-->
चंदू चव्हाणांची कहाणी...

चंदू चव्हाणांची कहाणी...

सोमवार दि. 20 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
चंदू चव्हाणांची कहाणी...
पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकनंतर देश जल्लोष करीत असताना भारतीय् सैनिक चंदू चव्हाण हे चुकून सीमा पार करुन गेले व तेथे पाकिस्तानच्या ताब्यात सापडले होते. त्यांच्या सुटकेसाठी भारत-पाकच्या अधिका़र्‍यांमध्ये चर्चेच्या अनेक फेर्‍या झडल्या. मात्र चर्चा काही यशस्वी होत नव्हती. त्यामुळे चंदू चव्हाण हे परतण्याची शक्यता जवळपास संपलीच होती. शेवटी पाकने चंदू चव्हाण यांना निर्दोष म्हणून जाहीर केले व भारताच्या हवाली केले. नुकताच त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. चंदू चव्हाण यांना पाकिस्तानात मिळालेली वागणूक, एकूणच भारताबद्दल त्यांच्या सैनिकांमध्ये असलेला व्देष हे जसे त्यांच्या मुलाखतीतीतून जसे पहायला मिळते तसेच आपले सैनिक किती लढावू बाण्याने संघर्ष करीत असतात हे देखील त्यांच्या मुलाखतीतून आढळते. चंदू चव्हाण 2012 मध्ये सैन्यात भरती झाले. सध्या ते 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहेत. आई-वडीलांचे छत्र लहानपणीच हरवलेले. एक भाऊ व एक बहिण. भाऊ भूषण चव्हाण हे सुद्धा लष्करात आहेत. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या तिघा भावडांचे आजी-आजोबांनी (आईचे आई-वडील) पालन पोषण केले. शालेय शिक्षण घेत असताना परिस्थितीमुळे चहाच्या हॉटेलमधील कामापासून ते हमालीपर्यंतचे काम चव्हाण यांनी केले. पराकोटीच्या हालअपेष्टांनी कष्ट, दुःख सहन करण्याची ताकद दिली. सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवरील ताण अभूतपूर्व वाढला असताना गस्तीची कामगिरी त्यांच्या पथकाकडे होती. 29 सप्टेंबर 2016 रोजी  सीमेवर गस्त घालत असताना चव्हाण नकळत पाकच्या हद्दीत पोहोचले होते. पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतल्यानंतर चव्हाणांना एका कोठडीत डांबले. कोठडीत सतत भीषण मारहाण होत होती. अत्याचाराचा कोणताही प्रकार राहिला नव्हता. मारहाण करून कंटाळल्यानंतर पाकिस्तानी सैनिक कोठडीच्या बाहेर जात. भारताबद्दल, भारतीय नेत्यांबद्दल शिविगाळ चालायची. नको-नको ते बोलावं, यासाठी मारहाण व्हायची. पाकच्या अधिका़र्‍यांना समजलं, की चव्हाणांचा भाऊही भारतीय लष्करात आहे. खवळून त्यांनी दुस़र्‍या दिवशी बेदम मारहाण सुरू केली. काही काळाने तर मारहाण होत असताना समजतही नव्हतं. मारहाण करायची आणि नंतर इंजेक्शनं द्यायची, असं सुरू होतं. बेशुद्धावस्थेत वेदनाही नव्हत्या. शुद्धीवर आल्यानंतर कधीतरी रोटी आणि पाणी मिळे. काय खातो आहे, हे समजायचं नाही. मारहाण होत असतानाही भारत माता की जय...हेच शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडत होते. मारहाणीनंतर शुद्धीवर आल्यानंतर अंधा़र्‍या कोठडीत काही समजत नव्हते. दिवस की रात्र...आठवडा की महिना झाला, काही-काही कळत नव्हते. बोलायला कोणी नव्हतं. कधी-कधी या छळापेक्षा देवानं आपल्याला मरण द्यावं, असे वाटायचं. एक-एक क्षण कित्येक वर्षांसारखा वाटायचा. पाकिस्तानचे सैनिक, चौकशी अधिकारी मारहाण करताना प्रश्‍नांचा भडिमार करत. परंतु, काहीच माहित नसल्याचे सांगायचो. काही विचारले की अहिराणी भाषेतून त्यांना उत्तरं द्यायचेे. सरकारनं केलेले प्रयत्न आणि देशवासीयांनी केलेल्या प्रार्थना यामुळंच माझी पाकिस्तानच्या नरकयातनांमधून सुटका झाली. अशक्य ते शक्य झालं. देवावर माझी श्रद्धा आहे. यामुळे देवाला माझं एकच मागणे आहे की, देवा माझी जशी पाकिस्तानमधून सुटका केली तशी तेथे बंदि असलेल्या प्रत्येक भारतीयाची सुटका व्हावी...मला माहित आहे, देव माझं गा़र्‍हााणं ऐकून इतरांचीही नक्कीच सुटका करेल.., चव्हाण गहिवरून बोलत. 29 सप्टेंबर 2016 नंतर थेट 21 जानेवारी 2017 चा सूर्य चव्हाणांना पाहायला मिळाला. तोपर्यंत त्यांचा केवळ अंधाराशीच सामना होता. एका कोठडीमधून दुसरीकडे घेऊन जाताना पाकिस्तानी सैनिक चव्हाणांवर काळा बुरखा चढवत. त्यामुळं प्रकाशाचा संबंध कधी आलाच नाही आणि कोठून कोठे नेत आहेत, हे सुद्धा समजले नाही. कधी सुटका होईल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. गुंगीच्या इंजेक्शनामुळे वाघा सीमेवरून भारतात कधी परत आलो, हेदेखील समजले नाही. अमृतसरच्या रुग्णालयात उपचार सुरू झाल्यावरच समजले की भारतात परतलोय...मग खूप आनंद झाला...,सुटकेचा क्षण स्मृतीतून निसटलेले चव्हाण सांगतात. रुग्णालयातील उपचारानंतर भाऊ भूषण व आजोबांना आधी चव्हाण भेटले. दोघांना पाहून बांध फुटून मिठी मारून रडले. मिठी कितीतरी वेळ सोडवतच नव्हती. सतत रडत होतेे. पाकिस्तानच्या नरकयातनामधून सुटका व्हावी यासाठी कोट्यावधी देशवासियांनी प्रार्थना केली होती. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे सतत पाठपुरावा करत होते. माझ्या कुटुंबियांना दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला. भाऊ भूषण चव्हाण व अनेकांच्या आशिर्वाद कामी आले. प्रसारमाध्यमांनीही शेवटपर्यंत विषय लावून धरला होता. भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही मायदेशी आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात होते. मला ही माहिती सुटकेनंतर समजली...माझ्या सुटकेसाठी प्रयत्न करणा़र्‍या प्रत्येकाचे आभार मानतो,असं चव्हाण कृतज्ञतापूर्वक सांगतात. चंदू चव्हाण यंनी आपल्या जीवाची बाजी लढविली. सुदैव होते म्हणूनच ते केवळ मायदेशी परतले. अन्यथा असे अनेक भारतीय पाकिस्तानच्या जेलमध्ये सडत पडले आहेत. अनेकदा त्यांची चूकही नसते. रस्ता चूकून अथवा काही तरी कारणाने भरकटलेले अनेक नागरिक आज पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांची सुखरुप सुटका व्हावी यासाठी भारतीय विदेश कार्यालय सतत प्रयत्नशील असतेच मात्र त्यात ते यशस्वी होतातच असे नाही. चंदू चव्हाण सुदैवाने परतले. मात्र त्यांनी सांगितलेला तेथील अनुभव फारच विदारक आहे. त्यावरुन भारत-पाक यांच्यातील संबंध सुधारण्याची काही शक्यता नजिकच्या काळात तरी अजिबात दिसत नाही.
------------------------------------------------------------

0 Response to "चंदू चव्हाणांची कहाणी..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel