-->
तुंबलेली मुंबई

तुंबलेली मुंबई

बुधवार दि. 03 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
तुंबलेली मुंबई
कधीही न थांबणारे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईचा वेग मागील दोन दिवसांपासून कोसळणार्‍या पावसामुळे मंदावला आहे. लोकल ट्रेन, रस्ते वाहतूकीला पावसाचा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसात देशाच्या या आर्थिक राजधानीत तब्बल 700 मीमीच्या घरात पाऊस पडला आहे. त्याचबरोबर समुद्राच्या लाटाही उंच होत्या. त्यामुळे भरतीची वेळ असल्यामुळे मुंबईच्या पाण्याला बाहेर जाण्यसाठी कुठेच वाव नव्हता. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी जमा झाले होते व परिणामी मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन ठप्प झाली. रस्त्यावरील गाड्यामध्ये पाणी गेले होते. 2006 सालच्या मुंबईतील भयानक पुराची आठवण यावी असे चित्र होते. सोमवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढल्याने रात्री उशीरा शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करुन शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. तर पहाटेच्या सुमारास मुंबई महापालिकेच्या ट्विटवर हॅण्डलवरुन अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने सुट्टी जाहीर केल्याची माहिती देण्यात आली. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले. मात्र आता याच मुद्द्यावरुन भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये ट्विटरवॉर सुरु झाले. याच ट्विटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील भाजपा सरकारवर निशाणा साधला. सुट्टी जाहीर करणे, अतिवृष्टीचा इशारा देणे, लोकांनी घराबाहेर पडू नका, हे सांगणे एवढंच प्रशासनाचे काम आहे का? असा सवाल राष्ट्रवादीने ट्विटवरुन हे ट्विट कोट करत मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत उपस्थित केला. रस्त्यावर ना पोलिस आहेत, ना पालिका कर्मचारी, ना प्रशासनाचे आपत्कालीन प्रतिनिधी. मुंबईकर जनता वार्‍यावर आहे. राष्ट्रवादीच्या याच ट्विटला महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटवर हॅण्डलवरुन उघडा डोळे, बघा नीट! अशा खोचक शब्दांमध्ये उत्तर देण्यात आले. या ट्विटमध्ये भारतीय नौदालाच्या मदतकार्याचे फोटो असणार्‍या ट्विटची लिंक महाराष्ट्र भाजपाने ट्विट केली. एकीकडे ट्विटवर वाद सुरु असतानाच आता मुंबई तुंबण्यावरुन पुन्हा राजकारण सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. नवाब मलिक यांनीही घरात साचलेल्या गुडघाभर पाण्याचे फोटो ट्विट करत करुन दाखवले असा खोचक टोका भाजपाचे मित्रपक्ष असणार्‍या आणि महापालिकेत सत्तेत असणार्‍या शिवसेनेला लगावला आहे. त्याहून सर्वात मोठा कहर मुंबईच्या महापौरांनी मुंबई तुंबलीच नाही असे विधान करुन केला आहे. मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते मात्र मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसामुळे या लोकल सेवेचे तीन तेरा वाजवले. अनेक ठिकाणी मुंबईकर स्टेशनातच रात्रभर अडकून पडला होता. एकूणच मुंबईकरांची दौना झाली होती. मुंबईकाराला या आ आपत्ककालीन स्थितीत कुणीच वाली नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पावसाळा सुरू होण्याआधी नालेसफाई झाली, यंदा मुंबईची तुंबई होणार नाही असे दावे केले गेले होते. हे सर्व दावे फेल गेले आहेत. त्यासाठी खर्च करण्यात आलेले सुमारे 700 कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. मुंबईतल्या अतिवृष्टीमुळे उद्धभवलेल्या घटनांसाठी विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. तसेच पाणी तुंबण्याच्या घटनेला महापालिकेला आणि सरकारला जबाबदार धरले आहे. विधानसभेमध्ये मुंबईच्या या प्रश्‍नावरुन गदारोळ झाला. मुंबईत झालेल्या पावसामुळे सगळ्या व्यवस्थेचा बोजवरा उडाला आहे. मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. दरम्यान मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून भरुन वाहते आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून 16 जण ठार झाले आहेत. तर 13 जण जखमी झाले आहेत. मालाडजवळच्या कुरार भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. एकूणच पाहता सुमारे एक कोटीहून जास्त लोकसंख्या असलेल्या या मुंबापुरीतील लोकांचे जीवन पावसामुळे पूर्णपणे अस्थिर झाले आहे. एक बाब नाकारता येणार नाही की, गेल्या दोन दिवसात पाऊस अतोनात कोसळला, परंतु एवढ्या मोठ्या शहराने यापूर्वी पुराची घटना तेरा वर्षापूर्वी अनुभवली असतानाही त्यातून काही बोध घेतला नाही. सध्या मुंबईत मेट्रोची कामे जोरात सुरु आहेत. मेट्रो या शहरात झालीच पाहिजे परंतु त्याचबरोबर पावसाचे भान ठेऊनही ही कामे केली पाहिजेत. आज सर्वत्र मुंबईभर कामे सुरु ठेऊन सध्याच्या स्थितीत आणखीनच भर घातली आहे. मुंबई हे मूळ सात बेटांचे होते आणि ही बेटे आता जोडली गेली आहेत. ही बेटे माणसाने मोठ्या अभिमानाने बुजवली. परंतु निसर्ग आपला मार्ग काढीतच असतो, त्यानुसार समुद्राला उधाण आले की ते पाणी मुंबईत शिरते. आता तर घराघरात, रस्त्यावर शिरते. त्यामुळे हे सर्व करताना सरकारचे कोणतेही नियोजन नव्हते हेच यातून दिसते. समुद्रकिनारी असलेली कितीतरी शहरे आज जगात आहेत. परंतु त्या शहरात उधाण आल्यावर मुंबईसारखी स्थिती पहावयास मिळत नाही. मुंबईकरांचे हे संकट नैसर्गिक नाही तर मनुष्यनिर्मितच आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. 
-----------------------------------------------------------------------

0 Response to "तुंबलेली मुंबई"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel