-->
शनिवार दि. 23 सप्टेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख

शनिवार दि. 23 सप्टेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख

शनिवार दि. 23 सप्टेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
राणेंचे अखेर सीमोलंघन
कॉग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर पक्षाचा तसेच विधानपरिषदेचा राजीनामा देऊन आपल्या सीमोलंघनााचा मार्ग मोकळा केला आहे. गेले चार महिने राणे भाजपात जाणार अशा वावड्या उठत होत्या, खरे तर त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्नही सुरु होते. मात्र भाजपाने त्यांच्यासाठी दरवाजा सताड उघडला नाही तर किलकिला केला होता. राणे यंचे आमदार पुत्र नितेश राणे यांचा निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु बहुदा ते देखील कॉग्रेस सोडतील असेच दिसते. नारायणराव भविष्यात नेमके काय करणार हे नक्की झालेले नाही. आता ते स्वत: राज्याचा दौरा करणार आहेत व आपल्या पाठिशी काही आमदार, कार्यकर्ते यांची फौज उभी करुन मग बहुदा भाजपात प्रवेश करतील अशी चिन्हे दिसत आहेत. राणेंनी कितीही काही सांगितले तरी त्यांची आता ताकद क्षीण झाली आहे. शिवसेना बरोबर एक दशकापूर्वी सोडताना त्यांच्यामागे मोठी फोज कॉग्रसेमध्ये आली होती. आता तशी काही स्थिती नक्कीच नाही. त्यामुळे राणेंनी कॉग्रेस सोडताना कितीही मोठ्या गप्पा केल्या तरी प्रत्यक्षात किती लोक त्यांच्यासोबत येतील ही शंकाच आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नारायण राणे हे मागच्या विधानसभेला मालवण मतदारसंघातून पराभूत झाले होते व त्यांचे चीरंजीवही अतिशय कमी मतांनी निवडून आले होते. त्यामुळे नितेश राणे यांना पुन्हा कणकवलीतून निवडून येणे काही सोपे नाही. कदाचित ही वस्तुस्थिती त्यांना मान्य असल्यामुळेच ते कॉग्रेस सोडताना मागे पुढे पाहत असावेत. पक्षात प्रवेश केल्यावर सहा महिन्यांमध्ये मुख्यमंत्रीपद देण्याचे आपल्याला दिलेले आश्‍वासन काँग्रेसने पाळले नाही, असा दावा राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देताना केला असला तरी राणे यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती, पक्षाने त्यांना तसे काहीच आश्‍वासन दिले नव्हते, असे प्रत्युत्तर अ. भा. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी दिले आहे. अर्थाता राणेंचे हे विधान म्हणजे त्यांना गेल्या दशकात कॉग्रेस समजलीच नाही असे म्हणण्यासारखे आहे. कॉग्रेसच्या प्रवत्यांनी राणेंच्या आरोपांचे खंडन करताना उपस्थित केलेले सवाल महत्वाचे आहेत. पक्षातील अनेक नेते नेतृत्वाकडे पदाची इच्छा व्यक्त करतात. त्यात चूक काहीच नाही. पक्षात प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. नेतृत्वाकडे पदाची इच्छा व्यक्त केली म्हणजे नेतृत्वाने होकार दिला असे होत नाही, असेही सुरजेवाला यांनी सांगितले. राणे यांच्या घरात तिघांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यांचा योग्य मानसन्मान राखला. पक्षाने त्यांना काय कमी दिले, असा सवालही सुरजेवाला यांनी केला. कॉग्रेसचे हे म्हणणे कोणालाही पटेल असेच आहे. शिवसेनेसारख्या पक्षात त्यांनी 35 वर्षे काढल्यावर ते कॉग्रेसमध्ये आले. कॉग्रेसमध्ये येऊनही त्यांना एक तप झाले असले तरीही तथाकथीत कॉग्रेस संस्कृतीशी त्यांची नाळ म्हणावी तशी कधीच जुळली नाही. थंडा करके खाव, श्रध्दा व सबुरी ही कॉग्रेसची संस्कृती त्यांना मान्य नाही. जे काही असेल ते सडेतोडपणे मांडणारे नारायण राणे आहेत. त्यामुळे कॉग्रेसचे नेते सध्या विरोधात असतानाही जनतेच्या प्रश्‍नावर आक्रमक नाहीत त्याची त्यांना खंत वाटत होती, यात राणेंचे काही चुकत नव्हते. परंतु काँग्रेसची अशीच संस्कृती आहे. आजवर प्रदीर्घ काळ सत्ता त्यांनी उपभोगली आहे. त्यामुळे काही काळ सत्ता नसताना लगेच आक्रमक होण्याचे काम कॉग्रेस करीत नाही. मात्र अशा वेळी राणेंमधील जुना शिवसैनिक जागा होत होता. राणेंनी पक्षाच्या संदर्भात जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यात काही चूक होते असे नव्हे. रत्नागिरी जिल्ह्याला गेली अडीज वर्षे पक्षाने अध्यक्षच दिलेला नाही. अशा स्थितीत तिकडे पक्षाची नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाताहात झाली. पक्षाचे जबाबदार नेतृत्वच जर नसेल तर कुणाला जाब विचारावयाचा असा प्रश्‍न त्यांनी जो उपस्थित केला आहे तो काही चुकीचा नाही. आज कॉग्रेस पक्ष पराभवातून अजूनही तीन वर्षानंतर सावरलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. केंद्रात झालेला मोदींकडून पराभव, त्यानंतर राज्यातला पराभव आणि त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांतील पराभवाची मालिका कायमच राहिल्याने कॉग्रेस आणखीनच दुबळा झाला आहे. यातून नेतृत्व अगदी केंद्रीय नेतृत्वापासून ते स्थानिक पातळीवरील नेतृत्वापर्ंयत कुणीच सावरलेला नाही. पक्षाने निवडणुका लढविल्या तरी त्यात लढवय्या वृत्ती नव्हती. मानपासून त्या लढवल्या गेल्या नाहीत. नियोजनातला अभाव व ढिसाळपणा आणि त्याहून सर्वात महत्वाचे विश्‍वास गमावलेला असल्याने अलिकडच्या निवडणुका कॉग्रेसने गमावल्या आहेत. अर्थात कॉग्रसेमध्ये सध्या तरी तजेला येऊ शकत नाही असेच वातावरण आहे. मात्र त्याचबरोबर कॉग्रेसने राणेना आश्‍वासन दिलेले मुख्यमंत्रीपद दिले नसले तरीही पक्षाने त्यांना अनेक महत्वाची पदे दिली आहेत. महसूलमंत्रीपद त्यांनी प्रदीर्घ काळ भूषविले. अगदी त्यांचा पराभव झाल्यावरही त्यांना विधानपरिषदेवर पाठविले ते कॉग्रेसनेच. त्यांच्या एका मुलाला खासदार व दुसर्‍याला आमदार बनविले. त्यामुळे कॉग्रेसने त्यांना अगदीच काही दिले नाही असे बोलता येणार नाही. मात्र नारायणरावांच्या अपेक्षा सध्या तरी कॉग्रेस पूर्ण करु शकणार नाही हे वास्तव आहे. अर्थात नारायणराव सध्याच्या स्थितीत भाजपात गेले तरीही त्यांना फारसे काही हाताला लागणार नाही. भाजपा त्यांना शिवसेनेच्या विरोधात मात्र जरुर वापरुन घेईल. त्या बदल्यात एखादे मंत्रीपद मिळणार आहे. एकूण राणेंची ही राजकीय चाल घाट्यातली ठरणार हे नक्की.
---------------------------------------------------------------

0 Response to "शनिवार दि. 23 सप्टेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel