-->
वाढते सायबर गुन्हे / स्वाईन, लेप्टोचा बळी

वाढते सायबर गुन्हे / स्वाईन, लेप्टोचा बळी

गुरुवार दि. 18 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
वाढते सायबर गुन्हे
गुन्हेगारीत आता सायबर गुन्हेगारी ही नवीन पिढीतील गुन्हेगारीतील गुन्हे आता झपाट्याने वाढत असल्याने पोलिसांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे. यातील गुन्हेगार हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत की त्यांच्यापुढे जाऊन गुन्हेगार पकडे हे पोलिसांठी एक मोठे आव्हान ठरत आहे. पुणे शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वेगाने वाढत असून, मुंबईच्या खालोखाल सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद पुण्यात होत आहे. त्यासाठी यापूर्वीच पुण्यात सायबर सेलची स्थापना करण्यात आली आहे. सायबर सेल त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचा तपास करून गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यांकडे पाठवत होते. त्यामुळे सायबर पोलिस ठाणी सुरू करण्याची मागणी पुढे आली. राज्यात मुंबईनंतर पुण्यात सायबर पोलिस ठाणे सुरू झाले. या ठाण्यांना गुन्हे दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून किचकट गुन्हे त्यांच्याकडे तपासासाठी ठेवले जातात आणि अन्य गुन्हे पोलिस ठाण्यांकडे पाठविले जातात. पुणे शहरात दरवर्षी जवळपास साडेपाच हजार सायबर गुन्ह्यांचे अर्ज दाखल होतात. यंदा पहिल्या सहा महिन्यातच साडेतीन हजारांच्या आसपास सायबर गुन्ह्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती चोरून होणारी फसवणूक, ओटीपी क्रमांक मिळवून होणारी फसवणूक, ऑनलाइन खरेदीतील फसवणूक, सोशल मीडियावरून होणारी फसवणूक, डेटा थेफ्ट, हॅकिंग, मोबाइलवरून होणार्‍या गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्ह्यांच्या प्रकारानुसारच सायबर सेलमध्ये नवीन पाच पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांना प्रकारानुसार नावे देण्यात आली आहेत. सायबर गुन्ह्यात बरेच प्रकार आहेत. त्यातील प्रत्येक गुन्ह्यातील तंत्रज्ञान पोलिसांनी अवगत करुन यातील गुन्हेगारांना जेरबंद करणे हे एक मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. गेल्या काही वर्षात अनेकांची मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन फसवणूक झाली आहे. या गुन्ह्यात डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करून फसवणूक, ओटीपी शेअर फ्रॉड, जॉब, इन्शुरन्स, कर्जे, मॅट्रिमोनी, मोबाइल टॉवर फ्रॉड, हॉलिडे पॅकेज फ्रॉड इत्यादी गैरप्रकारांचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑनलाइन व्यवसाय फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. यात ओएलएक्स, क्विकर, फ्लिपकार्ट, ऑनलाइन खरेदी आणि विक्री, मल्टिलेव्हल मार्केटिंगमधील खरेदी व्यवहार होणारी फसवणुकीचा समावेश असतो. त्याचबरोबर वेबसाइट हॅक करणे, ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून खंडणी उकळणे, डेटा थेफ्ट, सोर्सकोड थेफ्ट इत्यादी गुन्ह्यांचा समावेश होतो. तरुणांमध्ये मोठे आकर्षम असलेल्या सोशल नेटवर्किंगमध्येही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत. फेक प्रोफाइल, सोशल मीडियावर बदनामी, अकाउंट हॅक करून खंडणी, बदनामी करणारे व्हिडिओ टाकणे, दोन जातीत तेढ निर्माण करणार्‍या पोस्ट आणि फोटो टाकणे, फेक मेल, फोटो मॉर्फ करणे इत्यादी प्रकार होत असतात. त्यामुळे अनेकदा समाजात तणाव निर्माण होतात. आपण मोबाइलचा वापर करीत असताना अनेक गुन्हे घडतात. यात प्रामुख्याने पोस्ट व्हॅल्यू मेसेज, धमकी देणारे कॉल करणे, मोबाइल हॅकिंग, मॅन इन मिडल, बोगस वेबसाइट, डिजिटल सिग्नेचर चोरणे, आदींचा समावेश आहे. सायबर गुन्हेगार हा जनतेला त्याविषयी असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन गुन्हे करतात. त्यामुळे जनतेत याविषयी जागृती करणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी पोलिसांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.
स्वाईन, लेप्टोचा बळी
मुंबईतील केईएम रुग्णालयात नुकताच स्वाइन फ्लूमुळे एका तरुणीचा मृत्यू झाला. गोवंडी येथे राहणार्‍या 26 वर्षीय दानिश्ता खान हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला लेप्टोचीही लागण झाली होती. तिच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू होते. मात्र तिचे प्राण काही वाचू शकले नाहीत. यंदाच्या पावसाळ्यानंतर झालेला हा स्वाईन फ्लू व लेप्टोचा हा पहिला मुंबईतील बळी ठरला आहे. याखेरीज, मुंबईत जानेवारी महिन्यापासून 237 रुग्णांची नोंद करण्यात आली, तर चार बळी गेले आहेत. जानेवारी ते जुलै या काळात राज्यात तपासण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 14 लाख 24 हजार 350 इतकी आहे. तर ऑसेलटॅमिवीर दिलेले संशयित फ्लू रुग्ण 22 हजार 376 एवढे आहेत. राज्यातील बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 745 असून, सध्या रुग्णालयात भरती असलेले रुग्ण 86 आहेत. यात उपचार करून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1,470 इतकी आहे. तसेच राज्यात जानेवारीपासून 191 जणांचा, तर मुंबईत चार जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे, असल्याचे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मुंबईत असलेली अस्वच्छता व डासांचा प्रादुर्भाव यामुळे हे रोग पसरत असतात. त्यामुळे यासाठी सर्वसामान्य जनतेपेक्षा महानगरपालिकाच जबाबदार ठरते. मुंबईसारख्या मोठ्या महानगरपालिकेत स्वच्छतेचा असलेला अभाव, उघडी गटारे यातून अनेक रोग फैलावत जातात. मुंबईतील 60 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या ही झोपटपट्टीत राहते. तेथूनच या रोगांचा जन्म होतो. मुंबईत अशा प्रकारे शेकडो लोक साथीच्या आजारामुळे मरण पावत असतात. मात्र महानगरपालिकेला त्याचे काही देणेघेणे नसते. हे नाहक होणारे बळी थांबविण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न होणार तरी कधी?
---------------------------------------------------------------

0 Response to "वाढते सायबर गुन्हे / स्वाईन, लेप्टोचा बळी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel