-->
फटाक्यांपासून मुक्ती?

फटाक्यांपासून मुक्ती?

बुधवार दि. 18 ऑक्टोबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
फटाक्यांपासून मुक्ती?
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 2016 पासून फटाके विक्रीला बंदी लागू झाली होती. या फटाके बंदीवर मंगळवारी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय कायम राहण्याचा निर्णय दिला आहे. फटाक्यांमुळे हवेत प्रदूषणाची पातळी वाढत असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी फटाकेविक्री बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र जनतेलाच याचा शेतकर्‍यांनाच याचा फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, ही बंदी लागू होण्यापूर्वीच त्यावरुन महाराष्ट्रात विरोधाचे राजकीय फटाके फुटू लागले होते. फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने हे अभियान राबविले. यंदा अगदी थेट बंदी नाही घातली तरीही जनतेची त्यादृष्टीने मानसिकता तयार करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. आपल्याकडील प्रदूषणाचे प्रमाण पाहता व त्यामुळे होणार्‍या रोगात झपाट्याने वाढ होत असल्याने फटाक्यांवर बंदी घालणे योग्य ठरणार आहे. मात्र केऴल हिंदूंच्याच सणावर असा प्रकारच्या मर्यादा येतात, असे सांगून लोकांची दिशाभूल काही राजकीय पक्ष करीत आहेत. हे चुकीचे आहे. इकडे कोणत्याही धर्माचा प्रश्‍न नाही. कोणत्याही धर्माच्या कार्यक्रमात जर अशा प्रकारे दाट वस्तींच्या भागात जर फटाके फोडले जाणार असतील तर त्यावर बंदी ही घातलीच गेली पाहिजे. कारण अशा प्रकारे दाट वस्तीत फटाके फोडणे शरीराला घातक आहेत. त्यातून बाहेर पडणारे विषारी वायू जड असल्याने धूर वरच्या दिशेला जात नाही तर खालच्या बाजूलाच राहातात. हा धूर श्‍वासातून शरीरात जातो. त्यातून माणसांना आजार जडतात. या धुरामुळे दम्यासारखे आजार उद्दभवतात. धुरामुळे प्राणवायूचे प्रमाणही कमी झालेले असते. त्यामुळे दम्याचा रुग्ण गुदमरतो. त्यामुळे ज्या भागात लोकसंख्येची घनता जास्त त्या ठिकाणी फटाके उडवण्यावर बंदी आवश्यक आहे. दिवाळीत फटाके दोन दिवस फोडण्यास परवानगी दिली तरी दोन दिवसांच्या काळात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. त्यासाठी आवाजावर कोणाचेही नियंत्रण नसते. फटाक्यांच्या आवाजाची नोंद ठेवण्यासाठी डेसिबल मीटरची पोलिसांकडे गरज आहे. पण यासाठी कायदा किंवा शिक्षा करण्यापेक्षा लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे. शिक्षा, दंड करण्यापेक्षा फटाक्यांवर बंदी घालणे योग्य राहील. रात्री दहाच्यानंतर फटाके फोडण्यास बंदी तर आवश्यकच आहे.फटाक्यांचा 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज होऊ नय, याची दक्षता घेण्याची गरज आहे. मात्र अचानक मोठा आवाज कानावर पडल्याने कोणताही माणूस दचकतो. ज्यांना हृदयरोग आहे अशांना तर मोठा आवाज घातकच ठरतो. त्यातून एखाद्याचा मृत्यू ओढवू शकतो. असेही म्हटले जाते की, फटाक्याच्या उद्योगात अनेकांचे रोजगार अडकलेले आहेत. त्यामुळे या रोजगारांवर गदा येईल. परंतु अशा प्रकारे मनुष्यास हानी पोहोचविणारे उद्योग आपल्याला रोजगार देऊनही काय कामाचे? तामीळनाडूतील शिवकाशी येथून संपूर्ण देशात फटाके विकले जातात. येथील उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होते. 90-95 टक्के फटाक्यांच्या व्यापारावर शिवकाशीचेच प्रभुत्व आहे. शिवकाशीतील तब्बल पाच लाख कुटुंबे या व्यवसायात आहेत. फटाके तयार करणे हा मुख्य उद्योग असला तरी फटाके ठेवण्यासाठीचे बॉक्स तयार करणे, बॉक्सवर चित्र छापणे असे परस्परपूरक उद्योगही येथे आहेत. या भागात तब्बल 150 ते 200 प्रिंटींग प्रेस आहेत. पूर्वी या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर बालकामगार काम करायचे. पण बालकामगारांना बंदी घालण्यात आल्यानंतर या मुलांचे प्रमाण जवळपास शून्यावर आले आहे. आता मात्र फटाके तयार करण्यासाठी आता अत्याधुनिक यंत्रे वापरली जातात. पावसाळ्याचा मोसम सोडला तर फटाके तयार करण्याचे काम अविरतपणे सुरू असते. शिवकाशीतील फटाक्यांची वार्षिक उलाढाल 500 कोटींच्या आसपास असावी असा अंदाज आहे. मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेतही होलसेले विक्रेते प्रामुख्याने शिवकाशीहूनच माल घेतात. होलसेल विक्रेत्यांची मुंबईत 200 दुकाने आहेत. त्यानंतर किरकोळ विक्रेते आणि मग एकदम स्थानिक पातळवरील स्टॉल अशी ही मोठी साखळी आहे. फटाक्याचे उत्पादन ते विक्री होईपर्ंयत प्रत्यक्ष सुमारे दहा हजार लोकांना यातून रोजगार मिळतो. मुंबईतील फटाक्यांची आर्थिक उलाढाल सुमारे चार कोटी रुपयांची आहे. दरवर्षी या फटाक्यांच्या किमंतीत दहा ते वीस टक्के वाढ होते. देशातील या फटक्यांना चीनी फटाक्यांची स्पर्धा आता करावी लागते. मात्र मोठ्या प्रमाणावर चिनी फटाके दिसत नाहीत. चीनमध्ये स्थायिक झालेले काही भारतीय व्यापारी तेथून चोरी-छुपे माल पाठवतात. हा माल नंतर स्थानिक बाजारपेठेत जातो. आपण फटाक्यांचे प्रदूषण हे मोजकेच दिवस असते, मग त्याला विरोध का करावयाचा, असाही सवाल केला जातो. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, प्रदूषण हे एक दिवसांचे असो किंवा कायमचे, शेवटी आपल्याला प्रदूषण नको व त्यातून होणारी हानी टाळली पाहिजे, असा दृष्टीकोन ठेवला पाहिजे. आपल्याकडे विविध रासायनिक कंपन्यांतून प्रदूषण होत असते, मोटारींच्या धुराचे प्रदूषण होते त्यात आता फटाक्यांचे प्रदूषण. म्हणजे आपल्याकडे अशा प्रकारे प्रदूषण वाढत जाते. त्यातल्या त्यात आपण आपल्या जगण्याला शिस्त लावून प्रदूषण किती कमी करता येईल याचा विचार केला पाहिजे. यात आपले हित नाही तर भावी पिढीचे हित रक्षण करण्याचा मुद्दा आहे.
---------------------------------------------------------

0 Response to "फटाक्यांपासून मुक्ती?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel