-->
धर्मसत्तेकडून राजसत्तेकडे...

धर्मसत्तेकडून राजसत्तेकडे...

मंगळवार दि. 21 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
धर्मसत्तेकडून राजसत्तेकडे...
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची झालेली नियुक्ती ही अनेक राजकीय निरिक्षकांना आश्‍चर्याचा धक्का देणारी ठरली. मात्र भाजपाच्या हिंदुत्ववादी राजकारणाशी सुसंगत अशीच ही नियुक्ती असल्याने त्यात काही नाविण्यपूर्ण असे काहीच नाही. 44 वर्षीय योगी आदित्यनाथ हे गोरखनाथ मठाचे मठाधिपती आहेत तसेच गेली पाच वेळा सलग त्यांची लोकसभेवर निवड झालेली आहे. आता मात्र ते राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच सक्रिय होतील. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी अनेकदा मुस्लिमांबद्दल तसेच पाकिस्तानसंदर्भात, देशातील हिंदुंची लोकसंख्या वाढण्याबाबत केलेली विधाने ही वादग्रस्त ठरली. त्यामुळे आता राजसत्ता काबीज केली असताना त्यांची या भूमिकांबाबत आगामी काळात नेमकी भूमिका कोणती राहिल याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आदित्यनाथ हे स्वत: आक्रमक हिंदुत्ववादाचा चेहरा आहेत. आता त्यांनी शपथविधी झाल्यावर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत आपण सबका साथ, सबका विकास हा मंत्र उच्चरणार आहोत व त्यासाठी काम करु असे म्हटले आहे. मात्र देशाच्या मुख्यमंत्रीपदी एखाद्या मठाधिपदीची नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशाच्या पूर्व भागात आपल्या विचारांचा चांगला पगडा स्थापन केला आहे. भाजपाच्या हिंदुत्वाच्या मुद्याचे राजकारण करीत त्यांनी विकासाचा मुद्दा पुढे रेटला आहे. गोरखनाथ मठाचे मठाधिपती असलेले आदित्यनाथ हे अतिशय आक्रमकपणे भाषण करतात व हिंदुत्वाचा आपला मुद्दा काही सोडत नाहीत. त्यांच्या आक्रमक भाषमांमुळे अनेकदा त्यांचे व भाजपाचेही बिनसत होते. त्यांनी हिंदु मतांची एक गठ्ठा मते आपल्याबाजूने उभी केली असून त्यांना डावलणे भाजपालाही अनेकदा जड जाते. 2002 साली त्यांनी यातूनच भाजपाला रामराम ठोकून हिंदु युवा वाहिनीची स्थापना केली होती. शेवटी भाजपाला त्यांच्याकडील हिंदू मतांची कदर करुन अदित्यनाथ यांना आपल्यात समाविष्ट करावे लागले होते. यातूनच त्यांच्याकडे कडवा हिंदू नेता म्हणून पाहिले गेले. अशा प्रकारच्या कडव्या हिंदुत्वापासून त्यांच्याकडे सुरुवातील तरुण विद्यार्थी नेतेपद ते आता मुख्यमंत्रीपद चालून आले. दोन वर्षापूर्वीच ज्यावेळी सरकारवर असहिष्णूततेची टीका होत होती त्यावेळी त्यांनी शाहरुख खानची तुलना पाकिस्तानी अतिरेकी हफिस सईदशी केली होती. त्याच दरम्यान ज्यांना सूर्यनमस्कार घालावयाचा नसेल त्यांनी हा देश सोडून जावे अशीही त्यांची टीका होती. लव्ह जिहाद व करिना हिंदू हे मुद्दे आपल्या पक्षाच्या अग्रस्थानी असतील, असे ते म्हणाले होते. 5 जून 1998 रोजी जन्मलेले आदित्यनाथ हे 26व्या वर्षी खासदार झाले होते. त्यावेळी ते सर्वात तरुण खासदार ठरले. त्यानंतर ते गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून 1998, 1999, 2004, 2009 व 2014 विजयी झाले. 2005 साली आदित्यनाथ यांनी ख्रिश्‍चनांचे धर्मांतर करुन त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची मोहिम हाती घेतली होती. उत्तरप्रदेशातील इटवा येथे 1800 ख्रिश्‍चनांचे त्यांनी एका मोठ्या समारंभात धर्मांतर करण्याचा कार्यक्रम वराच वादग्रस्त ठरला होता. 2007 साली मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी हिंदू-मुस्लिमांनांमधये तणाव निर्माण झाला होता. जिल्हादंडाधिकार्‍यांनी या ठिकाणी आदित्यनाथ यांना जाण्यास मनाई केली होती. परंतु हे झुगारुन ते तेथे गेल्याने तणावात भर पडली व दंगलीला निमित्त झाले. त्यावेळी शांततेचा भंग केल्याबद्दल आदित्यनाथ यांना अटक झाली होती. आदित्यनाथ यांच्या अशा अनेक बाबी नेहमीच वातातीत राहिल्या आहेत. शाहरुख खानबद्दल त्यांनी बोलताना असे म्हटले होते की, या देशातील जनतेने शाहरुखला अभिनेता बनविले आहे, त्यांनी जर त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला तर त्याला रस्त्यावर यावे लागेल. त्यांचे हे विधान म्हणजे शाहरुखसाठी एक प्रकारची धमकीच होती. सूर्यनमस्कार प्रकरणी देखील त्यांनी असेच वादग्रस्त विधान केले होते. ज्यांना सूर्यनमस्कार घालावयाचा नाही, त्यांनी हा देश सोडून जावा या त्यांच्या विधानाने त्यांचे हसेच झाले होते. डिसेंबर 2006 साली आदित्यनाथ यांनी तीन दिवसांचे विराट हिंदू संमेलन आयोजित केले होते. त्याचवेळी लखनौमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होती. 2007 साली झालेल्या निवडणुकीत आदित्यनाथ आणि भाजपामध्ये संघर्षाची ठिणगी उडाली होती. त्यांना कडव्या हिंदुत्वाच्या कार्यकर्त्यांना 100 जागा या भागात द्याव्यत अशी त्यांची मागणी होती. शेवटी या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हस्तक्षेप करुन भाजपाला आठ जागा आदित्यनाथ यांच्या समर्थकांना देण्यास भाग पाडले. मार्च 2010 साली महिला आरक्षणाच्या प्रकरणी त्यांनी भाजपाने काढलेला व्हिपही फेटाळून लावला व याच्या विरोधात मतदान केले. आदित्यनाथ हे राजपूत असून उत्तराखंडातील विद्यापीठातून विज्ञान शाखेचे पदवीधारक आहेत. त्यांची वाटचाल ही धर्मसत्तेकडून राजसत्तेकडे आता झाली आहे. आता त्यांना धर्मसत्ता व राजसत्ता यांची सरमिसळ करता येणार नाही. कारण तसे केल्यास तो राजसत्तेचा अपमान ठरेल. गुजरात दंगलीच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री व आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजसत्तेचे पालन करण्याचा इशारा दिला होता. आपल्याकडे ज्यावेळी धर्मसत्ता व राजसत्ता यांची सरमिसळ झाली त्यावेळी अनेक समाजविघातक शक्तींनी देश खिळखिळा करण्याचा प्रयत्न केला असा इतिहास सांगतो. पंजाबमध्ये 80च्या दशकात ही सरमिसळ झाली होती व त्यात अतिरेकी शक्तींनी शिरकाव केला होता, याची आठवण या प्रसंगी येते. राजसत्ता व धर्मसत्ता या दोन्ही सत्ता समांतर चालू शकतात, मात्र परस्परांवर त्या अवलंबून राहिल्यास देशाचे नुकसान होऊ शकते. आता योगी आदित्यनाथ यांना देखील राजसत्ता राबविताना मोठी सर्कस करावी लागणार आहे. त्यांना राजसत्तेला प्राधान्य घ्यावेच लागेल. यासाठी त्यांनी यापूर्वी जी बेताल विधाने केली होती त्याला मुरड घालावी लागेल. अन्यथा घटनेचा तो अवमान ठरेल.
-----------------------------------------------------------------  

0 Response to "धर्मसत्तेकडून राजसत्तेकडे..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel