-->
घोर निराशा

घोर निराशा

शुक्रवार दि. 12 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
घोर निराशा
यंदाचा विश्‍वचषक भारतच जिंकणार या मोठ्या अपेक्षा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून असताना टीम इंडियाने मात्र सपशेल निराशा केली आहे. न्यूझीलंडसोबत झालेल्या उपान्यफेरीच्या सामन्यात भारताला दणकून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विश्‍वचषकमध्ये पकिस्तानला हरवल्यावर भारतात जेवढा जल्लोष झाला होता तेवढीच निराशेची छाया परसली होती. आजवर जे सलग या विश्‍वचषकमध्ये विजय संपादन केले होते त्यामुळे काहीशी डोक्यात हवा टीम इंडियाच्या गेली होती, असेच म्हणावे लागेल. कारण आज सुरुवातीपासून भारतीय संघ चुका करीत गेला व न्यूझीलंडच्या संघाने संयम व कमालीच्या शिस्तीचे पालन करुन हा सामना सहजरित्या जिंकला. आव्हान झेलताना भारतीय फलंदाजाना फाजिल आत्मविश्‍वास भोवला. तसेच न्यूझीलंडच्या संघाने फलंदाजी तसेच गोलंदाजी करताना दाखविलेली शिस्त ही वाखाणण्याजोगी होती. भारतीय संघ त्यात कमी पडल्याचे दिसत होते. अवघ्या 45 मिनिटांच्या सुमार खेळीने टीम इंडियाला यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेतून पॅकअप करावे लागल्याची प्रतिक्रिया कर्णधार विराट कोहलीने जी व्यक्त केली ती रास्तच होती. गत उपविजेत्या न्यूझीलंड संघाने आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर अंतिम फेरीतील प्रवेश निश्‍चित केला. न्यूझीलंडने पहिल्या उपांत्य सामन्यात भारताचा 18 धावांनी पराभव केला. या निकालामुळे न्यूझीलंडच्या टीमने सलग दुसर्‍यांदा विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या संघाने गत 2015 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना आठ गड्यांच्या मोबदल्यात भारतासमोर विजयासाठी 240 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाला 49.3 षटकांत अवघ्या 221 धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला. भारताने शेवटच्या 11 चेंडूंवर आपल्या चार विकेट गमावल्या. 92 धावांवर सहा विकेट पडल्याने भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला. त्यानंतर ऑलराउंडर रवींद्र जडेजा (77) आणि धोनीने (50) संघाचा डाव सावरला. त्यांनी सातव्या विकेटसाठी 116 धावांची शानदार भागीदारी रचली. यासह त्यांनी संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. परंतु पुढे धोनी आऊट झाल्यावर भारतीय संघाचे मनोधैर्य खचले. भारतीय टॉप तीन फलंदाजांनी केवळ तीन धावा काढल्या. ही भारताची वनडेच्या इतिहासात आघाडीच्या फळीची सर्वात सुमार खेळी ठरली. 2005 मध्ये आफ्रिकेविरुद्ध आणि 2009 मध्ये विंडीज संघाविरुद्ध प्रत्येकी चार धावा काढल्या होत्या. टीम इंडियाने गेल्या सात वर्षांत 240 वा त्यापेक्षा धावांचा पाठलाग करताना दुसर्‍यांदा पराभवाचा सामना केला. यादरम्यान भारत 41 सामने खेळला व यातील 39 सामन्यांत विजय मिळाला. धोनीचा हा 350 वा वनडे होता. रनमशीन आणि चेसमास्टर म्हणून ओळखला जाणारा भारतीय कर्णधार विराट कोहली महत्वाच्या सामन्यात फक्त एका धावेवर बाद झाल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. आतापर्यंत पाच नॉकआऊट सामन्यात विराट कोहली खेळला आहे. पाचही सामन्यात विराट कोहली अपयशी ठरल्याचे आकड्यावरून दिसून येत आहे. या नॉकआऊट सामन्यात 2015 आणि 2011 मधील विश्‍वचषकाच्या महत्वाच्या सामन्याचा समावेश आहे. महत्वाच्या सामन्यात विराट कोहली आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयशी आल्याचे आकडेवारीवरून पाहायला मिळाले आहे. पाच नॉकआऊट सामन्यात विराट कोहलीने 14.40 च्या सरासरीने फक्त 72 धावा केल्या आहेत. यादरम्यान फक्त एकवेळा त्याला 30 पेक्षा आधिक धावा काढता आल्या आहेत. तीन विश्‍वचषकातील उपांत्य सामन्याची आकडेवारी पाहिल्यास विराट कोहलीने 3.67 च्या सरासरीने फक्त 11 धावा केल्या आहेत. 2011 मध्ये पाकिस्तानविरोधात 9 धावा, 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि 2019 मध्ये न्यूझीलंडविरोधात फक्त एक धाव करता आली आहे. पूर्वी सचिन तेंडूलकरवरही अशा टीका होत असे. सचिनने सामना जिंकण्यासाठी शतक ठोकले अशी फार क्वचितच वेळ ठरली आहे.
2017 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही विराट कोहली आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरने विराट कोहलीला स्वस्तात माघारी पाठवले होते. विराट कोहलीने 228 डावांत 41 शतकांसह 59.60 च्या सरासरीने 11286 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या करियरमधील सरासरी आणि मोक्याच्या सामन्यातील सरासरीमध्ये खूपच तफावत दिसून येतेय. या आकडेवारीवरून मोठ्या सामन्यात रनमशीन विराट कोहली अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळचा विश्‍वचषक अविस्मरणीय ठरला आहे. भारताची कामगिरी पाहता, रोहित शर्मा पाच शतके ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. कर्णधार विराट कोहलीच्या सलग पाच सामन्यांत 50 हून जास्त धावा झाल्या. तर शमीची हॅट्ट्रिक झाली. अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. भारताचे आव्हान आता संपुष्टात आले आहे. यावेळी विश्‍वचषक जिकंण्यचे स्वप्नही भंगले आहे. अर्थात हा खेळ आहे, यात प्रत्येक वेळी आपलाच संघ विजयी होणार असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र शेवटच्या संघात भारतीय संघाने अगदीच निराशाजनक काम केले ही सल क्रिकेटप्रेमींच्या मनाला लागून राहिली आहे.
------------------------------------------------------

0 Response to "घोर निराशा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel