-->
अमित शहा यांची मुंबई भेट

अमित शहा यांची मुंबई भेट

रविवार दि. 10 जून 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
अमित शहा यांची मुंबई भेट
-------------------------------------
एन्ट्रो-सद्या भाजपाला शिवसेनेची साथ हवी आहे, त्यामुळे शिवसेनेपुढे झुकल्यासारखे करतील. त्यावर शिवसेना कितपत विश्‍वास ठेवते ते पहावे लागेल. मात्र शिवसेनेने भाजपासोबत निवडणुका लढविल्या तर लोकांचा शिवसेनेवरील विश्‍वास उडेल. तसेच सर्वसामान्य शिवसैनिक गोंधळून जाईल. त्याचबरोबर भाजपाविरोधी आज जे देशात जनमत संघटीत होते आहे, त्याचा रोष शिवसेनेलाही पत्करावा लागेल. भाजपाच्या सत्तेच्या गाजरापुढे शिवसेनेने किती झुकायचे हा त्यांचा प्रश्‍न आहे, परंतु त्यामुळे शिवसेनेची मते कमी होणार हे नक्की... 
----------------------------------------------
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मुंबई भेट नेमकी कशासाठी होती? अगदी स्पष्ट भाषेत बोलायचे तर शिवसेनेला पटवापटी करण्यासाठी होती. परंतु शिवसेना शहांच्या प्रलोभनांना बळी पडली का? सध्या तरी याचे उत्तर नाही असेच म्हणता येईल. कारण या भेटीनंतर केवळ 24 तासातच खासदार संजय राऊत यांनी आम्ही स्वतंत्रपणेच लढणार असल्याचे जाहीर केले. मात्र शिवसेनेचा हा निर्धार कायम टिकेल का, असा प्रश्‍न आहे. संपर्क फॉर समर्थन या अभियानाअंतर्गत बुधवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. त्याचबरोबर उद्योगपती रतन टाटा, अभिनेत्री माधुरी दिक्षित यांची भेट घेतली. लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करण्यात आली. अमित शहा यांच्या या मुंबई भेटीत झालेल्या या भेटीगाठी पाहता, भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीनंतर सत्ता वाचविण्याचे मिशन आत्तापासूनच हाती घेतले आहे हे सिध्द होते. या भेटीत त्यांनी निवडलेल्या व्यक्ती याला फार महत्व आहे. उद्योगपती रतन टाटा यांचे उद्योगक्षेत्रातील वजन पाहता त्यांची भेट घेतल्याने या क्षेत्रातील पितृस्थानी असलेल्या व्यक्तीला भेटून आपण देशाच्या या आर्थिक राजधानीत आल्यावर उद्योजकांचे कसे मित्र आहोत, ते शह यांना दाखवायचे आहे. त्यांनी सध्या भाजपाशी चांगलीच दोस्ती असलेल्या अंबांनींची त्यांनी भेट घेतली नाही, हे एक त्यांच्या भेटीचे वैशिष्ट्य. चित्रपटसृष्टीशी निगडीत एवढे कलाकार मुंबईत आहेत, अनेक जण भाजपाशी अगदी चांगली दोस्ती करुन आहेत, परंतु शहा यांनी माधुरी दिक्षीतला भेटणे पसंत केले. यामागचे मुख्य कारण म्हणजे, माधुरीने आपले गेल्या तीन दशकात चित्रपटसृष्टीत चांगले बस्तान बसविले आहे व तिच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये आदराचे स्थान आहे. अशी व्यक्ती जर आपल्याला राज्यसभेवर पाठविता येते का किंवा आगामी लोकसभेसाठी माधुरी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे का याची त्यांनी चाचपणी केली असावी. माधुरीसारखी कलाकार जर भाजपाच्या कंपूत आली तर त्याचा प्रचारासाठी चांगला उपयोग होईल अशी शहा यांची निश्‍चितच गणिते असणार. त्याचबरोबर अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीकडे अनेकांचे डोळे लागले होते. कारण याच अमित शहांचे वर्णन शिवसेनेने अफझलखान असे केले होते. परंतु या अफझलखानाच्या स्वागतासाठी गुजराती मेनू ठेवण्यात आला होता, अशी चर्चा भेटीअगोदर रंगली होती. सत्तेत आल्यापासून शिवसेना विरोधात असल्यासारखीच वागत आहे. गेल्या वर्षात तर भाजपाच्या विरोधात सडकून टिका ठाकरे करीत होते. याचे एक टोक म्हणजे, यापुढे शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर पालघरच्या निवडणुकीत जरी भाजपा विजयी झाली असली तरी शिवसेनेशिवाय आपली राज्यात डाळ शिजणार नाही असे त्यांना वाटू लागले होते. कारण पालघरमध्ये जर शिट्टी वाजली नसती तर शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय नक्की होता. त्याचबरोबर कर्नाटकातील विचक्यानंतर सर्व विरोधक एकवटले असल्यामुळे भाजपाची आता धडकी भरली आहे. त्याचबरोबर सत्तेची पाच वर्षे पूर्ण होतील, परंतु त्यानंतर सत्ता जर पुन्हा मिळवायची असले तर भाजपा स्वबळावर ती कमवू शकत नाही, हे सत्य आता भाजपाला पटले आहे. किंबहूना हे सत्य पटल्यामुळे आता आपल्या सर्व घटक पक्षांची मोट बांधण्यास आता शहा यांनी सुरुवात केली आहे. यातील तेलगू देसम यापूर्वीच भाजपाप्रणित आघाडीतून बाहेर पडला आहे. आता पुन्हा तेलगू देसम भाजपच्या व्याससपीठावर येणे कठीण आहे. शिवसेना भाजपाच्या विरोधात गरळ ओकत आहे, मात्र शिवसेना आपला हा विरोध किती काळ ठेवते ते पहायचे. भाजपाने 2019च्या निवडणुकीसाठी सत्ता टिकविण्यासाठी मिशन हाती घेतले आहे. कर्नाटकात हसू झाल्यावर भाजपाची पत घसरली आहे. त्याचबरोबर राजस्थान, मध्यप्रदेश येथीलही निवडणूक भाजपासाठी सोपी नाही. जर या निवडणुका हरल्या तर भाजपाला लोकसभा कठीण जाणार हे नक्कीच आहे. उत्तरप्रदेशात मायावती-समाजवादी एकत्र आले आहेत. त्याचबरोबर बिहारमध्ये नितीशकुमार यांची शाश्‍वती देता येत नाही. ते विरोधकांच्या कंपूत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास भाजपासाठी बिहारची परीक्षा अवघड ठरेल. स्वबळाचा नारा देऊन भाजपा सत्तेत येऊ शकत नाही. त्यामुळे विरोधकांच्या तगड्या आव्हानाला जर तोंड द्यायचे असेल तर सहकारी पक्षांची कुमक वाढविली पाहिजे. त्यासाठी आता शहा देशभर दौरा काढीत आहेत. याची भवानी त्यांनी मुंबईपासून केली. शहा यांच्या मातोश्रीवरील भेटीमुळे शिवसेना आणि भाजपमधील दुरावा काही अंशी कमी होईल, असे मानले जात आहे. या भेटीत इतर वादाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी जागावाटप किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली नसल्याची माहिती देण्यात आली. अर्थात ही दोघा नेत्यांची प्रदिर्घ काळानंतर झालेली चर्चा असल्याने लगेचच दरी काही सांधली जाणार नाही. त्यासाठी काही काळ जावा लागेल. शिवसेना सत्ता सोडू शकत नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात जादा जागा देण्याचा प्रस्ताव शहा यांनी ठेवला असेल तर शिवसेनेला लगेचच नाही म्हणणार नाही. सद्या भाजपाला शिवसेनेची साथ हवी आहे, त्यामुळे शिवसेनेपुढे झुकल्यासारखे करतील. त्यावर शिवसेना कितपत विश्‍वास ठेवते ते पहावे लागेल. मात्र शिवसेनेने भाजपासोबत निवडणुका लढविल्या तर लोकांचा शिवसेनेवरील विश्‍वास उडेल. तसेच सर्वसामान्य शिवसैनिक गोंधळून जाईल. त्याचबरोबर भाजपाविरोधी आज जे देशात जनमत संघटीत होते आहे, त्याचा रोष शिवसेनेलाही पत्करावा लागेल. भाजपाच्या सत्तेच्या गाजरापुढे शिवसेनेने किती झुकायचे हा त्यांचा प्रश्‍न आहे, परंतु त्यामुळे शिवसेनेची मते कमी होणार हे नक्की.
------------------------------------------------------------

0 Response to "अमित शहा यांची मुंबई भेट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel