-->
रणशिंग फुंकले

रणशिंग फुंकले

सोमवार दि. 08 ऑक्टोबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
रणशिंग फुंकले
येत्या लोकसभा निवडणुकींपूर्वीची पाच राज्यातील महत्वपूर्ण ठरणारी निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम व तेलंगणा या राज्यात होणारी ही निवडणूक म्हणजे लोकसभेच्या आगामी निवडणुकीची रंगीत तालीमच ठरावी अशी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्ष कॉँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक त्यांच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने महत्वाची ठरणार याबाबत काही शंका नाही. या पाचही राज्यात 12 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान विविध टप्प्यात मतदान होईल व सर्व राज्यांची मतमोजणी 11 डिसेंबर रोजी होईल. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आलेल्या पहिल्या पाहणीत तीन राज्यात काँग्रेसची सरशी होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. छत्तीसगढ, राजस्थान व मध्यप्रदेश या तीन राज्यात जर भाजपाची सत्ता गेली तर त्यांच्यासाठी तो मोठा धक्का असेलच. शिवाय जनतेला गृहीत धरुन सत्ता करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीलाही जनतेने दिलेला तो एक मोठा दणका असेल. आता सत्तेवर आपण पुढील 50 वर्षे राहाणार व विरोधक असलेल्या कॉँग्रेसला संपवून टाकणार अशी भाषा करणार्‍या भाजपाला हा जनतेने दिलेला मोठा धडा असेल. राजस्थान या राज्यात सहसा अलटून पालटून पाच वर्षांनी सरकार बदलते असते असा इतिहास आहे. अपवाद फक्त एकदाच होता. कॉँग्रेसला तेथे सलग दोन वेळा सत्ता राखण्यात यश आले होते. यावेळी भाजपातील वसुंधरा राजे सरकारच्या विरोधात मोठा जनक्षोम आहे. अनेकदा तो उघडही झाला आहे. तेथील भाजपाच्या सत्ताधार्‍यांना सत्तेची धुंदी चढल्याचे स्पष्ट जाणवते. पत्रकारांच्याही मुसक्या बांधण्यासाठी त्यांनी विधेयक आणले होते. त्यावेळी बहुतांशी सर्वच वृत्तपत्रे राजे सरकारच्या विरोधात गेली होती. राजस्थानात असलेल्या 200 जागांपैकी कॉँग्रेसला 142 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर भाजपाला केवळ 56 जागांर समाधान मानावे लागेल, असे दिसते. हा अंदाज जर खरा ठरला तर कॉँग्रेससाठी हा भरघोस विजय ठरेल. सध्याच्या काळात राजस्थानात सत्ता परत येणे हे कॉँग्रेसला जीवदान देणारे ठरेल. पाच वर्षे सत्तेत असणार्‍या भाजपा सरकारने तेथे निवडणूक आयोगाने घोषणा करण्यापूर्वी काही क्षण अगोदर राजस्थानातील शेतकर्‍यांना मोफत वीज देण्याची केलेली घोषणा म्हणजे शेवटच्या क्षणी सत्ता टिकविण्यासाठी केलेली ही धडपड दिसते. वसुंधरा राजे यांना याच फारसा काही उपयोग होईल असे दिसत नाही. मध्यप्रदेश हे आणखी एक मोठे राज्य व तेथे भाजपाची सत्ता 2005 सालापासून सलग आहे. त्यामुळे तेथे सरकारविरोधी नाराजी जनतेते आहे. तेथे झालेला करोडो रुपयांच्या नोकरी घोटाळ्याची चौकशी करण्याचे नाटक राज्य सरकारने केले खरे परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. याच बरोबर सलग तीन वेळा सत्तेत राहिल्यामुळे मध्यप्रदेशच्या शिवराजसिंग चौहान सरकारमध्ये ढिलाई आल्याचे बोलले जात आहे. भष्टाचारही मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. अशा वेळी कॉँग्रेसकडे जनता पर्याय म्हणून आता पुन्हा पाहू लागल्याचे बोलले जात आहे. मध्यप्रदेशातील 230 जागांपैकी 122 ठिकाणी कॉँग्रेसला विजय प्राप्त होईल तर भाजपाला 108 जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज व्यक्त झाला आहे. हे अंदाज खरे ठरले तर भाजपाच्या हातून एक मोठे राज्य निसटणार असून सलग तीन वेळा सत्तेत आल्याने चौथ्याही वेळी आपलाच विजय गृहीत धरणार्‍या भाजपाला धक्का असेल. छत्तीसगढचे निकाल हे बहुतांशी वेळा मध्यप्रदेशाप्रमाणेच लागतात असा इतिहास आहे. त्यामुळ येथेही कॉँग्रेस विजयी होईल असा अंदाज आहे. येथील 90 पैकी 47 जागांवर कॉँग्रेस तर भाजपा 40 जागांवर विजयी होणार असल्याचा अंदाज आहे. येथे कॉँग्रेसला निसटते बहुमत मिळणार असले तरी कॉँग्रेसला ते बळ देणार निश्‍चितच ठरेल. मिझोराम या राज्यातही 2008 पासून कॉँग्रेसच सत्तेत आहे व यंदाही सत्ता राखेल असे बोलले जाते. तेलंगणामध्ये चंदेरशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टी.आर.एस.चे सरकार पुन्हा येईल असा अंदाज आहे. एकूणच पाचही राज्यातील निवडणुकीचे अंदाज पाहता यावेळी भाजपाला जबरदस्त फटका बसणार आहे हे नक्की. गेल्या साडेचार वर्षापूर्वी भाजपाची केंद्रात सत्ता आल्यावर मोदींची जी लाट होती ती या निवडणुकीत संपुष्टात येणार असे दिसते. अर्थात हे सर्व अंदाज आहे. प्रत्यक्ष निकाल लागल्यावरच त्याचे विश्‍लेषण करणे योग्य ठरेल. परंतु हे अदाज खरे ठरतील असे गृहीत धरले तर भाजपाला आता कठीण दिवस येणार आहेत. जर लोसभा निवडणुकांच्या तोंडार असे निकाल लागले तर त्याचा निश्‍चितच वाईट परिणाम लोकसभेला त्यांना भोगावा लागणार हे नक्की आहे. त्याचबरोबर विरोधकही विभागले गेल आहेत हे विसरता येणार नाही. आज ज्य तीन राज्यात कॉँग्रेसचा विजय दिसत आह तिथे कॉँग्रेस स्वबळावर आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जर भाजपाचा पराभव करायचा असेल तर विरोधकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर विरोधक एकवटण्याची तयारी सुरु झाली होती. परंतु नंतर पु्न्ह मतभेद झाले. मायावती व समाजवादी पार्टीने स्वतंत्र चूल ठेवण्याची घोषणा केली. मात्र आता कॉँग्रेसच्या ताब्यात काही राज्ये आल्यास विरोधक एकत्र येण्याची प्रक्रिया वेग घेऊ शकते. त्यादृष्टीने सत्ताधारी व विरोधक यांच्यासाठी या पाच राज्यांचे निकाल महत्वाचे ठरणार आहेत.
------------------------------------------------

1 Response to "रणशिंग फुंकले"

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel