना पोलीस भरती आणि लष्करभरतीसाठी प्रोत्साहित करण्यात यावे, आदिवासींमध्ये असणारे दारुचे व्यसन सोडविण्यासाठी प्रशासनातील विविध विभागांनी एकत्र येऊन आराखडा तयार करण्यासह अवैध दारु, हातभट्ट्या आदीविरुद्ध पोलिसांनी कठोर मोहीम राबवावी, अशा विविध शिफारसी या अहवालात करण्यात आल्या आहे. आपल्याकडील आदिवासी समाज हा अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. त्यांच्यांत जशा अंधश्रध्दा आहेत तसेच शिक्षणाचा अजूनही अभाव आहे. एखादाच आदिवासी मुलगा शिकून मोठा झाल्याचे आपल्याला उदाहरण दिसते. त्यासाठी संपूर्ण आदिवासी समाजाचे पुनरुथ्थान कसे होईल याचा व्यापक दृष्टीकोनातून विचार केला गेला पाहिजे. सरकारने आदिवासींच्या मुलांच्या शिक्षणासाठी आश्रम शाळा सुरु केल्या परंतु तेथेही त्यांना योग्य शिक्षण मिळत नाही, असे खेदाने म्हणावे लागते. आपल्याकडे गेल्या दोन दशकात आर्थिक उदारीकरणाचे युग सुरु झाल्यापासून आपल्याकडील काही गटांनी आपला झपाट्याने विकास केला. त्यातून आपल्याकडे शहरी मध्यमवर्गीयांने चांगलेच बाळसे धरले. परंतु आदिवासींसारखे अनेक मागास समाज मात्र आपला विकास करु शकले नाहीत. यात सरकारचे पूर्णपणे अपयश आहे. परंतु आता तरी आदिवासी समाजाचा कसा विकास झाला पाहिजे याचा विचार झाला पाहिजे व त्याचा कालबध्द कार्यक्रम आखला गेला पाहिजे. एकतर या समाजात जी व्यसनाचे जे प्रमाण आहे, ते कमी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. हे काही एका रात्रीत होणारे काम नाही. परंतु त्यासाठी तयंचे प्रबोधन करण्याची आवश्य्कता आहे. तसेच आदिवासी तरुण जे आश्रम शाळेत जाऊन शिकतात तेथे त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण कसे मिलेल हे पाहिले पाहिजे. त्यासाठी आश्रमशाळा चालविणार्‍या संस्थाचालकांपासून ते शिक्षकांपर्यंत विशेष प्रशिक्षण दिले पाहिजे. केवळ मुलांना चार धडे शिकवायचे व त्यांंना पुढच्या वर्गात ढकलायचे असे केले तर आदिवासी तरुणांचे भले होणार नाही. त्यांना विशेष प्रशिक्षण प्रामुख्याने व्यसनधीनताचे परिणाम, उज्वल भविष्य घडविण्यासाठी त्यांच्यातील कलागुण ओळखून त्यांच्यातील उर्मी जागृत करणे इत्यादी करावे लागेल. एकदा जर त्या आदिवासी मुलांना त्यांच्या आवडीनुसार विविध क्षेत्रात तयार होण्याची संधी उपलब्ध करुन दिली तर ते शहरातील मुलांनाही मागे टाकू शकतील. फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची व त्यांच्यातील गूण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. हे काम सरकारी पातळीवरुन तसेच स्वयंसेवी संस्थांना हाताशी घेऊन करता येऊ शकते. फक्त हे करण्यासाठी इच्छाशक्ती हवी.
----------------------------------------------------------------------------- 

1 Response to "प्रश्‍न आदिवासी तरुणांचे"

  1. Wonderful article. I am totally impressed to your article. Written article good and useful for me. I gain many knowledge from your topic. I was searching Towing Des Moines topic. Thanks for posting.

    उत्तर द्याहटवा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel