-->
माणुसकीला काळीमा

माणुसकीला काळीमा

मंगळवार दि. 17 एप्रिल 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
माणुसकीला काळीमा
आठ वर्षांच्या गुज्जर समाजातल्या आसीफावर बहुसंख्यांक समाजातील लोकांनी रसना गावच्या देवस्थानामध्ये केलेला निर्घृण सामूहिक बलात्कार आणि खून ही घटना केवळ या गुन्ह्यापुरती मर्यादीत नाही. अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात त्यांच्यातील एका मुलीवर बलात्कार करण्याचे ते कारस्थान होते हे आता सिध्द झाले आहे. बहुसंख्य हिंदूंच्या भागातून गुज्जर आणि बाकेरवाल समाजाच्या या भटक्या विमुक्त लोकांना कायमचे हाकलून देण्याचा हा डाव होता. हे प्रकरण उघड झाले असताना पंतप्रधानांचे राज्य असलेल्या गुजरातमधील सुरत मध्ये अशीच घटना घडली आहे. सुरतमध्ये 11 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिचा निघृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील घटनाही हृदयद्रावक आहे. येथे तर सत्ताधारी भाजपाचा आमदार त्यातील गुन्हेगार आहे व त्याला वाचविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा राबत होती. मात्र न्यायालयाने चपराक दिल्यावर ही यंत्रणा हलली. या सर्व घटना पाहता आपल्या समाजातील मानवता संपली आहे की काय असेच वाटू लागले आहे. काश्मिरमधील भटक्या विमुक्त जमातीला त्यांच्या जमिनीवरून हाकलून देण्यासाठी हा बलात्कार वापरण्यात आला, असे या घटनेचे पहिल्यांदा वार्तांकन करणारे टीव्ही पत्रकार मुफ्ती इस्लाह यांचे म्हणणे आहे. तसेच या घटनेच्या माध्यमातून कथुआ मधल्या मुस्लिम समाजाच्या मनात भीती निर्माण करण्याचा डावही उजव्या हिंदू आणि कडव्या राष्ट्रवादी संघटनांनी आखला आहे. धर्माच्या नावावर काश्मीर खोरे आणि जम्मू यांच्यामध्ये दुही निर्माण करण्याचाच हा प्रयत्न आहे. येथील हिंदू एकता मंच या संघटनेने बलात्काराच्या आरोपींसाठी मोर्चा आयोजित केला. या बलात्काराचे तपशील खूपच क्रूर आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहेत. महत्वाचे म्हणजे ही घटना तीन महिन्यांपूर्वीची असून त्याबाबत आजवर सर्वच माध्यमे मूग गिळून होती. परंतु एन.टी.टी.व्ही.च्या टीमने हे प्रकरण बाहेर काढले. जानेवारीच्या सुरुवातीला एका दुपारी आसिफा बानो दोन घोड्यांना घेऊन घराबाहेर पडली. पाळलेल्या जनावरांना चरण्यासाठी ती नेहमी घेऊन जात असे. अशाच एका दिवशी आसिफा संध्याकाळपर्यंत घरी आली नाही तेव्हा तिच्या आईला काळजी वाटू लागली. लगेचच गुज्जर समाजातल्या लोकांनी रात्री तिचा शोध सुरू केला. शेवटी त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आसिफा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. ज्या पोलिसांवर लोकांच्या रक्षणाची, कायदा-सुव्यवस्था नीट राखण्याची जबाबदारी देण्यात आली होती तेच पशू निघाले. त्यातील एक 28 वर्षीय स्पेशल पोलीस ऑफिसर दिपक खजुरिया हा सर्च टीमचा भाग होता. त्यांनी आठवडाभर तिला शोधले. पण बिचार्‍या आसिफाच्या कुटुंबाला काय माहित की खजुरिया या बलात्काराच्या कारस्थानाचा एक हिस्सेदार होता. जम्मू आणि काश्मिर पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात खजुरियावर आरोपी म्हणून ठपका ठेवण्यात आला आहे. माजी महसूल अधिकारी संजी राम याच्यावर प्रमुख आरोपी म्हणून गुन्हा दाखल आहे. ही घटना लपवून ठेवण्यामध्ये या 60 वर्षीय आरोपीचा मुख्य हात होता. त्यासाठी त्याने पैसे आणि आपले वजन वापरले. संजी राम हा या देवस्थानाचं काम पहायचा. त्याचा भाचा खजुरिया याची बाकेरवाल समाजाबरोबर अनेकदा भांडणे झाली आहेत. या सगळ्यामध्ये पुरावे नष्ट करण्यात आले. पीडीपी-भाजप सरकारमध्ये असलेले भाजपचे दोन मंत्री चौधरी लाल सिंग आणि चंदर प्रकाश गंगा यांनी या सगळ्यात बलात्काराशी संबंधित आरोपींच्या बाजूने उडी मारली. हिंदू एकता मंचने आयोजित केलेल्या बेकायदेशीर मोर्चामध्येही त्यांनी सहभाग घेतला. या आरोपींना पाठिंबा देण्यासाठी भारताचा तिरंगाही फडकवण्यात आला. यात त्यांना कोणते राष्ट्रप्रेम दिसत होते हे समजण्यास मार्ग नाही. जम्मूमधील वकीलांनीही धार्मिकतेच्या मुद्द्यावर अत्यंत कडवी भूमिका घेऊन आसिफाच्या प्रकरणात न्याय मिळण्यात अडथळे निर्माण केले. जम्मूच्या बार असोसिएशनने आसिफा बलात्कार आणि खून प्रकरणातल्या चालानच्या विरोधात निदर्शने करून पोलिसांनी चुकीचा तपास केल्याचा आरोप उलट पोलिसांवरच केला. एका बाजूला धार्मिकतेच्या नावाखाली विभाजन होत असताना दुसर्‍या बाजूला सद्सदविवेकबुद्धी जागे असलेले काही नागरिक धर्म, जात विसरून पुढे आले. हा केवळ साधा बलात्काराचा गुन्हा  नाही तर त्याच्यामागे असलेले धार्मिकतेचे कवच व हेतू हे आपल्या समाजास घातक ठरणारे आहे. काश्मिरमध्ये दोन समाजात तेढ निर्माण करून आणि ती आणखी वाढवण्यात या लोकांची राजकीय पोळी भाजली जाते. आसिफाच्या प्रकरणानंतरही काश्मिरी मुसलमानांविरोधात दुही आणखी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण तो फोल गेला. आसिफाविषयी त्यांच्या मनात कोणतेही प्रेम नसून केवळ काश्मिरी मुसलमानांविरोधात राजकारण करण्याचा हा डाव होता. आज या प्रकरणी भाजपाने आपले तोंड गप्प केले आहे. पंतप्रधानांनी यातील गुन्हेगारांना कडक शासन करण्याचे दिलेले आश्‍वासन पुरेसे नाही. समाजात दुफळी माजविणार्‍या या शक्तींना सध्याच्या सत्ताधार्‍यांकडून याला खतपाणी घातले जात आहे, हे धोकादायक आहे. त्यानंतर दिल्लीत कॉग्रेचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कँडल मार्च काढण्यात आला. यामागे राजकारण आहे हे आपण एकवेळ समजू परंतु पाच वर्षापूर्वी दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणी भाजपाचेच लोक हे प्रकरण चिघळविण्यात पुढाकार घेत होते हे विसरता येणार नाही. माणूसकीला काळीमा लावणार्‍या या घटना पाहता आपण स्त्रीला केवळ माता, लक्ष्मी अशी रुपे दण्यात गर्क आहोत, प्रत्यक्षात मात्र या मातेच्या रुपाला मात्र धर्माच्या नावाखाली कुसकरत आहोत, यातून आपली माणूसकीच संपत चालली आहे.
----------------------------------------------------------------

0 Response to "माणुसकीला काळीमा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel