-->
गानसरस्वती

गानसरस्वती

बुधवार दि. 05 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
गानसरस्वती
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील गानसरस्वती असा लौकिक प्राप्त केलेल्या दिग्गज शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर यांचे निधन झाल्याने शास्त्रीय संगीतामधील एक अनमोल ठेवा काळाच्या पडद्याआड गेला आहे. जयपूर अत्रोली घराण्याच्या परंपरेत संगीताचे शिक्षण घेत मोठ्या झालेल्या किशोरीताईंचा जन्म 10 एप्रिल 1932 रोजी मुंबईत झाला. त्यांना आई आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका दिवंगत मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडून गायनाचे बाळकडू मिळाले. त्यानंतर अनेक घराण्यांच्या गुरूंकडून त्यांनी शिक्षणाचे धडे घेतले. पण, जयपूर घराण्याच्या शैलीतील गायन हीच त्यांची प्रामुख्याने ओळख बनली. ख्याल गायकीबरोबरच ठुमरी, भजन या गायन प्रकारांमध्ये त्यांचा हातखंडा होता. किशोरीताईंनी आपल्या आईकडून संगीताचे धडे तर गिरविलेच परंतु त्यांनी विविध संगीत घराण्यांच्या गुरुंकडूनही मार्गदर्शन घेतले. यामध्ये भेंडीबाजार आणि अत्रोली जयपुर या घराण्यांचा समावेश आहे. सांगितिक शिक्षणासोबतच मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी आधुनिक शिक्षणही घेतले. किशोरीताई या केवळ गायन करीत नव्हत्या तर त्यांनी संगीताचा विशेष अभ्यास केला होता. त्यांची संगीतनिष्ठा, व्यासंग, अभ्यास आणि अभिजात संगीताविषयीची त्यांची तळमळ संपूर्ण भारतीय संगीत जगताला विदित आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरात अनेक ठिकाणी त्यांनी बातचितीच्या आणि प्रश्‍नोत्तर सत्रांच्या माध्यमांतून आपले चिंतन अतिशय प्रभावीपणे प्रकट केले होतेे. आपले अनेक वर्षांचे चिंतन त्यांनी खूप मेहनतीने शब्दबद्ध करून स्वरार्थरमणी या ग्रंथाच्या रूपाने अभ्यासकांना उपलब्ध करून दिला आहे. यासाठी त्यांनी अनेक ग्रंथांचे परिशीलन केले, अनेक विद्वानांबरोबर चर्चा केल्या. एकदा सुचलं ते लिहिलं व त्याचा ग्रंथ झाला असे केले नाही, तर प्रत्येक वाक्य, नव्हे प्रत्येक शब्द पारखून, निरखून घेतला आणि चार-पाच वर्षांच्या रात्रंदिवसाच्या अथक परिश्रमांतून आपला ग्रंथ आकाराला आणला. शास्त्रीय संगीताचा भक्कम असा पाया ही त्यांची मोठी जमेची बाजू होती. तालासुराची समज, आवाजाचा गोडवा ही नैसर्गिक देणगी असते. अशी देणगी लाभलेली मुले ऐकून ऐकून छोटी गाणी सहज आणि सुंदर गाऊन जातात. शब्द, ताल, वाद्यसाथ, कुणीतरी बांधून दिलेली चाल यांतून घटकाभर मनोरंजन करणारं संगीत जन्मजात गायक सहज गातो. पण त्याच्या नैसर्गिक गुणवत्तेचा परिपोष जर कुठे होत असेल तर तो राग-गायनात. आपल्याला जे म्हणायचे आहे, ते आकर्षक करून सांगण्यासाठी सुरांचा उपयोग ही अगदी प्राथमिक अवस्था, तर सुरांना जे सांगायचे आहे ते आपल्या कंठातून अवतीर्ण व्हावे हा कळस! पण म्हणून काही प्रत्येक शास्त्रीय गायन-वादन प्रस्तुती ही प्रत्येक चित्रपट गीताहून श्रेष्ठ असते असे नाही. किशोरीताईंनी हे सर्व जिद्दीनं आणि हिरीरीने केले आहे. माणिक भिडे, मीना जोशी, सुहाशिनी मुळगांवकर, आरती अंकलीकर-टिकेकर, रघुनंदन पणशीकर, देवकी पंडित, मीरा पणशीकर असा त्यांचा मोठा आणि प्रसिद्ध शिष्यपरिवार आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या नातीलाही आपला वारसा टिकून राहावा यासाठी गायन शिकविले. किशोरीताई या कठोर शिस्तप्रिय होत्या. रागाचे योग्य गायन झाले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असायचा. त्यातून त्यांनी आपल्या नातीलाही कधी सूट दिली नाही. किशोरीताई या उत्तम वक्त्याही होत्या. त्यांनी संगीतातील भावना अर्थात रस याविषयावर असंख्य व्याख्याने दिली होती. त्यांच्या आजवरच्या संगीत सेवेच्या योगदानाबद्दल पुण्यात गानसरस्वती महोत्सवही आयोजित करण्यात आला होता. किशोरीताईंनी इ.स. 1950 च्या दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस प्रारंभ केला. 1964 सालातील गीत गाया पत्थरोंने आणि 1990 मधील दृष्टी या हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्‍वगायन केले. इ.स. 1991 मधील दृष्टी या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले होतेे. मात्र त्यानंतर त्यांनी चित्रपटांसाठी कधी संगीत दिग्दर्शन केले नाही. किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध होत्या. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करीत. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते. त्यांची गायकी तात्काळ रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत असे. त्यांनी देशोदेशी संगीताचे कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत कला सादर करण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक बोलावले जात असे.  किशोरीताईंना पद्मविभूषण आणि पद्मभूषण या नागरी सन्मानांनी गौरवण्यात आले. तसेच, त्यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. संगीत संशोधन अकादमी पुरस्कार व संगीत नाटक अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले होते. संगीताच्या विशुद्ध भाषेच्या आपण जितकं जवळ जाऊ तितकं संगीत अधिकाधिक भावात्म होत जात, असे किशोरीताईंचे म्हणणे असायचे. सुरांच्या भाषेचा  हेतु  रसानुभव हाच आहे. संगीताच्या सर्व प्रकारांत रागगायनाचा खयाल हा प्रकार सुरांना सर्वाधिक प्राधान्य देऊ शकतो. म्हणूनच खयालगायन हे भावगायन आहे, असे त्या मांडत असत. शास्त्रीय गायनात भाव प्रकट करण्याची कामगिरी सूर करतात. सुरांनी अव्यक्त भाव रसिकमनापर्यंत पोचवताना शब्द फक्त जो भाव प्रकट होणार आहे, त्याची तोंडओळख करून देतात. लतादिती व किशोरीताई या समकालिन गायिका म्हणून ओळखल्या जातात. मात्र त्यांच्या दोघींच्या गायनात मूलभूत फरक आहे. लतादिदिंनी शास्त्रिय संगीताचा आपला पाया पक्का केल्यावर त्या लोकप्रिय असलेल्या सिनेसंगीताकडे वळल्या, तर किशोरीताईंनी शास्त्रिय संगीत शेवटपर्यंत काही सोडले नाही. अशी गानसरस्वती पुन्हा होणे नाही.
--------------------------------------------------------------

0 Response to "गानसरस्वती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel