-->
पेटलेले दूध!

पेटलेले दूध!

बुधवार दि. 06 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पेटलेले दूध!
राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने पुकारलेला शेतकर्‍यांचा संप आता चिघळणार असे दिसत आहे. सरकारने अजून म्हणावी तसी दखल या आंदोलनाची घेतलेली नाही हे दुदैवी आहे. त्यामुळे हा संप येत्या आठवड्यात अधीक तीव्र होणार असे दिसत आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यात शेतकर्‍यांचा संपाला पाठिंबा मिळत आहे. कदाचित या आंदोलनाची व्याप्ती आणखी काही राज्यातही पसरु शकते. राष्ट्रीय किसान महासंघाच्या मंचावर देशभरातील 130 शेतकरी संघटना एकत्र येऊन त्यांनी या संपाची हाक दिली आहे. शेतीमालाला योग्य भाव, पीक विमा, कर्जमाफी असे प्रश्‍न या संपात प्रामुख्याने आहेत. पण या संपातली महत्वाची मागणी ही दुधाला 50 रुपये प्रति लिटर भाव देण्याची आहे. राज्यात दूध उत्पादक शेतकरी संप्तप्त झाला आहे. महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यांतील शेतकरी रस्त्यावर येऊन दूध ओतून देतो आहे. त्यामुळे राज्यातील दूध पेटले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दुधाचे टँकर अडवून ते दूध रस्त्यावर ओतले जात आहे. काही ठिकाणी फुकट दूध वाटप करून शेतकरी कार्यकर्ते प्रतीकात्मक आंदोलन करीत आहे. अभिनेत्री रविना टंडन हिने या आंदोलकांवर नाराजी व्यक्त करीत दुधाची नासाडी करणार्‍या शेतकर्‍यांना जामीनही देऊ नये असे विधान केले, त्यामुळे तिच्या विरोधात सोशल मिडियावर संताप व्यक्त होणे स्वाभाविकच होते. मात्र रविनाने लगेचच आपल्या मताचा चुकीचा अर्थ काढला व आपण शेतकर्‍यांच्या बाजुने आहोत असे मत व्यक्त केले. अर्थात आंदोलन म्हटले की अशा प्रकारे नाश होणे हे गृहीतच धरले पाहिजे. त्यासाठी शेतकर्‍यांना जबाबदार धरण्याऐवजी सरकारला जबाबदार धरले पाहिजे. रविना टंडन ही संवेदनाक्षम अभिनेत्री आहे, उच्चशिक्षीत आहे. परंतु तिच्या व्टिटमधील टोन शेतकरी विरोधी झाल्याने संताप व्यक्त होणे काही चुकीचे नव्हते. परंतु एक बाब चांगली झाली की, सोशल मिडियावरुन शेतकर्‍यांच्या बाजुने फळी उभी राहते, ही बाब स्वागतार्ह ठरावी. राज्यात दूध उत्पादकांची संख्या जवळपास 50 लाख इतकी आहे. महाराष्ट्रात सध्या 75 लाख लिटर दूधाचे उत्पादन होते. देशात दूध उत्पादनात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक गुजरातचा, दुसरा मध्य प्रदेशचा, तिसरा उत्तर प्रदेशचा आहे. त्यानंतर बिहार, पंजाब, हरियाणा ही राज्ये येतात. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात दूध उत्पन्न 40 लाख लिटरपासून 75 लाख लिटरवर वाढले आहे. राज्यातील शेतकर्‍यांसाठी दूध उत्पादन हा एक चांगला जोडधंदा म्हणून विकसीत झाला आहे. प्रामुख्याने आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाडा या भागात दूध उत्पादन जास्त होत नाही. उर्वरीत महाराष्ट्रात पश्‍चिम व उत्तर भागात दूध उत्पादन हा शेतकर्‍यांसाठी एक चांगला जोड धंदा झाल्याने येते आत्महत्या होत नाहीत. त्यामुळे या शेतकर्‍यांसाठी दूध उत्पादन हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याचबरोबर दूध उत्पादनाकडे महाराष्ट्रातले शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळले कारण इतर पिकांची शेती तोट्यात जाऊ लागली. अगदी ऊस उत्पादकांना देखील ऊसाचे पीक फायदेशीर वाटत नाही. कांदा, कापूस, डाळी यांच्या भावांचा सतत चढउतार सुरू असतो. ही पीके नेहमीच शेतकर्‍याच्या डोळ्यात पाणी आणतात. ही शेती म्हणजे जवळपास जुगार बनल आहे. त्यामुळे हुकमी उत्पन्नाचे साधन म्हणून शेतकरी दूध उत्पादनाकडे वळला. शिकलेले तरुण ग्रामीण भागात दूध व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आहेत. आता एक जोडधंद्याबरोबरच एक चांगला व्यवसाय म्हणून त्याकडे शेेतकरी पाहू लागला आहे. गायींच्या दुधाला 24 ते 27 रुपये प्रति लिटर भाव व म्हशीच्या दुधाला दर लिटरला 33 ते 35 रुपये भाव सध्या मिळतो आहे. यातून शेतकर्‍यांच्या पदरी फारसे काही पडत नाही. प्रत्येक लिटरला गायीच्या दुधाला 50 रुपये मिळावेत, अशी सध्या संपकरी शेतकर्‍यांची मागणी आहे. सध्या तर गायीचे दूध 27 रुपयांऐवजी 17 रुपये दराने सहकारी आणि खासगी दूध संघ उत्पादकांकडून खरेदी करीत आहे. दर लिटरमागे शेतकर्‍याची 10 रुपये लूट सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त आहे. या लुटीला सरकारला जबाबदार आहे. तर दुग्धमंत्री महादेव जानकर म्हणतात की, कमी दराने दूध खरेदी करू नका, अशी तंबी आम्ही खासगी आणि सहकारी दूध संघांना दिली आहे. सरकारनं तंबी देऊनही खासगी आणि सहकारी दूध संघ सरकारचे ऐकत नाहीत म्हणूनच ही लूट सुरू आहे, असा आरोप शेतकरी नेते करत आहेत. दूध उत्पादकांचा लुटीमुळे होणारा संताप, खासगी-सहकारी दूध संघांची चालबाजी आणि सरकारची वेळकाढू चालढकल यात मोठे राजकारण आहे. दूध खरेदी करणार्‍या खासगी आणि सहकारी संस्था या बड्या राजकारणी नेत्यांशी सबंधित आहेत. त्यांच्यावर कारवाई कोण करणार, हा कळीचा प्रश्‍न आहे. राज्यात दुधाचे उत्पादन वाढले आहे. दूध पावडर निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांतून मोठ्या प्रमाणावर दूध आपल्या राज्यात येत आहे. त्यामुळे दुधाचा महापूर आलाय. पुरवठा जास्त, त्यामुळे भाव कमी, या तत्त्वानुसार दूध उत्पादकांना कमी भाव मिळतोय. एकूणच दूध उत्पादकांचा प्रश्‍न अशा प्रकारे सोडवावाच लागेल, अशा प्रकारे हा प्रश्‍न कुजवत ठेऊन गंभीर होणार आहे. सध्या पेटलेले दूध शांत करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.
-------------------------------------------------------------------

0 Response to "पेटलेले दूध!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel