-->
पालघरचा संग्राम

पालघरचा संग्राम

सोमवार दि. 28 मे 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पालघरचा संग्राम
भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर होणार्‍या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सध्या भाजपा व शिवसेना हे दोन्ही पक्ष परस्परांच्या विरोधात उभे ठाकल्याने हा संग्राम जोरदार झाला आहे. आज होणार्‍या या पोटनिवडणुकीत कोण विजयी होणार हा मोठा सवाल आहे. भाजपाची विद्यमान जागा होती, मात्र यात शिवसेनेने उडी मारली. या दोघांपैकी कोण जिंकणार की तिसर्‍याचा लाभ होणार हे पाहावे लागेल. मुंबईपासून हाकेच्या अंतराव असलेल्या या मतदारसंघात जसा शहरी मतदार काही प्रमाणात आहे, तसा आदिवासी समाजही आहे. या मतदारसंघात उत्तरभारतीय मोठ्या संख्यने राहातात. त्यामुळे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येऊन गेले. मात्र याचा भाजपाला कितपत फायदा होईल ही शंका वाटते. चिंतामण वनगा यांचा हा मतदारसंघ असला तरी येथे संघाच्या कामामुळे काही त्यांची हक्काची मते आहेत. तशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचीही आहेत. तेथील विधानसभेच्या दोन जागांमध्ये आजही माकचे वर्चस्व आहे. माकपचा येथील उमेदवारही बर्‍यापैकी मते खाईल. दिवंगत चिंतामण वनगा हे भाजपाचे विद्यमान खासदार असल्याने या जागेवर शिवसेनेने लक्ष ठेऊ नये अशी भाजपाची अपेक्षा होती. त्यात त्यांचे काही चूकही नव्हते. परंतु सध्या एकत्र सत्तेत वाटेकरी असले तरी भाजपा व शिवसेनेचे संबंध फाटत चालले आहेत. शिवसेना भाजपाला व पंतप्रधान मोदींचा जेवढा अपमान करता येईल त्याची एकही संधी सोडत नसते. पालघरला मात्र शिवसेनला उमेदवार उभा करण्याची संधी भाजपानेच चालत आणून दिली. वनगा यांच्या चिरंजीवाना ही जागा आपल्याला भाजपा देईल असे वाटत होते. परंतु प्रत्यक्षात भाजपामध्ये काही वेगळ्याच हालचाली सुरु झाल्या व वनगा कुटुंबियांना ही जागा न देण्यासाठी व्यहरचना आखली गेली. याची काणकूण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना लागताच त्यांनी सरळ शिवसेनेचा रस्ता गाठला व शिवसेनेत प्रवेश करुन ही निवडणूक लढविण्याचे ठरविले. वनगा कुटुंबिय हे भाजपाशी प्रदीर्घ काळ जोडले गेलेले होते, व त्यांच्याच जोरावर ही जागा भाजपाच्या पदरात पडत होती. परंतु सध्या सत्तेचा माज आलेल्या भाजपाचे नेते आपल्या पक्षातील जुन्या लोकांना सोयिस्कर विसरु लागले आहेत. जो पैसा देऊल त्याला तिकिट हे सुत्र अवलंबू लागले आहेत. त्यामुळे नंतर वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश करताच आम्ही त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी देणार होते, अशी भाषा करु लागले. मात्र तोपर्यंत वेळ टळली होती. श्रीनिवास वनगा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपाने एक चांगला खणखणीत उमेदवार शिवसेनेला मिळाला होता. तसेच वडिलांच्या निधनामुळे झालेल्या सहानभूतीचा त्याला फायदा मिळू शकतो, यावर शिवसेनेची सर्व भीस्त आहे. शिवसेना नेत्यांनी अशी पळवापळवी केल्यानंतर आपल्याकडे उमेदवारच नाही अशी अवस्था देशात आणि महाराष्ट्रात सत्तेवर असणार्‍या भारतीय पक्षाची झाली. काँग्रेसच्या नेत्याला घोडयावर बसवून त्याला उमेदवार म्हणून जाहीर करण्याची वेळ भाजप नेत्यांवर आली. मग काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना अक्षरश: काही मिनिटांत भारतीय जनता पक्षात पावन करून घेण्यात आले आणि खूप मोठी गर्दी जमवून त्यांचा भाजपचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्जही भरण्यात आला. सध्याची परिस्थिती पाहता राजेंद्र गावित यांना फायदा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उमेदवार दामोदर शिंगडा यांनी 1991, 1996, 1998, 1999 आणि 2004 अशी सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून येण्याची कामगिरी बजावली आहे. 2009 च्या निवडणुकीत मात्र ते बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्याकडून पराभूत झाले होते. बहुजन विकास आघाडीची मोठया प्रमाणावर आणि अजिबात फुटणार नाहीत अशी मते या मतदारसंघात आहेत. आम्ही कडेगाव-पलुस विधानसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार मागे घेऊन काँग्रेसला मदत करतो, या बदल्यात काँग्रेसने पालघरमध्ये दामू शिंगडा यांची उमेदवारी मागे घेऊन भाजपला मदत करावी असा एक प्रस्ताव भाजप नेत्यांकडून अशोक चव्हाण यांना देण्यात आल्याची चर्चा होती, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपला अनुकूल ठरेल असा कोणताही निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतील, असे वाटत नाही. त्यामुळे प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदही गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत शिंगडा यांची उमेदवारी मागे घेणार नाही असे अशोक चव्हाण यांनी जाहीर केले असावे. पालघर मतदारसंघातील लढत अटीतटीची होणात यात शंका नाही. मंत्रालयातील सत्तेत भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावत बसणार्‍या शिवसेनेने पालघरमध्ये भारतीय जनता पार्टीला मदत केली असती तर ते अधिक शोभून दिसले असते, पण हल्ली स्वबळावर लढण्याच्या हौसेने शिवसेना नेत्यांना इतके ग्रासले आहे की, भाजपमुळे आपण राज्याच्या सत्तेत आहोत, याचे भानही शिवसेना नेत्यांना उरलेले दिसत नाही. भाजपनेही राजेंद्र गावित यांना पक्षात आणून उमेदवारी देण्याची अकारण घाई केली. एकूणच पालघरमधील संघर्ष रंगतदार होणार आहे, यात शंका नाही. विजयाची चटक लागलेली भारतीय जनता पार्टी, भाजपला हरवण्याच्या इर्षेने पेटलेली शिवसेना, विजय मिळवण्यासाठी आसुसलेला काँग्रेस पक्ष आणि आणखी एका विजयासाठी ताकद पणाला लावलेली बहुजन विकास आघाडी या प्रमुख पक्षांच्या उमेदवारामधील लढाई उत्सुकता ताणणारी ठरणार यात शंका नाही.
------------------------------------------------------

0 Response to "पालघरचा संग्राम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel