-->
समाजवादी दिपस्तंभ

समाजवादी दिपस्तंभ

बुधवार दि. 04 एप्रिल 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
समाजवादी दिपस्तंभ
स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे सोमवारी सायंकाळी कर्करोगाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी भाई वैद्य यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. त्यांच्यांवर आठ महिन्यांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. वैद्य यांच्या निधनामुळे समाजवादी परिवारातला एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. ध्येयनिष्ठ, समाजवादी विचारसरणीचे, आंदोलन, चळवळी यासाठी जीवन समर्पित करणारे, सत्तेत राहूनही सत्तेची मस्ती व हव्यास न धरणारे, स्वातंत्र आंदोलनापासून आजपर्यंत न थांबता विविध लोकचळवळीत सहभागी असलेले परिवर्तनवादी व्यक्तिमत्व म्हणून भाई वैद्य यांची महाराष्ट्राला ओळख होती. समाजवादी परिवारातील एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान यांच्यानंतर समाजवादी परिवारातले वडिलधारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जायचे. संपूर्ण महाराष्ट्राला भाई या टोपणनावानेच परिचय होता. आयुष्याची सत्तर वर्षे ते समाजकार्यात सक्रिय होते. या काळात त्यांनी स्वातंत्र्यचळवळीपासून ते पुलोदमध्ये असताना गृहराज्यमंत्रीपद उपभोगले. परंतु त्यांनी या सत्तेचा कधी स्वत:साठी वापर केला नाही. या काळात त्यांनी जनतेची कामे आपल्याहातून कशी होतील हे नेहमी पाहिले. सत्तेत असो किंवा नसो सार्वजनिक जीवनात त्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचा साधा ओरखडाही आला नाही. अनेक कार्यकर्ते घडविले. आपल्या समाजवादी विचारांशी बांधिलकी कधी सोडली नाही व त्या विचारंशी जास्तीत जास्त लोक कसे जोडले जातील हे पाहत समाजवाद्यांची फळी उभारली. आज त्यांच्या मुशीतून तयार झालेले हजारो कार्यकर्ते धर्मनिरपेक्षतेचे व्रत सांभाळून आहेत. स्वातंत्र्यानंतर आपल्याला देशाच्या उभारणीत हातभार लावयचा असेल तर समाजकारण व त्याच्या जोडीला राजकारण केले पाहिजे हे ओळखून त्यांनी त्यात उडी घेतली. गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, आणीबाणीतील त्यांचा तुरुंगवास व त्यांचे पुलोद राजवटीतील मंत्रीपद या त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील काही ठळक घटना म्हणाव्या लागतील. आणीबामीत त्यांना 18 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. समाजवादी चळवळीतील मुख्य प्रणेते एस.एम.जोशी व नानासाहेब गोरेंच्या प्रेरणेने प्रभावित झालेले भाई वैद्य यांनी आपली विचारधार कधीच सोडली नाही. पुण्याच्या भवानी पेठेतून दलित आणि मुस्लिमांनी भाईंना ब्राम्हण असूनही आमदार केले. भाईंची जातीधर्माचे राजकारण कधी केले नाही. संघ विरोधी तोफ, म्हणजे भाई वैद्य. मुस्लिम सत्यशोधक समाजाचे कार्य वाढविण्यात मोठा पुढाकार होता. मुस्लिम समाजातील सुधारमा या त्या समाजातून व्हायला पाहिजे होत्या याबाबत त्यांचा नेहमी आग्रह असे. अनेक संस्था, व्यक्तींच्या डोक्यावर भाईंचा हात होता. समाजवादी अध्यापक संघटना, सेवा निवृत्त संघटना आजही त्यांच्या प्रेरणेच चालू आहेत. शरद पवारांनी केलेला पुरोगामी लोकशाही दलाचा (पुलोद) प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा ठरला. या प्रयोगाने राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली. त्यावेळी समाजवादी मंडळी तत्कालीन जनता पार्टीत सहभागी झाले होते. या प्रयोगामध्ये तत्कालीन जनता पक्षाचे नेते भाई वैद्य यांच्याकडे गृहखात्याची महत्त्वाची जबाबदारी होती. एखादा मंत्री भ्रष्टाचारापासूनही कसा मुक्त राहू शकतो याचे त्यांची चांगले उदाहरण घालून दिले. ते गृहमंत्री असतानाच्या काळात एका गुन्हेगाराचे साथीदार लाच म्हणून मोठी रक्कम घेऊन आले, तेव्हा वैद्य यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. भ्रष्ट राजकारणात असे उदाहरण दुर्मिळ मानले जाते. सेवादलाचे स्वच्छ आणि पारदर्शक राजकारणाचे संस्कार त्यांनी स्वत:मध्ये जपले व त्यांचा इतरांनीही स्वीकार करावा असा त्यांचा आग्रह असे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे पहिले विधेयक मांडणे, गृहमंत्री या नात्याने पोलिसांना फूल पँट देणे आणि सेवानिवृत्तांचे निवृत्तीवेतन महागाईशी जोडणे असे महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. गृहखात्याची जबाबदारी पेलताना असे जाणवले की त्याकाळी पोलिसांच्या असलेल्या हाफ पँटच्या गणवेशाची टर उडविली जाते. त्यामुळे त्यांनी पोलिसांना पूलपँट बहाल केली. राजयाचे मंत्रीपद त्यांनी उपभोगले असले तरी त्यांच्या स्वभावात त्यामुळे काडीचाही फरक पडला नाही. त्यांचा मूळ पिंड चळवळीचा आणि संघर्षाचा असल्याने त्यांना संपूर्ण आयुष्यात 25 वेळा कारावास विविध कारणांसाठी भोगावा लागला. 1961 साली कच्छ सत्याग्रहामध्ये भुज ते खावडा पदयात्रेत सहभाग घेतला होता. अगदी वयाच्या 88 व्या वर्षी देखील त्यांनी केलेल्या शिक्षणहक्काच्या सत्याग्रहासाठी त्यांना अटक झाली होती. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली भारतयात्रेत त्यांनी चार हजार किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली. जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, समाजवादी जन परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषवली. पुण्याचे महापौरपदही त्यांनी काही काळ भूषवले. 1943 साली राष्ट्र सेवा दलात सामिल झाल्यापासून लोकशाही समाजवादी विचारधारा स्विकारली आणि आजतागायत ती निष्ठेने जपली. 1946 साली कॉग्रेस सोशलिस्ट पार्टी या जयप्रकाश नारायण, डॉ.लोहिया व एस.एम.जोशी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे प्रथम सदस्यत्व त्यांनी घेतले. त्यानंतर समाजवादी पक्षाची जी जी रूपांतरे झाली त्यात सक्रिय सहभाग घेतला. राजकीय व्यासपीठ कोणतेही असो ते समाजवादी परिवार व धर्मनिरपेक्ष शक्ती यांच्या भोवती सातत्याने राहिले. यातूनच त्यांनी आपल्या विचारांचे वारस तयार केले. आपल्या पुढील पिढीलाही त्यांनी समाजवादाचे धडे दिले. त्यांचे पुत्र डॉ. अभिजीत वैद्य हे पुण्यात सर्वसामान्यांसाठी आपली डॉक्टरी करतात, त्यातून त्यांनी समाजसेवेच व्रत स्वीकारले आहे. त्यांनी स्थापन केलेल्या आरोग्य सेनेने देशातील अनेक भागात महत्वाचे काम केले आहे. भाईंनी आपल्या समाजवादी विचारधारेसंबंधी आयुष्यभर लेखन, प्रबोधन, संघर्ष व संघटन केले. एका समाजवाद्याचे चिंतन, मंडल आयोग व अन्य मागासवर्ग, समाजवाद, संपूर्ण शिक्षण: फी विना, समान व गुणवत्तापूर्ण: का व कसे, आर्थिक आक्रमणाचे आरिष्ट (भाषांतरीत), परिवर्तनाचे साथी व सारथी, शब्दामागचे शब्द आदी पुस्तके भाईंच्या नावे आहेत. सचोटी आणि प्रमाणिकपणाच्या युगातला शेवटचा योध्दा म्हणजे, भाई वैद्य. अशा या समाजवादी दिपस्तंभाला आमचा अखेरचा दंडवत.
-------------------------------------------------

0 Response to "समाजवादी दिपस्तंभ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel