-->
कॉग्रेस पुनरुज्जीवनाच्या वाटेवर...?

कॉग्रेस पुनरुज्जीवनाच्या वाटेवर...?

रविवार दि. 01 एप्रिल 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
कॉग्रेस पुनरुज्जीवनाच्या वाटेवर...?
-----------------------------------------
कॉग्रेस पुनरुज्जीवनाच्या वाटेवर? हा लेखाचा मथळा वाचून काहींना एप्रिल फुल्ल तर करीत नाही ना असे वाटेल. परंतु खरोखरीच एप्रिल फुल्लचा हा प्रकार नाही. गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता कॉग्रेसचे पुनरुज्जीवन होऊ शकते, असे वाटू लागले आहे. यातील सर्वत महत्वाची घटना म्हणजे, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत कुमार केतकर यांना कॉग्रेसने राज्यसभेवर पाठविणे. कुमार केतकर हे कट्टर मोदी व भाजपाचे विरोधक म्हणून ओळखले जातात. सेक्युलर व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती तर आहेच व कॉग्रेसच्या बाजुने राज्यसभेत किल्ला लढविण्याची त्यांची जबरदस्त वैचारिक ताकद आहे. त्यांची राज्यसभेतील भाषणे भविष्यात मोदी सरकारला डोकेदुखी ठरु शकतात. आयुष्यभर डाव्या विचारांशी बांधीलकी मानणार्‍या या विव्दानाला कॉग्रेसने उमेदवारी देणे यामागे मोठा अर्थ आहे. खरे तर त्यांच्या जागी आपली वर्णी लावण्यासाठी करोडो रुपयांच्या थैल्या घेऊन अनेक जण वाट बघत होते. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत कॉग्रसने केतकरांना राज्यसभेवर पाठविणेे हा कॉग्रेसमध्ये काहीतरी वेगळा विचार सुरु झाल्याचे लक्षण म्हटले पाहिजे. याचा अर्थ कॉग्रेसने आगामी काळात हिंदुत्ववादी विचारांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे मोर्चेबांधणीची आखणी सुरु केली आहे. समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, त्यासाठी आवश्यकता वाटल्यास डाव्यांनाही सोबत घेतले पाहिजे, असा विचार काँग्रेसमध्ये बळावला आहे. परंतु कॉग्रेसबरोबर जाण्याबाबत डाव्या पक्षांत प्रामुख्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात एकवाच्यता नाही. अगदी त्रिपुरातील पराभवानंतरही त्यातून माकप बोध घेणार किंवा नाही असा सवाल आहे. काँग्रेसच्या नुकत्याच दिल्लीत झालेल्या आधिवेशनात पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी केलेले भाषण पाहता, त्यांच्यात आमुलाग्र बदल झालेला दिसला. काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात चांगली प्रगती करु शकेल व सत्तास्थानी पोहचू शकेल असा विश्‍वास आता वाटू लागला आहे. काँग्रेसला 2014च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत हार पत्करावी लागली. सलग दहा वर्षे सत्तेत असल्यामुळे पक्षात शिथीलता आली होती. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते, ते परतविण्यासाठी कॉग्रेसकडे ताकदच शिल्लक नसल्यासारखे झाले होते. मृत्युशय्येवर जसा गलितगात्र रुग्ण अखेरच्या घटका मोजत असतो व सर्व उपचार संपलेले असतात तशी कॉग्रेसची अवस्था झाली होती. या पक्षाचा लोकांशी असलेला संपर्क तुटलेला होता, पण सर्वसमावेशक विकासाचे राजकारण, सेक्युलर भूमिका, नेहरूवाद, आधुनिक दृष्टी, उदारमतवाद यापासून हा पक्ष दूर जात असल्याचे दिसू लागले होते. या पोकळीचा फायदा भाजपने घेतला. त्यांच्या मदतीला असंतुष्ट, कायम सत्तापिपासू असलेले अनेक काँग्रेसजन धावले व बघता बघता देशाच्या नकाशातून काँग्रेस हद्दपार होऊ लागली. गेल्या आठवड्यात कॉग्रेसच्या महाअधिवेशनात थिंक टँककडून चर्चासत्रे झाली. त्यांच्याकडून काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचे -2030 व्हिजन डॉक्युमेंट- मांडण्यात आले. या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये देशाला सुपर पॉवर बनवताना 40 कोटींना गरिबीतून वर आणणे, जिल्हानिहाय हजारो रोजगार उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागात आर्थिक संधी निर्माण करणे, सार्वजनिक क्षेत्रांना बळ देणे, सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करणे व महिला शक्तीला मुख्य राजकारणाच्या प्रवाहात आणून त्यांचे सबलीकरण करणे असा व्यापक कार्यक्रम आखला होता. हे व्हिजन डॉक्युमेंट अर्थातच या वर्षात होणार्‍या काही विधानसभा निवडणुका व 2019च्या लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी काँग्रेस सज्ज झाल्याचे संकेत होते. 2004मध्ये यूपीए-1 तयार झाल्यानंतर किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. त्याची काहीशी ही पुनरावृत्ती म्हणावी लागेल. कारण त्यातील अनेक मुद्दे यात नव्याने मांडले गेले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी संबोधित केलेले देशव्यापी असे पक्षाचे हे पहिलेच महाअधिवेशन होते. सत्ता नसल्यामुळे व राहूलबाबा पुन्हा सत्तास्थानी आपल्याला नेतील या आशेने त्यांच्यासमोर बसलेले नेते व काँग्रेस कार्यकर्ते होते. त्यांच्यात गमावलेला आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान राहुल गांधी यांच्यावर आहे. आपल्या भाषणात त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली. काँग्रेसची तुलना पांडवांशी व भाजपची कौरवांशी केली. पण ही टीका करताना आपल्या पक्षातल्या ढुड्डाचार्यांना, असंतुष्ट नेत्यांना, सत्तेसाठी लाचारी करणार्‍या नेत्यांना तुमची वेळ संपली आहे, असे प्रेमळ शब्दांत सांगितले. अशा या नेत्यांना राहूल गांधी कधी घरी बसविणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अजूनही कॉग्रेसच्या अनेक नेत्यांची जनतेशी नाळ तुटलेली आहे. काँग्रेसमध्ये नेता व कार्यकर्ता यांच्यात जे कमालीचे अंतर पडले आहे, त्यांच्यामध्ये भली मोठी भिंत आहे. ही भिंत पाडण्याची गरज असल्याचे राहुल गांधींनी म्हणणे हाही एक धक्का होता. कारण काँग्रेसी संस्कृती ही नेहमी हायकमांडकडे बोट दाखवून आपले हित साधत असते. राहुल गांधीनी सामान्य कार्यकर्त्याला, तरुणांना काँग्रेस पुढे आणेल, अशीही घोषणा केली आहे. काँग्रेसमध्ये असे मन्वंतर घडल्यास त्याचा भारतीय राजकारणावर मोठा प्रभाव पडेलच; पण कात टाकण्यासाठी काँग्रेस आसुसलेली आहे, परंतु त्याचबरोबर काँग्रेसमधील अनेक लोक त्यांना सुधारमा करु देतील का हा सवाल आहे. हे आधिवेशन संपल्यावर तीन राज्यातल्या अध्यक्षांनी आपले राजीनामे अध्यक्षांकडे धाडले आहेत. अशा प्रकारे पक्षात तरुण रक्ताला वाव देण्यास आता प्रारंभ झाला आहे असे म्हणावयास हरकत नाही. अर्थात राहूल गांधींना हे काम धीमेगतीने करावे लागणार आहे, कारण सत्ता नसल्यामुळे आणखी काही नेते पक्ष सोडून गेल्यास त्याचा परिमाम जाणवण्याची धोका आहे. मोदी सरकारविरोधात चहूबाजूंनी उभ्या राहत असलेल्या असंतोषाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी लढाईचे रणशिंगच सोनिया, राहुल तसेच मनमोहनसिंग-चिदंबरम यांनी या अधिवेशनात फुंकले, तर अलीकडेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या भाजपमध्ये असताना केलेल्या वक्तव्यांबाबत मनमोहनसिंग यांची जाहीर माफी मागत आपणही या लढाईत सामील असल्याचे दाखवून दिले. कॉग्रेसने कात टाकण्यास प्रारंभ केला आहे, हे खरेच आहे, परंतु कर्नाटकातील निकालानंतर त्याची खरी दिशा नक्की होईल.
----------------------------------------------------------------------

0 Response to "कॉग्रेस पुनरुज्जीवनाच्या वाटेवर...?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel